Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

ठाण्यातही नववर्ष स्वागतयात्रा
ठाणे/प्रतिनिधी

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला भारतीय नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनात्मक चित्ररथ, महिलांच्या हातावर मेंदी काढण्यासाठी खास पथक, भव्य रांगोळ्या आणि आबालवृद्धांप्रमाणे नामवंत कलाकारांचा सहभाग ही यंदाच्या स्वागतयात्रेची वैशिष्टय़े आहेत.

कार्बाइनमधून गोळ्या सुटून नौदलाचा जवान जागीच ठार
ठाणे/प्रतिनिधी

बंदोबस्तावर असलेल्या नौदलाच्या जवानाच्या कार्बाइनमधून सुटलेल्या गोळीने त्याचाच प्राण घेतल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी येथील स्टेट बँकेत घडली. अचानक घडलेल्या या घटनेने बँकेत एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाचे कोलशेत येथे युनिट आहे. येथील कर्मचाऱ्यांचे वेतन वा अन्य आर्थिक व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खोपट येथील जे.के. ग्राम शाखेतून होत असतात.आज बँकेतून मोठी रक्कम घेण्यासाठी नौदलाचे तीन जवान बँकेत आले होते. त्यांच्यासमवेत नेव्हीतील लीडिंग सिमेन्स पदावर काम करणारा अर्जुन राम चौधरी हा कार्बाइनधारी सुरक्षा जवानही होता.

डोंबिवलीकर अनुभवणार ‘कराली’ची करामत!
डोंबिवली:
कायदा, सुव्यवस्था व शांतता याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खाते जिवापाड परिश्रम घेत आहेच, पण तरीही प्रत्येकाला स्वत:चे रक्षण करता आलेच पाहिजे. या पाश्र्वभूमीवर केरळमधील ‘कराली मार्शल आर्ट’चे १४ जणांचे एक पथक ‘कराली’ प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी थेट कालिकत (केरळ)मधून डोंबिवलीला येत आहेत. निमित्त आहे श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आयोजित नव-वर्ष स्वागतयात्रेचे! २६ मार्च धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी, संभाजी महाराजांचा बलिदान दिन! २६ मार्चला संध्याकाळी डोंबिवलीच्या पश्चिमेकडील भागशाळा मैदानात या केरळीय ‘कराली पथकाचा’ थरार डोंबिवलीकरांना बघायला मिळणार आहे.

नितीन देसाईंनी केली माटवणच्या शाळेला मदत
ठाणे/प्रतिनिधी :
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विजय मेहता यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्याच्या माटवण गावातील आर. जी. पवार हायस्कूलमघील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी हायस्कूलला सभागृह बांधून देण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले. दादरमधील शिवाजी मंदिरात माटवणच्या हायस्कूलमधील माजी विद्याथ्यार्चा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

प्रख्यात बिल्डर हिरानंदानींच्या कार्यालयास पालिकेने ठोकले सील
ठाणे/प्रतिनिधी :
मालमत्ता करापोटी सव्वा दोन कोटी रुपये थकवणाऱ्या प्रख्यात बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या कार्यालयास आणि इमारतीस आज ठाणे महापालिकेने सील ठोकल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमध्ये निरंजन हिरानंदानी यांनी भव्य आठ इमारती बांधल्या आहेत. या इमारतींचा सुमारे सव्वा दोन कोटींचा मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही. ही थकबाकी वसुलीसाठी पालिकेने यापूर्वी बिल्डरला नोटीसही बजावली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर आज जप्तीची कारवाई करण्यात आली.
मुख्यालय उपायुक्त व्यंकटेश भट, कर निर्धारक व संकलक हरिश्चंद्र मोरे, सहाय्यक आयुक्त अरविंद आकाशी, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांच्या पथकाने आज सकाळी हिरानंदानी यांचे कार्यालय तसेच पूर्णत: व्यापारी वापरात असलेल्या आर्केडिया आणि टिफनी या अनुक्रमे पाच व सहा मजली इमारती सील करण्यात आल्या. याच परिसरात सिल्वर लिंक, व्हिक्टोरिया, कार्टन, स्पेक्ट्रा, पेनरिफ आणि सॅट्रिफ या सहा इमारती असून त्यावरही उद्या कारवाई केली जाणार आहे. मात्र या इमारतींमध्ये लोक राहत असल्याने इमारतींना सील ठोकण्याऐवजी तेथील लोकांचे टीव्ही, फ्रिज, गाडय़ा, फर्निचर असे सामान जप्त केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

डोंबिवलीत शनिवारी प्राचार्य राम शेवाळकरांचा सत्कार
ठाणे प्रतिनिधी

डोंबिवली येथील अभंग प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक संत वाङ्मयाचे अभ्यासक प्राचार्य राम शेवाळकर यांचा सत्कार शनिवार, २१ मार्च रोजी हेरिटेज सभागृह, तळमजला, पेंढारकर महाविद्यालयाजवळ, डोंबिवली (पूर्व) येथे रात्री आठ वाजता केला जाणार आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार हरिश्चंद्र पाटील, ‘लोकसत्ता’चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी, लेखक-निवेदक विश्वास मेहेंदळे, कडोंमपा आयुक्त गोविंद राठोड, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आणि शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र वाजपेई यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. या सत्कार सोहळ्याआधी सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी संपर्क -अनिल त्रिवेदी - ९३२४३६९२०७, चंद्रशेखर शुक्ल-९८९२८८२०१२.

