Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

तेंडुलकर, पेस आणि भुतियाकडून प्रेरणा मिळाली -दिलीप तिर्की
भुवनेश्वर, १९ मार्च / पीटीआय

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टेनिसपटू लिएंडर पेस आणि फुटबॉलपटू बायचुंग भुतिया हे खेळाडू

 

वयाचे बंधन न बाळगता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. या दिग्गजांच्या कामगिरीपासून प्रेरणा मिळाली, असे मत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा हॉकीपटू हा विक्रम नोंदवण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या भारताचा सिनियर खेळाडू दिलीप तिर्कीने व्यक्त केले.
मलेशियात एप्रिल महिन्यात होणाऱ्या सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत ३१ वर्षीय दिलीप तिर्की भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेदरम्यान तिर्की सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळण्याचा विक्रम नोंदवणार आहे. यापूर्वी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळण्याचा विक्रम हॉलंडचा माजी कर्णधार जेरोम डेलमी याच्या नावावर आहे. त्याने निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी ४०१ आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात हॉलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. हा विक्रम नोंदवण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान समजतो, असे तिर्कीने भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय संघात सहभागी होण्यासाठी रवाना होण्यापूर्वी पीटीआयशी बोलताना सांगितले.
मैदानावर मी नेहमी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मला दीर्घ काळ आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मी फिटनेस राखण्यात यशस्वी ठरलो, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो, असेही तिर्कीने सांगितले. तेंडुलकर, पेस आणि भुतिया या विविध खेळातील दिग्गजांनी मानसिक आणि शारीरिक क्षमता आजपर्यंत कायम राखली आहे. त्यांना मी माझा आदर्श मानतो, असे इंग्लंडविरुद्ध १९९५ मध्ये पदार्पणाचा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळणाऱ्या तिर्कीने सांगितले.
दरम्यान, तिर्कीला कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. घोटय़ाच्या दुखापतीमुळे तिर्कीला काही महिने विश्रांती घ्यावी लागली. मुरुगप्पा चषक हॉकी स्पर्धेद्वारे त्याने पुनरागमन केले.