Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वेगवेगळ्या तीन अपघातात चार ठार
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्य़ामध्ये बुधवारी झालेल्या तीन अपघातात चार ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या या घटना जिल्ह्य़ातील देवलापार व कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

 

अपघातात ठार झालेल्यांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे.
बेलदा येथील अशोक नारायण पंधरे (४९) व हरिहर फुकटजी वाघाये (४९, रा. लाखोरी, जि. भंडारा) हे दोघे बुधवारी रात्री ८.४५ वाजता मोटारसायकलने (क्र.एमएच ३३ डी-४५४४) नागपूरहून बेलदा येथे येत होते. सिंदेवानी पोच मार्गावर नागपूरहून जबलपूरकडे जाणाऱ्या ट्रकची (यूपी ४४ एफ-५८६४) मोटारसायकलला जोरदार धडक लागली. त्यात अशोक पंधरे हे गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावले तर मोटारसायकलवर मागे बसलेले हरिहर वाघाये हे गंभीर जखमी झाले. त्यांना रामटेक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त पसरताच सिंदेवानी गावातील नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. येथे गतीरोधक लावावी, अशी नागरिकांची मागणी होती. तोपर्यंत देवलापार पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी नागरिकांना शांत केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातात मरण पावलेले अशोक पंधरे हे बेलदा येथील आश्रमशाळेत विज्ञानाचे शिक्षक होते.
अपघाताची दुसरी घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंजारटोला शिवारात घडली. नागपूर येथील राजेश सुगंठराव वरठी (२५), धोंडबा मन्या धुर्वे (६१), रामाजी नारायण धुर्वे (५५, दोघेही रा. तिरंगी छर्रा) हे तिघे बुधवारी सायंकाळी मोटारसायकलने (क्र.एमएच ४० यु ८४११) पवनीकडून दाहोदाकडे जात असता बंजारटोला शिवारात भरधाव जीपची मोटारसायकलला धडक लागली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी या तिघांनाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना धोंडबा मन्या धुर्वे हे मरण पावले. अपघातानंतर चालक जीप घेऊन फरार झाला. देवलापार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार झालेल्या जीप चालकाचा शोध घेत आहे.
कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी येथे झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ मरण पावले. मोहम्मद रफिक अब्दुल शेख (२८) आणि शेख मज्जीद शेख रज्जाक अशी त्यांची नावे असून ते कामठी येथील भाजी मंडी येथील रहिवासी आहेत.
बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास हे दोघे भाऊ मोटारसायकलने कळमेश्वरहून नागपूरकडे येत होते. फेटरीजवळील गोदाम परिसरात मागाहून आलेल्या स्कॉर्पिओची (क्र. एमएच ३६-४३३८) दोन मोटारसायकलला जोरदार धडक लागली. या धडकेत पल्सर चक्काचूर झाली व त्यावरील मोहम्मद रफिक हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला तर गंभीर जखमी झालेला त्याचा भाऊ मजीद शेख हा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मरण पावला.
स्कॉर्पिओच्या धडकेने हिरो होंडा स्वार दूर फेकल्या गेला. प्रवीण अजाबराव निंबाळकर (३५, रा. दहेगाव) असे त्याचे नाव आहे. यात तो जखमी झाला नाही. अपघातानंतर चालक स्कॉर्पिओ घेऊन पळून गेला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.