Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

..तरच पाकिस्तानी क्रिकेटचे गतवैभव परत येईल- आलम
कराची, १९ मार्च, वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेसारखी विजेतेपदे मिळविली तरच पाकिस्तानच्या

 

क्रिकेटचे गतवैभव परत येईल, असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचे व्यवस्थापक इंतिखाब आलम यांनी व्यक्त केले आहे.
श्रीलंका संघावर लाहोर येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे क्रिकेटविश्वातील पाकिस्तानच्या इभ्रतीलाच धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला नमवून तसेच काही महत्त्वाच्या स्पर्धाची विजेतेपदे मिळवून पाकिस्तानला आपली प्रतिष्ठा परत मिळविता येऊ शकेल. त्यामुळे पाकिस्तान संघाने कोणत्याही परिस्थितीत आपली कामगिरी उंचावलीच पाहिजे. पाकिस्तानी नागरिकाला ताठ मानेने वावरायचे असेल तर पाक संघाने आपली क्रिकेटची कारकीर्द पूर्ववत होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आमच्या संघात गुणवान खेळाडू आहेत, त्यामुळे आगामी स्पर्धा व मालिकांमध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे असे सांगून आलम म्हणाले, आमचा संघ अतिशय समतोल आहे. आमच्याकडे फलंदाजांची कमतरता नाही व अव्वल दर्जाचे गोलंदाजही आहेत. फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये आमची कामगिरी सातत्यपूर्ण होत नाही हाच आमचा कमकुवतपणा आहे.
पाकिस्तान क्रिकेट क्षेत्र सध्या दुर्दैवातून जात आहे. अनेक परदेशी संघांनी आमच्याबरोबरच्या मालिका ऐनवेळी स्थगित केल्या आहेत अथवा माघार घेतली आहे. त्यातच आमच्या देशात आयोजित करण्यात आलेली चॅम्पियन स्पर्धाही दक्षिण आफ्रिकेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. त्यातच ऐनवेळी आमच्या देशात आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना दहशतवादी हल्ल्यास सामोरे जावे लागले. त्यामुळे आमच्यावरची विश्वासार्हता कमी झाली आहे. एवढेच नव्हे तर या घटनेने आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या ठिकाणांच्या नकाशावरून आमचा देश उडाला आहे, असेही आलम यांनी सांगितले.