Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

जळगाव विमानतळाचे अस्तित्व केवळ फलकावरच
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / जळगाव

जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ‘जळगाव विमानतळ’ हा फलक स्थानिक नागरिकांना हमखास पहावयास मिळतो. ते पाहून सर्वाना आनंद होत असला तरी फलक सोडला तर हे विमानतळ केवळ नावापुरतेच आहे. गेल्या अडीच दशकांपासून राजकीय स्पर्धा व अनास्थेपोटी आजतागायत या विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू होवू शकले नाही. महत्वाची बाब म्हणजे ते केव्हा होईल, हे निश्चितपणे कुणालाही सांगता येणार नाही.

खान्देश मिलची जागा सरकारजमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
१० दिवसांत जागेबद्दलचे पुरावे सादर करण्याचे आदेश

वार्ताहर / जळगाव

सुमारे साडे तीन हजारावर कामगारांना देशोधडीला लावून बंद पडलेल्या येथील खान्देश स्पिनींग मीलची जागा सरकारजमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली आहे. संबंधितांना दहा दिवसात पुरावे सादर करावयास सांगण्यात आले आहे. जिल्हा काँग्रेसचे उल्हास साबळे यांनी तसेच मील कामगार युनियनचे सचिव एस. आर. पाटील यांनी अनेक वर्षांपासून कामगारांच्या हितासाठी आंदोलन छेडले होते.

बीएसएनएलच्या टेस्टिंग विभागाचा ग्राहकाला असाही मनस्ताप
वार्ताहर / मालेगाव

सध्याच्या वाढत्या स्पर्धेमुळे सौजन्याची वागणूक देण्यापासून माफक सेवा पुरविण्यापर्यंत नानाविध क्लुक्तया वापरून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ सुरू असताना बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्याने सौजन्याची एैशी की तैशी करत केलेल्या बेमूर्तखोरपणामुळे गुरूवारी कॅम्प भागातील एका ग्राहकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.

जळगावमध्ये निवडणूकविषयक १४ हेल्पलाइन
जळगाव / वार्ताहर

जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली असल्याचे जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी सांगितले. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचे ठिकाण एसएमएसव्दारे कळू शकेल असा उपक्रम यावेळी जळगाव जिल्हा प्रशासन राबवित असून त्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुका स्तर मिळून १४ हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही कुणाल कुमार यांनी दिली.

निवडणूक आचारसंहितेविषयी कार्यशाळा
नंदुरबार / वार्ताहर

पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी आचारसंहिता व मतदानाविषयी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुका शांततेत, सुव्यवस्थीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका राहणार असल्याने आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन होते किंवा नाही याकडे लक्ष देण्याची गरज राव यांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस अधीक्षक केशव पाटील, अपर अधीक्षक यु. के. सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी टी. एम. बागूल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जी. पी. दाणेज आदी उपस्थित होते. मतदानाचा अमूल्य अधिकार निर्भयपणे बजावता आला पाहिजे, त्यांच्यावर दडपण आणणे तसेच आमिष दाखविण्यासारखए प्रकार होणार नाही, यासाठी लक्ष देण्यात यावे, मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी शेजारील राज्यातून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे असून अवैध हत्यारे तसेच समाजकंटक येणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज राव यांनी व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक केशव पाटील यांनी गृह विभागाकडून आलेल्या सूचना तसेच निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेबद्दलचा सूचनाचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणे पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. संवेदनशील गावे तसेच मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. या कामी पोलीस आणि महसूल विभागाशी समन्वयक साधावा असेही ते म्हणाले. आदर्श आचारसंहिता तसेच गृह विभागाकडील सूचना पोलीस अधीक्षकांनी वाचून दाखवल्या. कार्यशाळेत विचारण्यात आलेल्या विविध शंकांवर यावेळी चर्चा झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी दाणेज यांनी आभार मानले.

