Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कुटुंब एकत्रित ठेवा -प्रवीण दीक्षित
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

अनेक संस्कृतींपैकी कुटुंब संस्कृती ही प्रमुख आहे. कुटुंब विखुरल्या गेले तर, परिवर्तन घडून येणार नाही म्हणून कुटुंब एकत्रित ठेवा, असा सल्ला पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी दिला. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘शक्य आहे’ या

 

अभियानाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य मृणालिनी फडणवीस होत्या. व्यासपीठावर युवा रुरलचे कार्यकारी संचालक दत्ता पाटील उपस्थित होते.
अलीकडच्या काळात आईवडील आणि मुले फार कमी वेळ एकत्र येतात. आईवडील दोघेही नोकरी करणारे असतील तर, मुलांना ते फार वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे ‘डेव्हलपमेंट कंट्रीज’मध्ये मुले व्यसनाधीन होताहेत. वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत तरी आईवडिलांनी मुलांना पूर्ण वेळ द्यावा, अन्यथा अनेक समस्या निर्माण होतील, असे प्रवीण दीक्षित म्हणाले.
प्राचार्य मृणालिनी फडणवीस यांनी, ‘न बुझनेवाला चिराग’ या शब्दात ‘शक्य आहे’ या अभियानाचे कौतुक केले. दक्षिण आशियात दर पाच मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, परिवर्तनाचा वेग वाढवण्याची गरज आहे. केवळ डिग्री घेतली म्हणजे सुशिक्षित झाले असे नाही तर, पुस्तकी शिक्षणासोबतच इतर ज्ञानही गरजेचे आहे. ‘मिसिंग वूमन’ हे लक्ष्य न बाळगता ‘मिसिंग एज्युकेटेड वूमन’ हे लक्ष्य बाळगा, असा सल्ला प्राचार्य फडणवीस यांनी दिला.
याप्रसंगी दत्ता पाटील यांनी, तीन दिवस आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती पाहुण्यांना दिली. गुजरातच्या प्रवर्तक सोफिया व ओरिसाच्या स्नेहा यांनी सरकारला देण्यात येणाऱ्या निवेदनातील मागण्या वाचून दाखवल्या.
समारोप समारंभापूर्वी आज सकाळी शहरातून एक परिवर्तन मिरवणूक काढण्यात आली. पटर्वधन मैदान येथून निघालेली मिरवणूक पंचशील चौक, लोकमत चौक, मोरभवन चौक, झांशी राणी चौक, मुंजे चौक मार्गे पटवर्धन मैदानावर विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीत १३ राज्यातील ५५० प्रवर्तक व सामान्य नागरिकसुद्धा मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.