Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दीडशे धावांची आघाडी उत्तम ठरेल -द्रविड
हॅमिल्टन, १९ मार्च / पीटीआय

खेळपट्टी फलंदाजीस काहीशी कठीण असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट

 

सामन्यात १५० धावांची आघाडी उत्तम ठरेल, असे मत भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविडने आज दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केले. नेमक्या किती धावांची आघाडी असणे गरजेचे आहे, हा प्रश्न नाही. आजची स्थिती मात्र, समाधानकारकच आहे. खेळपट्टी पहिल्या दिवसाप्रमाणेच ठणठणीत असून नव्या चेंडूवर येथे धाव काढणे वाटते तेवढे सहज नाही, असेही त्याने सांगितले.
एक मात्र, निश्चित आहे की, जर आम्ही १५० धावांची आघाडी घेतली तर ते आमच्यासाठी उत्तम ठरेल. पण, याची काळजी न करता शांत चित्ताने फलंदाजी करणे सध्या गरजेचे आहे. बऱ्याच कालावधीनंतर आज लौकिकास साजेशी फलंदाजी करणारा राहुल म्हणाला, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग ही कामगिरी पार पाडतील, याचा मला विश्वास आहे. भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची भिस्त आता या जोडीवरच आहे, असे आज ६६ धावांची आकर्षक खेळी करणाऱ्या द्रविडने सांगितले. आजच्या धावसंख्येचा विचार केला तर ती समाधानकारक आहे. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा होता. सुरुवातीपासून असलेला खेळपट्टीतील ताजेपणा आजही तसाच होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही अगदी अचूक टप्प्यावर मारा केला.
या कसोटीत अद्याप भरपूर खेळ शिल्लक असल्यामुळेच आजच्या धावसंख्येवर आम्ही समाधानी आहोत. परंतु, आज आणखी एक फलंदाज गमावला नसता तर याहून अधिक समाधान लाभले असते, असेही तो म्हणाला. सचिन अप्रतिम फलंदाजी करतो आहे. युवराज व धोनी यांच्यासह तळाच्या फलंदाजांमध्येही उपयुक्त योगदान देण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या संघाची स्थिती उत्तम आहे. ती उद्या अधिक भक्कम होण्याची मला आशा आहे. उद्या पहिल्या सत्राचा खेळ महत्त्वाचा ठरणारा आहे. जर आम्ही त्यात चांगली फलंदाजी करत आघाडी मजबूत केली तर प्रतिस्पध्र्यावर दडपण निर्माण करण्याची आम्हाला संधी राहील.
सेडन पार्कच्या या खेळपट्टीकडून गोलंदाजांना चांगलीच मदत मिळत आहे. येथील वातावणात चेंडू स्विंगही चांगला होतो आहे. त्यांनी अचूक मारा केल्यामुळेच आम्हाला वेगाने धावा काढता आल्या नाहीत. त्यांचा टप्पा इतका अचूक होता की, त्यावर ड्राइव्हचे फटके मारण्याची जोखीम आम्हाला पत्करता येत नव्हती. तुम्ही चांगली फलंदाजी करत असला तरी त्यावर तुमचे नियंत्रण आहे, असे कधीच वाटत नव्हते. प्रत्येक चेंडूला योग्यपणेच खेळावे लागत होते, त्यामुळे या खेळपट्टीवर कठोर परिश्रमाशिवाय धावा काढता येणे शक्य नाही. यावर गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरने केलेली फलंदाजी प्रशंसनीय आहे. त्यांनी केलेल्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर संघाची बाजू मजबूत करण्यात उर्वरित फलंदाज यशस्वी ठरतील, याचा मला विश्वास आहे. दरम्यान, द्रविडने त्याच्या फलंदाजीबाबतही समाधान व्यक्त केले. आज मला हायसे वाटत आहे. माझ्या पायांची हालचाल आज उत्तम होत होती. तब्बल ६५ षटकांच्या खेळानंतरही चेंडू सकाळच्या सत्राप्रमाणेच स्विंग होत होता, त्यामुळे आजच्या कामगिरीवर मी बेहद समाधानी आहे. १३२व्या कसोटी सामन्यातील द्रविडचे हे ५४वे अर्धशतक ठरले. येथे त्याने १९९८-९९ च्या मोसमात १९० आणि नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.