धावत्या रेल्वेतून पडल्याने जवानाचा मृत्यू
मनमाड, १९ मार्च / वार्ताहर

लष्करातील हवालदार या पदावर कार्यरत असलेले संतोषकुमार शर्मा (३५) यांचा धावत्या रेल्वेगाडीतून पडल्याने गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. मनमाड-दौंड लोहमार्गावर कोपरगाव येथे गुरूवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेनंतर लष्कराच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी मनमाडला धाव घेतली. संतोषसुमार हे उपचारासाठी पुणे येथे चालले होते. त्यांच्या सोबत चार सहकारीही होते. हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस या गाडीने ते प्रवास करीत असताना कोपरगाव रेल्वे स्थानकानजीक संतोषकुमार हे नैसर्गिक विधीसाठी म्हणून उठले असता धावत्या गाडीतून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला. संतोषकुमार हे धरमगड पोसी, जिल्हा मुनेर, मध्यप्रदेश येथील निवासी आहेत. मिलट्रिमध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची शवचिकीत्सा करण्यात आली. लोहमार्ग पोलीस निरीक्षक श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक पवार याप्रकरणी तपास करीत आहेत.

नंदुरबार जिल्ह्य़ातील ११ लघु बंधारे कोरडेठाक
धुळे पाटबंधारे विभागाची माहिती
वार्ताहर / नंदुरबार

उन्हाची तीव्रता वाढू लागली असताना प्रशासनापुढे पाणी टंचाईला तोंड देण्याचे संकट उभे ठाकरे आहे. जिल्ह्य़ातील पाणी साठय़ांवरही उष्णतेचा परिणाम जाणवू लागला असून ३६ पैकी ११ लघु पाटबंधारे कोरडे झाले असल्याची माहिती धुळे पाटबंधारे विभागाने दिली आहे. जिल्ह्य़ातील रंगावली या एकमेव मध्यम प्रकल्पात ६०.८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर २५ लघु प्रकल्पांमध्ये २२.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नवापूर तालुक्यात हळदाणी २७ टक्के, खडकी १४, खेकडा २८, खोकसा २५, मेंढीपाडा ४२, मुगधन ४१, नावाली २०, रायंगण ४०, सोनखडकी २९, सुलीपाड ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नंदुरबार तालुक्यात आंबेबारा ५१, धनीबारा १५, खोलघर ४०, कोकणीपाडा ७, पावला ६, शनिमांडळ ५, सिरवाडे ५७, ठाणेपाडा (२)१७, ठाणेपाडा (१), वासदरा ३३, वसालाय १२ टक्के साठा आहे. शहादा तालुक्यात दुधखेडा, खापरखेडा, कोंढावळ, लंगडीभवना, लोंढरे, शहाणे शून्य टक्के, राणीपूर ३५ टक्के, अक्कलकुवा तालुक्यात खडकुना ४८, तळोदा तालुक्यात गहुपाडा ३६ टक्के, गडावली, पाडळपूर, रोझवा, सिंगसपूर शून्य टक्के, धडगाव तालुक्यात उमराणी शून्य याप्रमाणे एकूण ३७ प्रकल्पात २७.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुलांचा संशयास्पद मृत्यू; चौकशीची मागणी
वार्ताहर / मालेगाव

येथील कलेक्टर पट्टा भागातील दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकारावर त्यांच्या नातेवाईकांचा अजिबात विश्वास बसत नसून अघोरी कृत्यासाठी कुणीतरी त्यांची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या नातेवाईकांनी येथील प्रांताधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या शनिवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या योगेश नितीन चौधरी (१०) व अक्षय विजय पाटील (९) यांचे मृतदेह सोमवारी गिरणा नदी पात्रातील पाण्यात तरंगताना आढळून आले होते. शवविच्छेदनात पाण्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावरून ही मुले अंघोळीसाठी नदीपात्रात गेले असावेत आणि तेथेच पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय या मुलांच्या नातेवाईक व्यक्त करीत आहेत. मृत मुलांचे वडील नितीन चौधरी व विजय पाटील यांनी प्रांताधिकारी अजय मोरे व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ज्या ठिकाणी मुलांचे मृतदेह आढळून आले, त्या डबक्यात मुले बुडतील एवढे पाणीही नव्हते तसेच मृतदेहापासून काही अंतरावर त्यांचे कपडे आढळून आले होते. त्यामुळे तीन दिवस वाऱ्याने हे कपडे उडून कसे गेले नाहीत किंवा ते कुणी तेथून उचलले कसे नाहीत यासारखे प्रश्न चौधरी व पाटील यांनी उपस्थित केलेले आहेत. या मुलांचा घातपात करून प्रेत डबक्याच्या पाण्यात फेकून दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.