Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या एक संस्थापिका जसवंतीबेन पोपट यांचा सत्कार करताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव.

‘‘लिज्जत’ने नवनवीन उत्पादनांची निर्मिती करावी’
पुणे, १९ मार्च/ प्रतिनिधी

गेल्या पन्नास वर्षांत हजारो महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करणाऱ्या श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेने पुढील पन्नास वर्षांचा विचार करून नवनवीन उत्पादनांची निर्मिती करावी. या संस्थेने गेल्या पन्नास वर्षांत महिला वर्गात जो आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वयंसिद्धता निर्माण केली ती वाखाणण्याजोगी आहे. असे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे सांगितले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

सेंट जोसेफच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोहाना यांच्याविरुद्ध गुन्हा
पुणे, १९ मार्च/ प्रतिनिधी

फी न भरल्याच्या कारणास्तव सुमारे २५ विद्यार्थिनींना शाळेत अटकाव करून ठेवल्याबद्दल सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोहाना यांच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेजाळ यांनी दिली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नोटिशीचे राजकारण..
पूर्वी एका राजकीय पक्षात राहून मोठमोठी पदे उपभोगलेल्या एका जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याला नुकतीच आयकर खात्याची नोटीस मिळाल्याने नाही म्हटलं तरी तो सैरभैर झालाय. ज्या राजकीय गुरुशी फारकत घेऊन त्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करून, आपल्या आद्यगुरूवर शाब्दिक तोफा डागल्या. त्याची या नोटीशीने मात्र पाचावर धारण बसल्याचे बोललं जातंय. ही नोटीस पाठविण्यामागे आपला पूर्वाश्रमीचा राजकीय गुरू असल्याचे हा पदाधिकारी सध्या सांगत आहे.

‘जमत नसेल, तर पाणीपुरवठा विभाग ‘बीओटी’वर देऊन टाका’
पुणे, १९ मार्च/प्रतिनिधी

शहरात निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गाजला. नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त करूनही ठोस उत्तर न मिळाल्यामुळे अखेर ‘‘आयुक्त साहेब, पाणी देता येत नसेल तर पाणीपुरवठा विभागाचेच खासगीकरण करता येईल का ते पाहा किंवा हे काम ‘बीओटी’वर देऊन टाका,’’ अशा शब्दांत सभागृहनेत्यांनी प्रशासनावर टीका केली.
सर्वसाधारण सभा सुरू होताच दिलीप उंबरकर यांनी पाण्याचा प्रश्न सभागृहात छेडला आणि एका मोठय़ाच विषयाला तोंड फुटले.

वळसे पाटील वाईट पायगुणाचा मंत्री- आढळराव
पिंपरी, १९ मार्च / प्रतिनिधी

शिवसेनेने शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर करताच पहिल्याच दिवशी राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वंयघोषित उमेदवार विलास लांडे यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. संपूर्ण महाराष्ट्रात विजेची बोंब करणारे आणि ऊर्जाखात्याची वाट लावून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांनी अर्थखाते स्वीकारताच पहिल्याच वर्षी तुटीचा अर्थसंकल्प देत स्वत: च्या वाईट पायगुणाचा प्रत्यय दिला, अशी खिल्ली आढळराव यांनी उडविली.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून
पुणे, १९ मार्च / प्रतिनिधी

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. आंबेगाव खुर्द येथे शनिनगरमध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. हरिदास कोंडिबा साठे (वय ५५) याला या प्रकरणी हवेली पोलिसांनी अटक केली. साठे याने त्याची पत्नी साखराबाई (वय ५०) यांचा चाकूने भोसकून खून केला. साठे याची सून संगीता आत्माराम साठे (वय २३) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखराबाई यांच्या चारित्र्यावर हरिदास हा कायम संशय घेत असे. या कारणावरून त्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत. याचा राग मनात धरून साठे याने आज पहाटे अडीचच्या सुमारास साखराबाई यांच्या छातीवर व पोटावर चाकून वार करून त्यांचा खून केला. हवेली पोलिसांचे सहायक निरीक्षक देशमुख या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

वरुण गांधी यांचा निषेध
पुणे, १९ मार्च/ प्रतिनिधी

वरुण गांधी यांनी विशिष्ट धर्मियांविषयी केलेल्या वक्तव्याचा भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघातर्फे निषेध करण्यात आला आहे.महासंघाचे महासचिव डॉ. जय ओतूरकर यांनी वरुण गांधी यांचा पक्ष व त्यांच्या सहयोगी पक्षाने दाढी राखणाऱ्या एका समूदायाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याच्या लांच्छनास्पद वक्तव्याने आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्याबाबत योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुहास पळशीकर यांचे उद्या व्याख्यान
पुणे, १९ मार्च/ प्रतिनिधी

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांचे व्याख्यान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘पट निवडणुकीचा’ हा व्याख्यानाचा विषय आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभरात आणि राज्याराज्यात नव्या आघाडय़ा जन्म घेऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत देशात कोणती समीकरणे आकार घेणार, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार, तिसऱ्या आघाडीचा कितपत प्रभाव पडणार, या सर्व विषयांचा वेध प्रा. पळशीकर या व्याख्यानातून घेणार आहेत. येत्या शनिवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

शांताराम जांभुळकर यांच्या नियुक्तीने मुळशीला मिळाली लाल दिव्याची गाडी
पौड, १९ मार्च/वार्ताहर

मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम मारुती जांभुळकर यांची भारत सरकारच्या खाद्यप्रक्रिया मंत्रालयाच्या राष्ट्रीय समितीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. जांभुळकर यांना मिळालेल्या या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे मुळशीच्या राजकीय इतिहासात प्रथमच लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. खाद्यप्रक्रिया मंत्रालयाचे विशेष कार्याधिकारी संजय मिश्रा यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. जांभुळकर हे अर्थ मूव्हर्स संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तर तालुक्याचे अध्यक्ष आहेत. अर्थ मूव्हर्स व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील दोनशे कामगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. वंदे मातरम संघटनेचे ते कार्याध्यक्षही आहेत. वारकरी महामंडळाकडून त्यांना ‘समाजभूषण’ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. हिंजवडी गावाच्या म्हातोबा पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. शेती, सहकार, क्रीडा, धार्मिक आणि उद्योजक आदी क्षेत्रात जांभुळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची भारत सरकारने या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीने हिंजवडी गावात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, आचारसंहितेमुळे मात्र ग्रामस्थांना त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेता आला नाही.

रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग
पिंपरी, १९ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील एका शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा रिक्षावाल्या ने विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली. पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे. महेश संभाजी शहाणे (वय ४४, रा. राम कॉलनी, शिवनगरी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षावाल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. चिंचवडच्या फतेचंद जैन विद्यालयात पाचवी इयत्तेमध्ये शिकणारी मुलगी चिखलीत राहते. ती नेहमी शाळा सुटल्यावर रिक्षातून खंडोबा माळ आकुर्डी इथपर्यंत जाते. दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने सध्या शाळा दुपारी अडीच ते पावणेसहा वाजेपर्यंत असते. आरोपीने तिला कच्छी दाबेली देतो, असे सांगून दळवीनगर पुलावर तिच्याशी अश्लील चाळे केले. ती रडू लागल्यावर तिला त्याने खंडोबा माळ येथे सोडून दिले. तिने घडला प्रकार चुलत भावाला सांगितला. त्याने ही माहिती मुलीच्या वडिलांना सांगितले. त्यांनी रिक्षा चालकाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.