Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

नवनीत

अरब लोक आपल्या नवजात मुलांच्या संगोपनाकरिता शहरी वातावरणात उचित नाही मानायचे. ते आपल्या प्रथेनुसार अंगावर पाजण्याकरिता आपल्या मुलांना कुठल्याही दूर वाळवंटातस्थित कुलीन दाईच्या सुपूर्द करायचे. खुल्या वातावरणात मुलांची वाढ चांगली होत असे. त्यांच्या भाषेवरदेखील शहरात वापरल्या जाणाऱ्या संमिश्र आणि तकलादी भाषांचा प्रभाव पडत नसे.

 

या दाई आणि त्यांचे इलाखे आपल्या भाषा आणि संगोपनकार्यात प्रसिद्ध असायचे. नवजात मुलांचे दूध सुटेपर्यंत आणि त्यानंतरही ते या दाईंपाशी राहायचे. मुलांचे संगोपन हाच त्यांचा व्यवसाय होता. या वाळवंटी प्रदेशात मुले घोडेस्वारी, शिकार, तलवारबाजी, पोहणे, नेमबाजीसारखे मैदानी खेळ शिकायचे. शुद्ध भाषा बोलणे, शब्दांचे अचूक उच्चारण, रितीरिवाज, अरबी सभ्यता आणि संस्कृतीचादेखील त्यांच्यावर मोठा प्रभाव पडायचा.
पैगंबरसाहेबांचा जन्म अशा कुटुंबात झाला होता. ज्यात सरदारकी, कुलीनता आणि मानमरातबाची कमतरता नव्हती. मात्र घरात कुणी मिळवणारा नसल्यामुळे पैशांची मात्र वानवा होतीे. पैगंबरसाहेबांचे वडील अब्दुल्लाह यांचे प्रेषितसाहेबांच्या जन्माआधीच निधन झाले होते आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी एकटे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांच्यावर येऊन पडली होती. तरीपण या नवजात मुलाला त्याच्या आई आमिनाने ‘कुर्रा सअद बिनबक्र’ या ठिकाणाहून आलेल्या दाई हलीमा सअदियाला अंगावर पाजण्याकरिता अत्यंत कमी मोबदल्यावर सुपूर्द केले. त्यांचे ठिकाण मक्केहून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि आजही निम्मा रस्ता दुर्गम आणि वाळवंटी डोंगराळ भागातून शोधावा लागतो. दाई हलीमाच्या घरातही दारिद्रय़ाचे साम्राज्य होते; परंतु घरात या चिमुकल्या बाळाचे पाय लागल्याबरोबर संपूर्ण कुटुंब अशा भरभराटीस आले की, त्याचे नाव मानवी इतिहासात प्रलयापर्यंत लौकिक झाले.
अनीस चिश्ती

