Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाचवी आंतरराष्ट्रीय हॉर्नबील परिषद रविवारपासून सिंगापुरात
डॉ. अनिल पिंपळापुरे, डॉ. प्रवीण चरडे आणि राजू कसंबे आमंत्रित
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

सिंगापूर नॅशनल पार्क आणि बॉटनिकल गार्डन यांच्यावतीने सिंगापूर येथे २२ ते २५ मार्चदरम्यान, आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबील परिषदेत, नागपुरातील ज्येष्ठ दंत चिकित्सक आणि पक्षी

 

निरीक्षक डॉ. अनिल पिंपळापुरे, सेवादल महिला महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण चरडे आणि राजू कसंबे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या परिषदेत सुमारे ४० शोधनिबंधांचे वाचन करण्यात येणार असून भारतातून ८ शोधनिबंधांचे वाचन करण्यात येईल. डॉ. अनिल पिंपळापुरे ‘इंडियन ग्रे हॉर्नबील’ पक्षाच्या विणीच्या हंगामातील हालचाली तसेच मादी पक्षाच्या घरटय़ातील पिलांचे संरक्षण आणि संगोपन या विषयावर शोधनिबंधाचे वाचन करतील. या परिषदेत सहभागी होण्याकरिता विदर्भातून ५ तर, उर्वरित भारतातून ५ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमरावती शहरातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ यांनासुद्धा परिषदेत आमंत्रित करण्यात आले असून ते मेळघाटातील ‘मलबार पाईड हॉर्नबील’वर शोधनिबंध सादर करतील. सिंगापूर येथे आयोजित चार दिवसीय परिषदेदरम्यान, ते डॉ. पिल्लई बुन्सवूड यांच्या रिसर्च हॉर्नबील केंद्राला व जगातील ८०० प्रकारचे पक्षी असलेल्या जुरंग बर्ड पार्कला भेट देतील.
‘हॉर्नबील’ हा पक्षी केवळ आशिया आणि अफ्रिका खंडातच आढळून येतो. युरोपीयन देशात तो आढळून येत नाही. ‘इंडियन ग्रे हॉर्नबील’ हा संपूर्ण महाराष्ट्रात तर, ‘मलबार ग्रे हॉर्नबील’ हा केवळ सहय़ांद्री पर्वत रांगात आढळून येतो. ‘इंडियन ग्रे हॉर्नबील’ या पक्षाला मराठीत राखी धनेश किंवा शिंगचोचा या नावाने ओळखले जाते. सिंगापूर येथे आयोजित परिषदेत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ अ‍ॅलन्ट कॅम्प सहभागी होणार असून, त्यांनी जगातील ५४ प्रकारच्या हॉर्नबीलवर अभ्यास केला आहे आणि त्यावर आधारित त्यांचे पुस्तकसुद्धा प्रकाशीत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा लाभ या परिषदेत नक्कीच होईल, असा विश्वास डॉ. अनिल पिंपळापुरे
यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला. डॉ. पिंपळापुरे गेल्या २० वर्षांपासून पक्षी निरीक्षणात सक्रीय असून २००२ पासून ते हॉर्नबीलचा अभ्यास करीत आहेत.
डॉ. अनिल पिंपळापुरे, डॉ. प्रवीण चरडे व राजू कसंबे हे सिंगापूरसाठी उद्या नागपूरहून रवाना होत आहेत.