Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

विंडिज-इंग्लंड पहिली एकदिवसीय लढत आज दोन्ही संघांचे कर्णधार दुखापतीमुळे त्रस्त
गयाना, १९ मार्च / एएफपी

कसोटी मालिकेपाठोपाठ रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रभुत्व मिळविल्यानंतर आता

 

यजमान वेस्ट इंडिज संघ गयाना नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तथापि, इंग्लंड संघाला मात्र कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या दुखापतीची चिंता सतावते आहे.
त्रिनिदाद येथे ट्वेन्टी-२० सामन्यात झालेल्या दुखापतीतून स्ट्रॉस सावरेल, अशी पाहुण्यांना आशा आहे. खंबीर नेतृत्वच नव्हे तर फलंदाजीची फळी मजबूत व्हावी याकरिता स्ट्रॉस इंग्लंडला हवा आहे. गेल्या दोन वर्षांत स्ट्रॉसला प्रथमच सूर गवसला आहे. कॅरेबियन बेटांवरील विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत किंग्स्टन ओव्हल येथे स्ट्रॉस वेस्ट इंडिजविरुद्धच अखेरचा सामना खेळला होता. स्ट्रॉस खेळू न शकल्यास पॉल कॉलिंगवूड इंग्लिश संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळेल.
गेल्या ऑगस्ट महिन्यात कॉलिंगवूडने इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा राजीनामा दिला. याच दिवशी फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करता यावे याकरिता मायकेल वॉनने कसोटीचे कर्णधारपद सोडले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षितिजावर वैभवशाली दिवस पुन्हा येण्यासाठी इंग्लंड स्ट्रॉस आणि कॉलिंगवूड यांच्याकडे आशेने पाहात आहे.
वेस्ट इंडिजलाही सध्या चिंता सतावते आहे ती कर्णधार ख्रिस गेलच्या दुखापतीची. रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० लढतीत गेल खेळू शकला नव्हता. क्वीन्स पार्क ओव्हलला झालेली ही लढती विंडिजने सहा विकेट राखून जिंकली.
डावखुरा फिरकी गोलंदाज सुलेमान बेनऐवजी निकिता मिलरचा विंडिज संघात समावेश होईल. तर डॅरेन पॉवेलचा जमैकाच्या जेरॉम टेलरऐवजी संघात समावेश होईल. दुखापतीमुळे पॉवेल पाचवी कसोटी आणि ट्वेन्टी-२० लढत खेळू शकलानाही.