Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गंभीर, द्रविड, तेंडुलकरच्या अर्धशतकाने मिळवले नियंत्रण
भारत केवळ एका धावेने पिछाडीवर

हॅमिल्टन, १९ मार्च / पीटीआय
भारताने आज सावध पण, आश्वासक फलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट

 

सामन्यावर नियंत्रण मिळवले. आघाडीच्या फलंदाजांनी रचलेल्या मजबूत पायामुळे भारतीय संघाला आज दुसऱ्या दिवसअखेर भक्कम आघाडी घेण्याची जणू हमीच मिळाली आहे. वीरेंद्र सेहवाग नाहक धावबाद झाल्यानंतर गौतम गंभीर (७२), राहुल द्रविड (६६) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद ७०) या आघाडीच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला न्यूझीलंडच्या २७९ धावांना दिवसअखेर ४ बाद २७८ धावांचे उत्तर देता आले असून न्यूझीलंडच्या धावसंख्येशी बरोबरी साधण्यासाठी त्यांना केवळ एक धावेची गरज आहे. आजचा खेळ संपला त्यावेळी ४२व्या कसोटी शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या सचिनला डावखुरा युवराज सिंग ८ धावा काढून साथ देत होता.
न्यूझीलंडच्या माफक धावसंख्येला उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा न स्वीकारता सावध पण, आश्वासक खेळ केला. असा खेळ करताना त्यांना त्यांच्या नैसर्गिक फलंदाजीला काहीसा मुरडही घालावा लागला पण, दिवसअखेर ते सारे भारतीय संघाच्या पथ्यावरच पडले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १३५ चेंडूंना सामोरे जात नाबाद ७० धावांची खेळी सजवली. त्यात ११ चौकारांचा समावेश होता. वैयक्तिक १३ धावांवर असताना त्याचा चुकलेला पूलचा फटका टिपण्यात प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीला अपयश आले. त्याचा एक अवघड झेल टिपण्यात डॅनियल फ्लिनही मिडविकेटला अपयशी ठरला. हे दोन अपवाद वगळता सचिनने एकही संधी न देता भारताचा किल्ला लढवला.
कालच्या बिनबाद २९ धावांवरून आज पुढे सुरुवात करणाऱ्या भारताने सकाळच्या सत्रातच वीरेंद्र सेहवागला गमावले. मात्र, त्यानंतर गंभीर आणि द्रविडने दुसऱ्या गडय़ासाठी केलेल्या १०५ धावांच्या भागीदारीपर्यंत भारताला धक्का बसला नाही. सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (३०) यांचीही चांगली जोडी जमली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारीही केली पण, ख्रिस मार्टिनने ही भागीदारी संपुष्टात आणली. तेंडुलकरने आज त्याच्या ठेवणीतले कट्स आणि ड्राईव्हजचे फटके उत्तमरीत्या मारले. न्यूझीलंडतर्फे आज सर्वात यशस्वी ठरलेल्या मार्टिनला (२-५३) मारलेला एक स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार तर अप्रतिमच होता. मार्टिने आज कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व गाजवले. दहावे कसोटी अर्धशतक साजरे करणारा गौतम गंभीर आणि जम बसलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणला त्याने माघारी परतवले. फॉर्मात आलेल्या राहुल द्रविडचा इयन ओब्रेयनने त्रिफळा उडवला पण, त्याआधी त्याने कारकिर्दीतले ५४वे अर्धशतक साजरे केले होते. त्याने आज ड्राईव्ह, कट आणि ग्लान्सचे उत्तम फटके मारत अर्धशतक झळकावले. काल रात्री आलेल्या पावसामुळे आज सकाळी मैदान ओलसर होते. त्यामुळे १५ मिनिटे विलंबाने आजच्या खेळाला सुरुवात झाली. गंभीरने कायले मिल्सच्या गोलंदाजीवर चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळला आणि त्यावर नाहक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सेहवाग धावबाद झाला. जेम्स फ्रँकलीनने त्याला अफलातून धावबाद केले. मात्र, आजचा दिवस तेंडुलकरनेच गाजवला. तोच आजच्या दिवसातील खेळाचा मानकरी ठरला असून कारकिर्दीतले ४२वे शतक साजरे करण्यात तो यशस्वी ठरतो काय, याची उत्सुकता आहे.
न्यूझीलंड (पहिला डाव) : २७९.
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. मॅक्युलम गो. मार्टिन ७२, वीरेंद्र सेहवाग धावबाद २४, राहुल द्रविड त्रि. गो. ओ’ब्रायन ६६, सचिन तेंडुलकर खेळत आहे ७०, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण झे. टेलर गो. मार्टिन ३०, युवराज सिंग खेळत आहे ०८. अवांतर (बाइज १, लेगबाईज २, नोबॉल ५) ८. एकूण ९०.५ षटकात ४ बाद २७८.
बाद क्रम : १-३७, २-१४२, ३-१७७, ४-२३८.
गोलंदाजी : ख्रिस मार्टिन २०-७-५३-२, कायले मिल्स १५-२-७०-०, इयन ओ’ब्रायन १९.५-४-५६-१, जेम्स फ्रँकलीन १३-१-४६-०, डॅनियल व्हेटोरी १६-२-४०-०, जेस रायडर ७-५-१०-०.