Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

शांतता, पण वादळापूर्वीची.. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पहिले काही दिवस विविध राजकीय पक्षांची कार्यालये नेत्या-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने गजबजून गेली होती. पण, नंतरच्या काळात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रणनीती आखण्यात गुंतला असल्यानेच की काय, या कार्यालयांच्या आवारात शुकशुकाट दिसत आहे. अर्थात, एकदा का प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली की, मात्र या कार्यालयांना ‘वॉर रूम’चे स्वरूप येणार असल्याने, ही वादळापूर्वीची शांतता असल्याचेच म्हणावे लागेल.

सर्वच रेल्वेसेवांचा खोळंबा
प्रश्न जिव्हाळ्याचे

प्रतिनिधी / नाशिक

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनमाड-इगतपुरी रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जशी प्रलंबित आहे, तशीच पंचवटी एक्स्प्रेसवरील वाढता ताण लक्षात घेऊन नाशिककरांनी केलेली नाशिक-मुंबई दरम्यान ‘कवी कुसुमाग्रज एक्स्प्रेस’ ही नवीन इंटरसिटी गाडी सुरू करण्याची मागणीही आजवर अपूर्णच राहिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असताना याविषयी जाब विचारण्याची अथवा पाठपुरावा करण्याची तसदी स्थानिक खासदारांनी कधी घेतलेली नाही. परिणामी, समस्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याचे स्पष्ट होते.

चलो मुंबई!
भाऊसाहेब : येवडी कुटली धावपळ सुरू हाय, आज भावडय़ाची ?
भावडय़ा : आमच्या ‘भाऊं’च्या तिकीटाचं जवळपास नक्की झाल्याचा ‘मेसेज’ आलाय, मुंबईला जावं लागणार लवकर.
भाऊसाहेब : त्येंच्या तिकीटाचा अन् तुमच्या म्हमईला जान्याचा काय संबंध ?
भावडय़ा : वेळ आली तर तिथे आपली शक्ती दाखवायला लागेल, त्यामुळे सगळ्यांनी मुंबईला या, असा भाऊंचा आग्रह आहे.
भाऊसाहेब : नशीबवान म्हनायची तुमी पोरं, समद्यास्नी फुक्कटच्या फाक्कट म्हमईवारी घडनार.
भावडय़ा : मग भाऊ तसा जीव लावतात आम्हाला सगळ्यांना.

‘शैक्षणिक अजेंडय़ावर लक्ष केंद्रित करावे’
विविध सर्वेक्षणांमधून आपल्याला सध्याच्या शैक्षणिक दुरावस्थेबाबत धक्कादायक माहिती मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत चौथीच्या विद्यार्थ्यांला धड वाचता देखील येत नाही, तर दहावी पर्यंत मजल मारलेल्या अनेक विद्यार्थ्यांना लिहीताना अडचणी येतात. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा विचार करता वेगवेगळी मते प्रदर्शित होऊ शकतील, गुणात्मक शिक्षणाचा अभाव हे कारण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरते. हे लक्षात घेता, खासदारासारख्या देशपातळीवर लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याने या विषयाकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.

मुद्रांक शुल्क थकबाकीदारांमध्ये बडय़ांची मांदियाळी
प्रतिनिधी / नाशिक

कायद्याचा धाक सर्वसामान्य बाळगत असले तरी समाजाती बडय़ा व्यक्तींना त्यांची पर्वा नसते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. एखाद्या महिन्याचे वीज बील थकित असेल तर कंपनीबद्दल वीज पुरवठा खंडित होईल की काय याची भीती बाळगणारा सामान्य माणूस एकीकडे आणि लाखो रुपयांची थकबाकी असूनही निर्धास्त राहणारे दुसरीकडे असे चित्र अनेकदा दिसते.