सूर्यासंबंधी संशोधन करण्यासाठी आतापर्यंत अंतराळात याने पाठविण्यात आली आहेत का?
सूर्य हा आपल्याला सर्वात जवळचा तारा. त्यामुळे विश्वातील इतर ताऱ्यांबद्दल माहिती मिळण्यासाठी आपल्याला सूर्याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. याच हेतूने गेल्या पाच दशकांपासून काही अंतराळयानांना पृथ्वीभोवतालच्या, तर काही अंतराळयानांना थेट सूर्याभोवतालच्या कक्षेत स्थिरावण्यात आले आहे. यात सुरुवातीच्या काळात पायोनिअर, हेलिऑस, सोलर मॅक्झिमम मिशन यासारख्या मोहिमा राबवल्या गेल्या होत्या. यानंतर युलेसिस या नासा व युरोपियन स्पेस एजन्सी या दोन संस्थांच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे सोडलेल्या अंतराळयानाने सूर्यसंशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावली. युलेसिस हे अंतराळयान सूर्याच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी १९९० सालच्या ऑक्टोबर महिन्यात सोडण्यात आले. २००८ सालापर्यंत सक्रिय राहिलेल्या या यानाने सूर्याच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांचा एकूण तीनदा वेध घेतला. आज कार्यरत असलेल्या मोहिमांत सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्वेटरी (सोहो) या कृत्रिम उपग्रहाचा विशेष उल्लेख करावा लागेल. नासा व युरोपियन स्पेस एजन्सी यांच्यातर्फे अंतराळात पाठवल्या गेलेल्या सोहोकडून १९९५ सालापासून सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या घडामोडींचे सतत चोवीस तास बारकाईने निरीक्षण केले जात आहे. सूर्यावर एखादी सौरज्वाला उफाळली की, त्याची सूचना सोहो त्वरित पृथ्वीवर पाठवतो. सूर्यावर होणाऱ्या कंपनांची नोंद आणि सौरवाऱ्यातील विद्युत्भारीत कणांची विश्लेषणात्मक माहितीही सोहोकडून सतत पृथ्वीकडे पाठवली जात असते. अलीकडेच नासातर्फे सूर्याचा त्रिमिती अभ्यास करण्यासाठी स्टेरिओ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले आहे. भविष्यातील महत्त्वाच्या मोहिमांमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात सोडली जाणारी सोलर डायनॅमिक ऑब्झर्वेटरी ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली सौरवेधशाळा महत्त्वाची ठरणार आहे. येत्या काळात भारतातर्फेही आदित्य हे अंतराळयान सौरअभ्यासासाठी पाठविण्यात येणार आहे. श्रीनिवास औंधकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसती काडी आणि मनाशी म्हणायचा मग या जागेवर बांधीन माडी’
अशा कवितांमधून सामान्यांचे शब्दचित्रण चित्रित करून शेकडो वर्षांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून मराठी कवितेला खऱ्या अर्थाने समाजाभिमुख केली बा. सी. मर्ढेकरांनी. बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म फैजपूर येथे १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण धुळय़ात झाले. फग्र्युसन कॉलेजातून बी. ए.ची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ वृत्तपत्रांत, तसेच प्राध्यापकी केली. तथापि १९३८ च्या सुमारास ‘आकाशवाणी’वर नोकरी धरली ती कायमचीच. मर्ढेकरांच्या अगोदर केशवसुतांनी मराठी कवितेला नवे वळण दिले खरे; परंतु औद्योगिक क्रांतीमुळे नवी समाजरचना अस्तित्वात आल्यावर यंत्राच्या खडखडाटात मराठी कविता दिसू लागल्या मर्ढेकरांच्यामुळे. ‘कितीतरी दिवसातून नाही चांदण्यात गेलो’ या कवितेतून यांत्रिक युगात वावरणारा, पण गावाकडची ओढ असणारा यातील द्वंद्व त्यांनी उभे केले. शहरी जीवनाची परात्मभावाची अनुभूती व्यक्त करताना ‘मी एक मुंगी, ही एक मुंगी’सारख्या कवितेतून व्यक्त केली. कवितेतून वेश्या व कामगारांचे दु:खही त्यांनी व्यक्त केले. ‘घन:श्याम सुंदरा, अरुणोदय झाला’ असे म्हणत घडय़ाळाच्या काटय़ाला जुंपलेल्या कामगारांचे जीवन त्यांनी चित्रित केले. उणंपुरं ५० वर्षांचेच आयुष्य त्यांना मिळाले. तीन काव्यसंग्रह, तीन कादंबऱ्या, एक नाटक, चार सांगीतिका एवढेच त्यांचे साहित्य! तथापि त्याचे मोल फार मोठे! कादंबऱ्यांतून त्यांनी ‘संज्ञाप्रवाही’ हा नवा प्रकार रूढ केला. कवितेत तर त्यांनी काही काळ मर्ढेकर युगच निर्माण केले. तथापि समीक्षक मात्र त्यांच्या काही कवितांचा (विशेषत: विज्ञानाच्या) अर्थ लागत नसल्याने प्रश्न निर्माण होतो, असे म्हणतात. असे असले तरी मराठी कवितेला खऱ्या अर्थाने वळण दिले ते मर्ढेकरांनीच! २० मार्च १९५६ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

