Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

वेस्ट इंडिजवर आठ विके टस्ने मात
तिसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलियाशी लढत
सिडनी, १९ मार्च/ पीटीआय
महिला विश्वचषक स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीमध्ये भारताने आज वेस्ट इंडिजला आठ विकेटस्ने

 

धूळ चारली असली तरी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळविल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिजवर विजय मिळविल्यानंतर जर ऑस्ट्रेलिया इंग्लंडकडून पराभूत झाली असती तर भारताला स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचण्याची संधी होती. आता तिसरे स्थान पटकाविण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा
शनिवारी होणारा सामना जिंकावा लागेल.
येथील बॅंकस्टोन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने ८४ धावांचे लक्ष्य १९३ चेंडू आणि आठ विकेट्स राखत पूर्ण केले. हे लक्ष गाठण्यासाठी भारताकडून सुलक्षणा नाईक (३९) आणि माजी कर्णधार मिताली राज (३४) यांनी फलंदाजीमध्ये महत्त््वपूर्ण भूमिका बजाविली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्या पचनी पडला नाही तो प्रियांका रॉयच्या भेदक गोलंदाजीमुळे. प्रियांकाने १४ धावांत ४ बळी गारद करीत कारकिर्दीतली सर्वोत्तम गोलंदाजी साकारत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. तिला यावेळी अमिता शर्मा (२/१४) आणि रुमेली धार (१/१६) यांनी सुयोग्य साथ दिली.
वेस्ट इंडिजच्या दुबळ्या फलंदाजीचे दर्शन आज साऱ्यांना झाले. त्यांच्या कर्णधारासहीत चार फलंदाजांना यावेळी भोपळासुद्धा फोडता आाला नाही. सलामीवीर स्टेफनी टेलर (२९) आणि पामेला लॅव्हिन (२०) यांनी ४५ धावांची भागिदारी रचत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची घाई दाखविली आणि त्यांचा संघ फक्त ८४ धावांमध्येच तंबूत परतला.
विजयी लक्ष्याचे पाठलाग करताना भारताची अनुभवी सलामीवीर अंजुम चोप्रा (३) लवकरच तंबूत परतली. त्यावेळी कर्णधार झुलानने पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय पूनम राऊतवर वि़श्वास दाखविला, पण गोलांदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिली विकेट मिळविणाऱ्या पूनमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मात्र सुलक्षणा नाईक आणि मिताली राज यांनी दर्जेदार फलंदाजी करीत १७.५ षटकांतच भारताला सहज विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज :- ४४.४ षटकांत सर्वबाद ८४ (स्टेफनी टेलर २९, पामेला लॅव्हिन २०, प्रियांका रॉय १४ धावांत ४ बळी, पूनम राऊत ४ धावांत १ बळी) पराभूत विरूद्ध भारत :- १७.५ षटकांत २ बाद ८६ (सुलक्षणा नाईक नाबाद ३९, मिताली राज नाबाद ३४, लुईस १९ धावांत २ बळी)