Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
राज्य

डॉ. नरेंद्र जाधव यांना रोटरी क्लबचा नाशिक भूषण पुरस्कार
नाशिक, १९ मार्च / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांना नाशिक भूषण पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २२ तारखेला सायंकाळी ५.३० वाजता के.टी.एच.एम. महाविद्यालयातील रावसाहेब थोरात सभागृहात मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या उपस्थितीत त्याचे वितरण होणार आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. अर्थ व शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष एन. बी. पाटील, सचिव प्रकाश पानसरे, जयंत भिंगे व नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी केले आहे.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतिपथावर
श्रीराम पुरोहित, कर्जत, १९ मार्च

माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘दस्तुरी नाक्या’पासून अगदी जवळच असलेल्या अमन लॉज रेल्वे स्थानकापासून माथेरान रेल्वे स्टेशनपर्यंत मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू व्हावी, यासाठी माथेरानचे नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची सक्रिय साथ मिळाल्यामुळे आता ही सेवा लवकरच प्रत्यक्षात सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासाठी डॉ. मुणगेकर यांना समस्त माथेरानवासीयांच्या वतीने धन्यवाद दिले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाकडून मात्र अद्यापही यासंबंधी काहीही सांगण्यात आलेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाई धरण एमएमआरडीए बांधणार
ठाणे/प्रतिनिधी

ठाण्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी तोडगा ठरणारे सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाचे शाई धरण एमएमआरडीएने बांधण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ठाण्याला मुबलक पाणी देण्याचा निर्णयही झाल्याचे समजते. ठाण्याची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून आजमितीस लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे पाणी असले तरी २०२० नंतर या शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. सध्या एमआयडीसी, मुंबई महापालिका, स्टेम आणि पालिकेची स्वत:ची योजना याच्या माध्यमातून ठाण्याला ४८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. मात्र भविष्यातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेप्रमाणे ठाण्याचेही स्वतंत्र धरण असावे, अशी मागणी होत होती.

पर्यावरण बचाव जनजागृती फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली, १९ मार्च/वार्ताहर

अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास-खोपोली शहर समिती व खालापूर तालुका समितीच्या पुढाकाराने हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक सभा, लायन्स व रोटरी क्लब, जनता विद्यालय-हरित सेना इत्यादी खोपोलीतील संस्थांच्या सहकार्याने मंगळवारी काढण्यात आलेल्या पर्यावरण बचाव जनजागृती फेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला.

निवडणूक आचार संहितेच्या बडग्याने
पुनर्वसन बैठकीस फास पण बेकायदा
सुनावणीचा मात्र अट्टाहास !

जयंत धुळप

लोकसभा निवडणुकीनिमित्त लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उल्घंन केल्यास त्वरीत कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देणारे रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. निपुण विनायक यांचे रायगड जिल्हा प्रशासन मात्र या आचारसंहितेचा अर्थ आपल्याच सोयी नुसार लावून जिल्ह्यात काम करीत असल्याचे निष्पन्न होत आह़े

राबोडीत शांततेसाठी मुस्लिम संघटनांचा पुढाकार; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३४ जणांना अटक
ठाणे, १९ मार्च/प्रतिनिधी

दंगलीनंतर राबोडीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता मुस्लिम महिलांनीसुद्धा पुढाकार घेतला असून पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी दिवसभरात केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३४ जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून राबोडीत उसळलेल्या दंगलीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबाबत अश्वासित करण्यासाठी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त तडवी यांनी आज आफताब मेडिकल व रेहमान हॉटेलजवळील सुमारे ५० महिलांशी चर्चा केली. या चर्चेत दंगलीविषयी महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत यापुढे अशी घटना घडल्यास आम्ही पोलिसांसोबत राहू, असे आश्वासन देण्यात आले.दरम्यान दंगलीतील आरोपींना अटक करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून दिवसभरात कोम्बिंग ऑपरेशनांतर्गत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उद्या सकाळपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याची माहिती देशमाने यांनी दिली.

चवदार तळे सत्याग्रहाचा आज ८२ वा वर्धापनदिन
महाड, १९ मार्च/वार्ताहर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समानतेची ज्योत पेटविली. त्या दिवशी चवदार तळ्याचे पाणी सर्वांना खुले करून दिले. या ऐतिहासिक घटनेचा ८२ वा वर्धापनदिन उद्या (शुक्रवारी) येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यातून सुमारे एक लाख आंबेडकर अनुयायी येथे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर सभागृहामध्ये राष्ट्रीय प्रबुद्ध संघाची सभा होणार आहे. येथील क्रांतिस्तंभाच्या मैदानावरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

देवरुख महिला विद्यालयास एल अँड टीकडून ग्रंथभेट
देवरुख, १९ मार्च/वार्ताहर- देवरुखातील सावित्रिबाई फुले महिला विद्यालयाला लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाच्या हेतूने ग्रंथसंच भेट देण्यात आला. व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील १६८ पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे. यावेळी महिला विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. नलिनी भुवड, चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव राम देशपांडे, बेल्जियमचे प्रतिनिधी डॉ. ब्रॅम आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे समृद्ध जीवन हे शिक्षणाचे उद्दिष्ट असून विविध विषयांवरील माहिती, अनुभव व प्रयोगांचे शालेय स्तरापासून उपयोजन झाले तरच शिक्षण प्रक्रिया खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते. या भूमिकेतून ग्रंथभेट देण्यात आल्याचे ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिक रंजना भोसले, शिक्षक काका बोधले यांनी सर्वाचे आभार मानले.