नदीतले पाणी आटल्यामुळे अनेक मासे किनाऱ्यावर पाण्याविना तडफडत होते. ते दृश्य पाहून जाणारे-येणारे हळहळत होते आणि पुढे निघून जात होते. एकाने ते तडफडणारे मासे पाहिले. तो जवळ गेला आणि एक-एक मासा उचलून पुन्हा नदीच्या पाण्यात सोडू लागला. पाण्यात गेल्यावर तडफडणारा मासा शांत होई आणि पाण्यात सूर मारत पोहू लागे. त्या गृहस्थाचा हळुवारपणे मासे उचलून पाण्यात सोडण्याचा उद्योग चालूच होता. त्याचा हा उपद्व्याप पाहून रस्त्यावरच्या एका माणसाला फार हसू आले. काय वेडा माणूस आहे हा, असे वाटून तो चेष्टेच्या सुरात म्हणाला,‘‘अरे बाबा, हजारो मासे किनाऱ्यावर पाण्याविना तडफडून मरताहेत. नदीच आटलीय तर काय करणार? तू सोडून सोडून असे किती मासे पुन्हा पाण्यात सोडणार आहेस?’’ पाण्यात मासे सोडणाऱ्या गृहस्थाने काहीच उत्तर दिले नाही. शांतपणे तो आपला मासे अलगद उचलत राहिला. त्यांना नदीच्या पाण्यात सोडत राहिला. शेपटी हलवत पाण्यात शिरून मग सुळऽऽकन सूर मारणारे मासे पाहून तो समाधानाने दुसरा मासा उचलायला परत येई. जाणारे-येणारे काहीजण त्याच्या वागण्याची गंमत वाटून थांबून त्याचा उद्योग पाहात होते, तर काही माणसे त्याची टिंगल करत नदीकाठच्या वाळूत बसून राहिले होते. मासे सोडणाऱ्यावर या कशाचाच परिणाम झाला नव्हता. त्याचे काम एकाग्रपणे चालूच होते. एका माणसाला हे पाहून राहवेना. तो मासे पाण्यात सोडणाऱ्या माणसाजवळ येऊन समजावणीच्या सुरात म्हणाला,‘‘भल्या माणसा, अरे तुझ्या या वागण्याला काही अर्थ नाही. सभोवताली पाहा, हजारो मासे पाण्याविना तडफडताहेत. तू एकटा कितींना असा पाण्यात सोडायला पुरा पडणार आहेस. हा वेडेपणा सोडून दे आणि शांतपणे आपल्या घरी जा बरे!’’ हे बोलणे ऐकून मात्र पाण्यात मासे सोडणारा गृहस्थ आपले काम करणे चालूच ठेवून म्हणाला,‘‘बाबा रे, चार-आठ मासे पाण्यात सोडल्याने तुला काहीच फरक पडणार नाही, हे अगदी खरे आहे. पण जे मासे पाण्यात गेल्याने पुन्हा जिवंत होताहेत, आनंदाने पोहताहेत त्यांना नक्कीच फरक पडणार आहे. मला उपदेश करण्याऐवजी तूही माझ्याबरोबर माशांना पाण्यात सोडून जीवदान का देत नाहीस?’’ हातातल्या पॉपकॉर्न, कुरकुरे वगैरेंच्या प्लॅस्टिक पिशव्या, आईस्क्रीम वा कॉफीचे पेले, मिनरल वॉटरच्या, कोल्डड्रिंकच्या प्लॅस्टिक बाटल्या आपण किती सहजपणे बसमधून, गाडीतून, रेल्वेतून बाहेर भिरकावतो. आपण म्हणतो मी एकटा थोडाच घाण करतोय, सगळेच करतात. प्रत्येकजण मनात आणेल तर नक्कीच फरक पडेल.
आजचा संकल्प - स्वच्छ, सुंदर परिसरासाठी मी जागरूक राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com