Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

श्रीनगर येथील ‘राहत घर’ या अनाथाश्रमातील मुले अलीकडेच मुंबईत आली होती. त्यावेळी त्यांनी नवी मुंबईतील तळोजा येथील राखीव सुरक्षा दलाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. गोळीबाराचे आवाज ऐकणे त्यांच्या सरावाचे असले तरी प्रत्यक्ष हाती बंदूक धरल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्सुकता मात्र पाहण्यासारखी होती. आज काही क्षणांपुरती बंदूक हातात घेणाऱ्या या बच्चेकंपनीपैकी काही जण उद्या भारतीय सैन्यात खरोखरची बंदूक हाताळतानाही दिसू शकतील.

हुतात्म्यांसाठी अभिवादन रॅली
उरण/वार्ताहर

देशभरातील शेतकऱ्यांशी निगडित रायगड जिल्ह्यातील चिरनेर चरी व जासई आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डीवायएफआय रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने चरी, चिरनेर तेजासई अशी अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. २२ मार्च रोजी चरी- अलिबाग येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनापैकी २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेला चिरनेर जंगल सत्याग्रह हा एक होय. जंगलाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शांततामयरीतीने सुरू केलेल्या या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी त्यावेळी बेछूट गोळीबार केला. अदाधुंदपणे केलेल्या त्या गोळीबारात आठ शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
पनवेल/प्रतिनिधी :
अन्य राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याने ते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत आणि अशा कार्यकर्त्यांमुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट होत आहे, असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. कामोठे गाव वसाहतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी पनवेलमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ठाकूर बोलत होते. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या कार्यकर्त्यांची पूर्वीच्या पक्षात घुसमट होत असल्याने त्यांनी मोठय़ा विश्वासाने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे, आम्ही या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईला जाऊ शकत नाहीत; परंतु पनवेलमधील काँग्रेस कार्यालयामार्फतच त्यांची कामे होतात. हे कार्यालय ३६५ दिवस आणि २४ तास सुरू असल्याने पक्षाचे कार्य येथे वाढले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अविनाश पालकर, अरुण देवकर, विलास शिंदे, जनार्दन तांबे, राजू काटकर, राजेंद्र भिंगार्डे, विद्याधर बावकर, ज्ञानेश्वर भालेराव आदी अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

वृत्तपत्रांनी शब्दसंपत्ती निर्माण करून मराठी भाषा वाढविली - तलगेरी
प्रतिनिधी :
‘‘इंग्रजीच्या कुरघोडीमुळे सध्या विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले जात असताना महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी मात्र दररोज वेगवेगळी शब्दसंपत्ती निर्माण करून मराठी भाषेची घडण व वाढ करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे,’’ असे मत प्रसिद्ध कोशतज्ज्ञ डॉ. प्रमोद तलगेरी यांनी पुणे येथे व्यक्त केले. इंग्रजीप्रमाणे मराठीतही शब्दकोश संस्कृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मराठी शब्दकोशाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन येथे डॉ. तलगेरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शब्दकोशाचे प्रमुख संपादक प्रा. रामदास डांगे, मंडळाच्या सचिव गौरी देशमुख, सहायक संपादक अशोक प्रभुणे व्यासपीठावर उपस्थित होते. तलगेरी म्हणाले, ‘‘सतराव्या शतकात जर्मन भाषेची अवस्थाही मराठीसारखीच झाली होती. लॅटिन व फ्रेंच या भाषांचे जर्मन भाषेवर आक्रमण झाले होते. त्यावेळी जर्मनीतील विविध वर्गांतील मंडळींनी भाषा वाचविण्यासाठी जागृती केली व जर्मन भाषेचा वापर वाढविला. त्यासाठी सतराव्या शतकातच त्यांनी भाषेचा शब्दकोश तयार केला. भाषेचा वेगवेगळ्य़ा पद्धतीने वापर झाला, तर भाषा वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. सध्या मराठी भाषा केवळ साहित्यात व धार्मिक गोष्टींमध्ये वापरली जाते. इतर क्षेत्रांमध्ये तिचा वापर कमी आहे. मराठीची अवहेलना आपणच करीत आहोत. अशा परिस्थितीत राज्यातील वर्तमानपत्रांनी मात्र वेगवेगळी शब्दसंपत्ती निर्माण करून मराठी भाषा वाढविली आहे.’’
भाषेचे व्याकरण व प्रमाणिकरण शब्दकोशामुळे कळते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘अजून आपली भाषा खऱ्या अर्थाने लिखित भाषा झालेली नाही. शब्दकोशातून भाषेतील शब्द कोठे व कसा वापरावा हे कळते. मात्र, काही शब्द अद्यापही शब्दकोशातच पडले आहेत. महत्त्वाच्या कामांमध्ये मराठी वापरणे कमीपणाचे समजले जाते. अशा परिस्थितीत शब्दकोशाचे काम महत्त्वाचे आहे. पण, शब्दकोशाचे आयुष्य अनादी राहिले पाहिजे. त्यासाठी कायदा झाला पाहिजे व शब्दकोश तयार करणाऱ्या मंडळींना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांना छोटा शब्दकोश देतात. ही संस्कृती मराठीतही रुजली पाहिजे.’’ कर्णिक म्हणाले, ‘‘राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध व्हावे, असे स्वप्न पाहून तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काही प्रकल्प हातात घेतले होते. त्यातील एक प्रकल्प या शब्दकोशाचा होता. त्यानुसार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्ष असताना हा प्रकल्प हाती घेतला. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये विविध कारणास्तव हे काम खंडित झाले होते. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत हे शिवधनुष्य आपण उचलायचे ठरविले व त्यामुळे एक चांगले काम करण्याची संधी मिळाली. राज्याचे कोश दालन समृद्ध आहे. मात्र, हे सर्व कोश व्यक्तीगत किंवा खासगी संस्थांचे होते. मात्र, अशा कोशांच्या निर्मितीत काही मर्यादा येतात. एक अद्ययावत कोश निर्माण करणे ही राज्याची गरज होती. नव्या बहुजन समाजाची भूक भागविण्यासाठी नव्या ज्ञानशाखा होणे गरजेचे आहे. हा शब्दकोश त्यातीलच एक ज्ञानशाखा आहे. त्यात सर्व बोलीभाषा व ज्ञातीतून आलेल्या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. कोणताही शब्दकोश परिपूर्ण नसतो. तो सातत्याने बदलत असतो. त्यानुसार हा कोशही अव्याहतपणे सुरू रहावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महाराष्ट्राला एक दिवस संपन्न शब्दकोश मिळेल.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीता उत्तर्दे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. डांगे यांनी केले.