Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तरुणांनी शहिदांकडून प्रेरणा घ्यावी - जगमोहन सिंग
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

स्वातंत्र्यप्राप्ती आणि देशवासीयांच्या हितरक्षणासाठी प्राणाचे मोल देणाऱ्या शहिदांकडून तरूण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहीद भगतसिंग यांचे भाचे प्रा. जगमोहन सिंग यांनी केले. शहिदांच्या

 

कार्याचे स्मरण ठेऊन सरकारनेही लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवावे, असे ते म्हणाले. भगतसिंग विचार मंचतर्फे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद दिनानिमित्त ‘आज की राजनैतिक आर्थिक व सामाजिक परिस्थितीयो में भगतसिंह’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक विभूती नारायण राय होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर आणि लेखक सत्यनारायण शर्मा उपस्थित होते.
याप्रसंगी जगमोहन सिंग यांनी यावेळी इतिहासाचा मागोवा घेतानाच वर्तमानात सरकारला शहिदांच्या बलीदानाचा विसर पडल्याबद्दल खंत व्यक्त केली. सध्याच्या वातावरणात सरकारला शहिदांचे कार्य व त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. देशरक्षणासाठी परकियांशी लढा देऊन ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्या भारतात आज साम्राज्यवाद बोकाळला आहे. आर्थिक गुलामीचे संकट देशावर ओढवले आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यामागेही शेतकऱ्यांना कर्जात बुडवणारे हेच आर्थिक धोरण आहे. ईस्ट इंडिया कंपनी गेली तरी, धोरणं त्यांचीच राबवली जात आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा देशाला विसर पडला आहे. भगतसिंग यांनी कमी वयात तुरुंगात असताना जगाचा इतिहास समजून घेण्यासाठी १४३ पुस्तकांवर अभ्यास करून समाज परिवर्तनाची हाक दिली. तरुणांना बलवान होण्याचा मार्ग दाखवला. पण, त्यांच्याकडून आम्ही काहीही शिकायला तयार नाही. सरकारने लोकांप्रती जबाबदारी ओळखणे जसे गरजेचे आहे तसेच युवकांनीही शहीदांकडून प्रेरणा घेतली तरच उद्याचा भारत घडेल, असे आवाहन सिंग यांनी केले.
पाहुण्यांचे स्वागत हरीष अडय़ाळकर यांनी केले. संचालन गुरप्रित सिंग यांनी केले. कार्यक्रमाला माजी आमदार गिरीश गांधी यांच्यासह भगतसिंग विचार मंचचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.