पंचवटीत तरूणाची हत्या; दोघांना अटक
नाशिक, १९ मार्च / प्रतिनिधी

शहरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच पंचवटीतील आरटीओ कॉर्नर परिसरात किरकोळ कारणावरून एका टोळक्याने तरूणाची हत्या केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागात चायनीज तसेच अंडाभुर्जीच्या गाडय़ांजवळच ग्राहकांकडून अवैधपणे मद्यपान होत असते. पोलिसांकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला त्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री आरटीओ कॉनर परिसरात एका चायनिजच्या गाडीवरील वादविवादातून युवकाची हत्या होणे ही घटनाही त्याचाच परिणाम म्हणावी लागेल. मोहनसिंग परदेशी, अमोल सानप व उमेश मोकळ हे मित्र चायनीज गाडीवर भोजन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे गाडीमालक भगीरथ नाईकवाडे यांच्याशी किरकोळ कारणावरून वादंग झाले. या वादाचे वादाचे पर्यावसन खूनी हल्ल्यात झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात अमोल सानप याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी उमेश हा देखील गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोरांनी पोबारा केला होता. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. या प्रकरणी हातगाडीचालक भगीरथ गेणू उर्फ राजाभाऊ नाईकवाडे याच्यासह त्याचा साथीदार विकास शांताराम सूर्यवंशी (दत्तनगर) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दीपक बाबूराव जगताप व त्याचा एक मित्र असे दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हल्ल्यात मरण पावलेला अमोल एल.एल.बी.च्या तृतीय वर्षांत शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वी पाथर्डी परिसरात एका तरूणाचा त्याच्या सहकाऱ्यांकडून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर मुंबई नाका परिसरात दोरीने बांधलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहादा भाजपच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस
शहादा / वार्ताहर

राजकीय संघटन शक्तीचा उपयोग आदिवासी, दलित व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी होत नसेल तर राजकारण करू नये असे परखड विचार ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांनी शहर-तालुका भाजपच्या बैठकीत मांडले. येथील अनुसया संकुलामध्ये प्रतिमा माळी व मनलेश जयस्वाल यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला सुमारे ३०० कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील बससेवा, वीज भारनियमन, बंद ट्रान्सफॉर्मर्स, अकार्यक्षम पाणी पुरवठा योजना, रस्त्यांची निकृष्ट कामे, रोजगार, रेशनवरील धान्य, रॉकेल, वनजमिनी आदी संदर्भात ५७ तक्रारी कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्या. या तक्रारींकडे भाजपचे जिल्हास्तरीय नेते लक्ष देत नाहीत, असाही कार्यकर्त्यांचा सूर होता. वीज वितरण कंपनी व शहादा नगरपालिका तसेच एस. टी. विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे येत्या २३ मार्च रोजी तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जाण्याचे ठरले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेण्याचे निश्चित केले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

वादळी वारा व गारपीटीमुळे जिल्ह्य़ातील द्राक्षबागायतदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष पुंडलिक थेटे यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गारपीटीमुळे महाराष्ट्रातील काही भागात द्राक्षाबरोबरच कांदा, गहू या पिकांचेही नुकसान झाले आहे. नाशिकमधील चार ते पाच हजार एकर द्राक्ष क्षेत्राला गारपीटीचा फटका बसला आहे. बागायतदारांनी प्रचंड खर्च करून डावण्या रोगापासून बागा वाचवल्या, आर्थिक मंदीच्या सावटाने बाजारभाव कोसळलेले असताना गारपीटीचा तडाखा बसला आहे. बँकांनी मार्च अखेरीमुळे वसुलीसाठी तगादा लावला आहे, अशा परिस्थितीत वसुली पुढे ढकलण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जून-जुलैमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले तेव्हा पंचनामे करण्यात आले. परंतु काही भागात अद्याप भरपाई मिळालेली नाही, शासनाने वास्तवतेच्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी भारतीय कृषक समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन देताना जाधव, थेटे यांच्यासह तानाजी नामाडे, बबन आवारे, बाळासाहेब मते, दीपक गायकवाड, मयुर गौल, सागर रहाणे, बाळासाहेब अहिरे, नरेंद्र पाटील, सोमनाथ पिंगळे आदी उपस्थित होते.

‘केटीएचएम’मध्ये यशवंतराव चव्हाण, अ‍ॅड. ठाकरे यांच्या प्रतिमांचे अनावरण
नाशिक / वार्ताहर

महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक व कृषी औद्योगिक विकासामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनीच महाराष्ट्राच्या विकासाला निश्चित दिशा दिली. राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या, पंचायत राजचा प्रयोग यशस्वीपणे राबविली, आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक पी सवलतीचा क्रांतीकारक निर्णय महाराष्ट्र राबविला असे विचार मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. येथे के. टी. एच. एम. महाविद्यालयातर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण व कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी प्रास्तविक केले. यशवंतराव चव्हाण व कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे अनावऱ्ण अ‍ॅड. ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मविप्रचे सेवक संचालक प्रा. डॉ. अशोक पिंगळे यांनी यशवंतराव चव्हाण आणि अ‍ॅड. ठाकरेोयंनी बहुजन समाजाच्या विकासासाठी अविरत परीश्रम घेतल्याचे सांगितले. मविप्रच्या विकासात अ‍ॅड. बाबूराव ठाकरे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले. प्रा. अशोक सोनवणे यांनीही यशवंतराव चव्हाण व अ‍ॅड. ठाकरे यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले.