Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा

गंभीर, द्रविड, तेंडुलकरच्या अर्धशतकाने मिळवले नियंत्रण; भारत केवळ एका धावेने पिछाडीवर
हॅमिल्टन, १९ मार्च / पीटीआय

भारताने आज सावध पण, आश्वासक फलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर नियंत्रण मिळवले. आघाडीच्या फलंदाजांनी रचलेल्या मजबूत पायामुळे भारतीय संघाला आज दुसऱ्या दिवसअखेर भक्कम आघाडी घेण्याची जणू हमीच मिळाली आहे. वीरेंद्र सेहवाग नाहक धावबाद झाल्यानंतर गौतम गंभीर (७२), राहुल द्रविड (६६) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद ७०) या आघाडीच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंडच्या २७९ धावांना दिवसअखेर ४ बाद २७८ धावांचे उत्तर देता आले असून न्यूझीलंडच्या धावसंख्येशी बरोबरी साधण्यासाठी त्यांना केवळ एक धावेची गरज आहे. आजचा खेळ संपला त्यावेळी ४२व्या कसोटी शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या सचिनला डावखुरा युवराज सिंग ८ धावा काढून साथ देत होता. न्यूझीलंडच्या माफक धावसंख्येला उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा न स्वीकारता सावध पण, आश्वासक खेळ केला. असा खेळ करताना त्यांना त्यांच्या नैसर्गिक फलंदाजीला काहीसा मुरडही घालावा लागला पण, दिवसअखेर ते सारे भारतीय संघाच्या पथ्यावरच पडले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १३५ चेंडूंना सामोरे जात नाबाद ७० धावांची खेळी सजवली. त्यात ११ चौकारांचा समावेश होता. वैयक्तिक १३ धावांवर असताना त्याचा चुकलेला पूलचा फटका टिपण्यात प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीला अपयश आले. त्याचा एक अवघड झेल टिपण्यात डॅनियल फ्लिनही मिडविकेटला अपयशी ठरला. हे दोन अपवाद वगळता सचिनने एकही संधी न देता भारताचा किल्ला लढवला.

दीडशे धावांची आघाडी उत्तम ठरेल -द्रविड
हॅमिल्टन, १९ मार्च / पीटीआय

खेळपट्टी फलंदाजीस काहीशी कठीण असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात १५० धावांची आघाडी उत्तम ठरेल, असे मत भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविडने आज दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केले. नेमक्या किती धावांची आघाडी असणे गरजेचे आहे, हा प्रश्न नाही. आजची स्थिती मात्र, समाधानकारकच आहे. खेळपट्टी पहिल्या दिवसाप्रमाणेच ठणठणीत असून नव्या चेंडूवर येथे धाव काढणे वाटते तेवढे सहज नाही, असेही त्याने सांगितले.

आफ्रिकन वर्चस्व
कांगारूंचा २०९ धावांत खुर्दा
डेल स्टेनचे ५६ धावांत ४ बळी
दक्षिण आफ्रिका बिनबाद ५७
केप टाऊन, १९ मार्च / ए. पी.
डावखुरा फिरकी गोलंदाज पॉल हॅरिस डेल स्टेन व एन्टीनी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे येथील तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला २०९ धावांतच गुंडाळले. चहापानाला ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १५८ धावांतच तंबूत परतला होता. चहापानानंतर पहिल्याच षटकात हॅरिसने जम बसलेल्या हॅडिनला पायचीत करून पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक हादरा दिला.६ बाद १५८ वरून मॅक्डोनाल्ड आणि मिशेल जॉन्सन जोडीने सातव्या विकेटसाठी ३२ धावांची भर टाकली. मात्र मखाया एन्टीनीने एकाच षटकांत मॅक्डोनाल्ड आणि पीटर सिडल यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून ऑस्ट्रेलियाची ८ बाद १९० अशी अवस्था करून टाकली.

पाचव्या फेरीत आनंदची गाठ इव्हानच्युकशी
नाइस (फ्रान्स), १९ मार्च / पीटीआय

विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि यूक्रेनचा व्हॅसिली इव्हानच्युक यांच्यात अंबर ब्लाइंडफोल्ड आणि जलदगती बुद्धिबळ अिजक्यपद स्पध्रेच्या पाचव्या फेरीत उद्या लढत रंगणार आहे.आनंदची या स्पध्रेत चांगली कामगिरी होत नसली तरीही गुरुवारच्या विश्रांतीनंतर त्याच्या खेळात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक फेरीत एक ब्लाइंडफोल्ड आणि एक जलदगती सामन्याचा समावेश असलेल्या या स्पध्रेत आनंदने आठपैकी चार गुण कमविले आहेत.

वेस्ट इंडिजवर आठ विके टस्ने मात
तिसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलियाशी लढत

सिडनी, १९ मार्च/ पीटीआय
महिला विश्वचषक स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीमध्ये भारताने आज वेस्ट इंडिजला आठ विकेटस्ने धूळ चारली असली तरी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळविल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिजवर विजय मिळविल्यानंतर जर ऑस्ट्रेलिया इंग्लंडकडून पराभूत झाली असती तर भारताला स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचण्याची संधी होती. आता तिसरे स्थान पटकाविण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा
शनिवारी होणारा सामना जिंकावा लागेल.

विंडिज-इंग्लंड पहिली एकदिवसीय लढत आज दोन्ही संघांचे कर्णधार दुखापतीमुळे त्रस्त
गयाना, १९ मार्च / एएफपी

कसोटी मालिकेपाठोपाठ रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रभुत्व मिळविल्यानंतर आता यजमान वेस्ट इंडिज संघ गयाना नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तथापि, इंग्लंड संघाला मात्र कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या दुखापतीची चिंता सतावते आहे.

तेंडुलकर, पेस आणि भुतियाकडून प्रेरणा मिळाली -दिलीप तिर्की
भुवनेश्वर, १९ मार्च / पीटीआय

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टेनिसपटू लिएंडर पेस आणि फुटबॉलपटू बायचुंग भुतिया हे खेळाडू वयाचे बंधन न बाळगता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. या दिग्गजांच्या कामगिरीपासून प्रेरणा मिळाली, असे मत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा हॉकीपटू हा विक्रम नोंदवण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या भारताचा सिनियर खेळाडू दिलीप तिर्कीने व्यक्त केले.

पहिल्या आयपीएलद्वारे ९१ कोटी रुपयांचा प्राप्तिकर
नवी दिल्ली, १९ मार्च/पीटीआय

देशात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेद्वारे प्राप्तिकर विभागास ९१ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. गतवर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने ही स्पर्धा व्यावसायिक सेवांतर्गत येत असल्यामुळे ती करास पात्र असल्याचे जाहीर केले होते. साहजिकच स्पर्धेतील खेळाडू, पंच, प्रशिक्षक, समालोचक यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातून उद्गम कर (टीडीएस) कापून घेण्यासंबंधीही केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने स्पर्धा संयोजकांना सूचना केली होती. त्यानुसार संयोजकांनी कर कापला होता. महामंडळाचे सदस्य (उत्पन्न) सरोज बाला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की १९६१च्या प्राप्तिकर कायद्यानुसार खेळाडू, पंच, प्रशिक्षक, समालोचक, फिजिओ हे एखाद्या स्पर्धेचे व्यावसायिक घटक असतील.

महापौर चषक थ्रोबॉल : गोपाळ शर्मा स्कूल अिजक्य
मुंबई, १९ मार्च / क्री. प्र.

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई उपनगर थ्रोबॉल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महापौर चषक थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील सबज्युनिअर गटात मुलांमध्ये पवईच्या गोपाळ शर्मा मेमोरिअल स्कूलने सेंट झेवियर (अंधेरी) संघाचा अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत १५-८, १६-१७, १६-१४ गुणांनी पराभव केला. डॉ. एस. राधाकृष्णन शाळेने गुंदेचा एज्युकेशन अकादमीचा १६-१४, १५-१२ असा सरळ पराभव करीत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. सबज्युनिअर मुलींच्या गटात कांदिवलीच्या लोखंडवाला फाऊंडेशनच्या संघाने पवईच्या गोपाळ शर्मा मेमोरिअल स्कूलचा अंतिम फेरीत १३-१५, १५-१, १५-८ गुणांनी पराभव करीत महापौर चषक पटकावला. सेण्ट तेरेसा (सांताक्रूझ) शालेय संघाने सेंट झेवियर (अंधेरी) संघाचा १५-०, १५-१० गुणांनी पराभव करीत तृतीय क्रमांक मिळविला.