Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

असलम खानसह पाच आरोपींना जामीन फेटाळला
चितळ शिकार प्रकरण
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

चितळ शिकार प्रकरणातील प्रमुख आरोपी व वनमंत्री बबनराव पाचपुते यांचा निकटवर्तीय समजला जाणाऱ्या असलम खानसह पाच आरोपींचा जामीन अर्ज बुधवारी, १८ मार्चला रामटेकचे प्रथम

 

श्रेणी न्याय दंडाधिकारी एम.एस. कुळकर्णी यांनी फेटाळला.
असलम खान व त्याच्या तीन सहकाऱ्यांकडून ६ मार्चला ४० किलो हरणाचे मांस, शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तर दोघे फरार झाले होते. दुसऱ्या दिवशी चितळाचे डोके व कातडेही जप्त करण्यात वनविभागाला यश आले होते. चितळ शिकार प्रकरणातील या आरोपींना ९ मार्चला वनकोठडी देण्यात आली होती. त्यानंतर १६ मार्चपर्यंत वनकोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या चौघांनाही नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवले. दरम्यान, दोन फरार आरोपींपैकी नजीम नामक एका आरोपीने आत्मसमर्पण केले. या पाचही आरोपींना २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या सर्वाची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. त्यानंतर असलम खान व त्याच्या सहकाऱ्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज १८ मार्चला रामटेकच्या प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी एम.एस. कुळकर्णी यांनी फेटाळून लावला. चितळ शिकार प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी राजू भय्या अद्यापही फरार असून त्याला अटक केल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.