Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
व्यक्तिवेध

भाजपचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात त्यांच्या गांधीनगर मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय नुकताच मल्लिका साराभाई यांनी जाहीर केला आहे. आंतररा।्ट्रीय कीर्तीच्या भरतनाटय़म व कुचिपुडी नृत्यांगना म्हणून मल्लिका साराभाई यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. अवकाशवैज्ञानिक दिवंगत डॉ. विक्रम साराभाई आणि नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचा बुद्धिमत्तेचा, कलेचा आणि सामाजिक जाणिवेचा वारसा मल्लिका साराभाई यांनी समर्थपणे चालवला आहे. १९५४ मध्ये अहमदाबादमध्ये जन्मलेल्या मल्लिका साराभाई यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच आईकडून मिळालेली शास्त्रीय नृत्यसाधनेची संथा निष्ठापूर्वक जपली. अहमदाबादच्या इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए आणि डॉक्टरेट मिळवणाऱ्या मल्लिका यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध परिमाणे आहेत. नृत्यक्षेत्राबरोबरच रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमांतून, अभिनय आणि अँकरिंगच्या क्षेत्रातही मल्लिका

 

साराभाई सक्रिय राहिल्या आहेत. मृणालिनी साराभाई यांनी १९४९मध्ये स्थापन केलेल्या दर्पण परफॉर्मिग आर्टस्ची धुरा गेली कित्येक वर्षे त्या सांभाळीत आहेत आणि त्याद्वारे ग्रामीण तसेच पारंपरिक लावंतांना प्रशिक्षित करीत आणि समकालीन सामाजिक प्रश्नांना भिडत उच्चभ्रू समाजघटकापासून तळागाळापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या संचात पीटर ब्रूक यांनी सादर केलेल्या ‘महाभारत’ या नाटकातील मल्लिका साराभाईंची द्रौपदी कायम लक्षात राहिली आहे आणि या द्रौपदीच्या सहवासातच त्यांना आपल्या पुढील ‘शक्ती- द पॉवर ऑफ वीमेन’, ‘सीताज डॉटर्स’ सारख्या प्रकल्पांची प्रेरणा मिळाली आहे. १९७७ साली फ्रान्सचा थिएटर डी चॅम्प्स एलिसीज, फ्रान्स सरकारचा ‘शेवालिए डी पाम्स एकेडेमिक्स’ हे तिथले सवोच्च नागरी सन्मानही नृत्यांगना मल्लिका यांना मिळाले, तर २००१ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मल्लिका साराभाईंच्या नृत्यप्रयोगांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातून व्यक्त होणारी त्यांची सामाजिक बांधिलकी. स्त्रीशक्तीचा पुरस्कार करणारा ‘शक्ती’ आणि ‘सीताज डॉटर्स’ हे कार्यक्रम, सामाजिक बदलाचं आवाहन करणारा ‘अनसुनी’, हिंसेवर टिप्पणी करणारा ‘व्ही फॉर..’ तसेच एट्स, पर्यावरण इत्यादी सामाजिक प्रश्नांचा वेध घेणारे, त्यांच्याकडे लक्ष वेधणारे नृत्यप्रयोग त्या करीत आल्या आहेत. मानवाधिकारांसाठी संघर्ष हा मल्लिका साराभाईंच्या कलाविष्काराचा, सांस्कृतिक गतीविधींचा अंत:प्रवाह बनून राहिला आहे. त्यामुळेच २००५ मध्ये त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्काराचे नामांकनही मिळालेहोते. २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरत मल्लिका साराभाईंनी गुजरात सरकारवर कडक टीका केली होती. त्याचा जणू सूड म्हणून गुजरात सरकारने त्यांना चक्क मानवी तस्करीच्या आरोपात गुंतवले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमित्त करून मल्लिका साराभाई या बेकायदेशीररीत्या भारतीयांना अमेरिकेत घेऊन जातात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र २००४ मध्ये न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली आणि त्यांचे निर्दोषित्व सिद्ध केले. सामाजिक प्रश्नांची तड लावायची तर राजकारणापासून फटकून राहून भागतच नाही. ‘राजकारण हा माझ्या जगण्याचा अनिवार्य भाग आहे’ असे म्हणत थेट अडवाणींच्या विरोधात आपली उमेदवारी जाहीर करत मल्लिका साराभाईंनी भाजप मतप्रणालीच्या विरोधात हे आपल्या दुसऱ्या सामन्याचेच शिंग फुंकले आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळो न मिळो, त्या आपली लढाई लढणार आहेत. मल्लिका साराभाईंचा हा नवा निर्धार म्हणजे त्यांच्या सामाजिक बांधीलकीचा अनिवार्य राजकीय आविष्कार होय.