कुडूस येथे टेम्पोच्या धडकेने पादचारी ठार
वाडा/वार्ताहर:
भिवंडी- वाडा या राज्य महामार्गावरील कुडूस नाक्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पादचाऱ्यास भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला. कुडूस नाक्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनधिकृत वाहनेही रस्त्यालगत उभी असतात. या ठिकाणी नेहमीच लहानमोठे अपघात घडत असतात. आज सकाळी गिलोचन ओयी (३२) हा परप्रांतीय तरुण रस्त्यालगत उभा होता. याचवेळी भरधाव आलेल्या टेम्पोने या तरुणाला चिरडले व रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार मोटारसायकलींनाही धडक दिली.कुडूस पोलिसांनी टेम्पोचालक मोनूराय रॉय याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोये करीत आहेत.

बालकलाकारांचा रंगतदार कार्यक्रम
ठाणे/प्रतिनिधी :
पॅसिफिक महासागर, अंटाक्र्टिका, इजिप्त, भारत, ब्राझिल देशांतील कला, संस्कृती आणि गतवैभवाचे दर्शन घडविणारा आणि बालकलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रकलेला नृत्याची जोड देऊन आर्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या छोटय़ा बालकांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने गडकरी रंगायतन नाटय़गृहात वेगळेच रंग भरले. प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने रंगायतनच्या व्यासपीठावर दोन तास हा आगळावेगळा कार्यक्रम रंगला होता. व्हाइस अ‍ॅडमिरल एम.पी. आवटी आणि अभिनेत्री मेघना एरंडे हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन सुधीर दीक्षित, संचालिका स्वाती दीक्षित, राजाराणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील, अभिनेता संतोष जुवेकर, संजय वाघुले, मधुसूदन खांबेटे आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या मंजुश्री पाटील यांनी आभार, तर शिल्पा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली छोटय़ा विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुलांनी रेखाटलेली सुंदर चित्रे आणि त्यात भरलेल्या रंगांवर आधारित विद्यार्थ्यांनी गाणी व नृत्ये सादर केली. ‘छोटय़ा मुलांनी मोठय़ांना खिळवून ठेवणारा कार्यक्रम’ अशा शब्दात अ‍ॅडमिरल आवटी यांनी या स्नेहसंमेलनाचे वर्णन केले.

डोंबिवलीकरांना वलयांकित मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे पॅकेज
ठाणे प्रतिनिधी

येत्या गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांत डोंबिवलीकरांना येथील वलय या संस्थेने सावित्रीबाई फुले नाटय़मंदिरात दर्जेदार मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवार, २९ मार्च रोजी चंद्रलेखा प्रकाशित, शन्ना नवरे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित प्रेमगंध या नाटकाने होत आहे. संध्याकाळी साडेआठ वाजता या नाटकाचा प्रयोग होईल. त्यानंतर दर महिन्याच्या एका शनिवारी अथवा सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या दिवशी एक व्यावसायिक नाटक अथवा हिंदी-मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम होईल.
या योजनेचे वार्षिक सभासद शुल्क ११००, ८५० आणि ६५० रुपये आहे. या शुल्कात किमान १२ कार्यक्रम संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील. सभासद नोंदणी करताना रसिकांना मि़ळालेले आसन पुढे वर्षभर कायम राहणार आहे. तसेच ग्रुप बुकिंगही स्वीकारले जाणार आहे. संपर्क : मोहन सुतावणे-९८२०९५७५९९, पपी कुलकर्णी-९८२१६०८११७.

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईत अडथळा
ठाणे/प्रतिनिधी :
शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असताना, काल अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून कारवाई थांबविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, दोन छायाचित्रकारांना शिवीगाळ करण्यात आली. लोकमान्य पाडा क्रमांक १ मधील एका अनधिकृत इमारतीवर हातोडा मारण्यासाठी पालिका उपायुक्त भट, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख बी. जी. पवार, सहाय्यक आयुक्त मनीष जोशी व पथकाने कारवाई सुरू केली. तेव्हा वनिता गोथपगार व कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ व अंगावर रॉकेल ओतून घेण्याची धमकी देत कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड व परिवहन समितीचे माजी सभापती जितेंद्रकुमार इंदिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान अतुल मळेकर व गजानन हरीमन यांना शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाला केलेली धक्काबुक्की व शिवीगाळप्रकरणी आज सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, अशी माहिती अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख पवार यांनी दिली.