Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

नक्षलवादग्रस्त भागात केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा
गडचिरोली, १९ मार्च / वार्ताहर

नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केल्याने मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस विभागामार्फत व्यापक प्रमाणावर जनजागरण अभियान राबवण्यात येत असून निवडणूक प्रक्रिया शांततेने व निर्भीडपणे पार पडावी, यासाठी जिल्ह्य़ाच्या संवेदनशील भागात केंद्रीय राखीव पोलीस बल व राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडय़ा तैनात केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी सांगितले.

मालमत्ता कराची रक्कम हडपली
पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

चिखली, १९ मार्च / वार्ताहर

नागरिकांनी भरलेल्या मालमत्ता करांच्या रकमेपैकी सुमारे अडीच लाख रुपयांचा भरणा न करता त्या रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कर वसुली विभागातील शेख मकबूल व मोहन देशमुख या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांची अंतरिम पगारवाढ रोखली.

.. अन् जाळ्यात पाखरू टाकलं!
सोमनाथ सावळे, बुलढाणा, १९ मार्च

‘किती जीवाला राखायाचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं!’ शरद पवारांचे मित्र कविश्रेष्ठ ना.धों. महानोर यांच्या रांगडय़ा या प्रेमकाव्यातील ओळी चपलखपणे लागू होतात त्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना! राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याच्या आखाडय़ात उतरवले आहे आणि तेही शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांच्या विरोधात!
डॉ. राजेंद्र िशगणे गेल्या तीन टर्मपासून सिंदखेड राजाचे आमदार आहेत.

जांबुवंतराव धोटेंना तिसऱ्या आघाडीची ऑफर!
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ, १९ मार्च / वार्ताहर

यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीने माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांना ऑफर दिली आहे. आघाडीचे एक प्रमुख नेते व माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनी स्वत: धोटे यांना ही ऑफर दिली आहे. बुधवारी देवगौडा यांनी भ्रमणध्वनीवरून जांबुवंतराव धोटे यांच्याशी वीस मिनिटे चर्चा केली. भाजप आणि काँग्रेसला तिसरी आघाडी पर्याय ठरू शकते, आघाडीत सामील व्हावे व निवडणूक लढावी, असे धोटे यांना देवेगौडा यांनी सुचवले.

लढाई लई रंगतदार!
प्रतापराव भाऊसोबत साहेबाची लढत? कुस्तीची भव्य दंगल! लोकसभेच्या आखाडय़ात चांगलीच मजा येईल. पैलवानासोबत पैलवान लढंल. डावात कोण बाजी मारतो अन् कोण लवंडतो, सामना पाहण्यासारखा रंगतदार अन् रोमहर्षक ठरेल, अशा चर्चा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झडू लागल्या आहेत. शिवसेनेने बुलढाण्याच्या मैदानात आमदार प्रतापराव जाधव यांना उतरवले आहे. त्यांना राष्ट्रवादीचे पहेलवान उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे लढत देणार आहेत. आतापर्यंत ‘सहकाराने’ हातात हात घालून तडजोड आणि सहमतीचे राजकारण करणारे हे दोन्ही गडी आता परस्परांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. गळ्यात गळा घालणाऱ्या या दोघांना एकमेकांचे चेहरे पाण्यात पहावे लागत आहेत. प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते. दोघे एकमेकांवर प्रेम करीत असत तेव्हाची बातच न्यारी. पण आता या युद्धात दोघे कोणत्याही स्तरावर जाऊन एकमेकांवर कुरघोडी करू शकतात. दोन्ही नेते वजनदार. पण मतदार मतांचे वजन दोघांपैकी कुणाच्या पारडय़ात टाकेल याकडे ‘काटय़ाचे’ लक्ष लागले आहे. दोघांची लढाई त्यांच्या व्यक्तिगत परीक्षेसोबत मतदारांचीही परीक्षा ठरली आहे.

भारिप-बहुजन महासंघातर्फे अवचारांच्या नावाचा आग्रह
खामगाव, १९ मार्च / वार्ताहर

भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत सोमवारी भारिप-बहुजन महासंघाची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी भारिप-बमसंचे उमेदवार म्हणून वडगाव माळी, ता. मेहकर येथील अ‍ॅड. एम.व्ही. अवचार यांच्या नावाचा ठराव पारित करण्यात आला. या बैठकीला विश्वनाथ दांडगे, शरद वसतकार, भीमराव जाधव, गुलाब राठोड, प्रा. राजकुमार सोनेकर, पंडित खंडारे, शेख मजीद शेख हैदर, गणेश चौकसे, रवींद्र ढोकणे, राजेश लहासे, अ. आहाद अ. समद, श्रीकृष्ण काळणे, मालती निकाळजे, संजय पारवे, केणे गुरुजी, एल.आर. गवई, सुनील सरदार उपस्थित होते. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी भारिप-बहुजन महासंघात प्रवेश केला.

यवतमाळच्या कासावारांना चंद्रपुरातून उमेदवारी?
मुंबई, दिल्लीत मोर्चेबांधणी
यवतमाळ, १९ मार्च / वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी व आर्णी हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले असल्याने वणीचे माजी आमदार व यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांना चंद्रपूरमधून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून एक शिष्टमंडळ मुंबईत प्रदेश काँग्रेस समितीला, तसेच दिल्लीत ऑस्कर फर्नाडिस, अहमद पटेल, ए.के. एन्थोनी आदी नेत्यांना भेटून आले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जवळपास पाच लाख मतदार तेलगू भाषिक आहेत आणि वामन कासावार यांना तेलगू भाषा चांगली येते. तीनदा आमदार राहिलेल्या कासावार यांचा जनसंपर्क लक्षात घेता आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची आपसात चाललेली गटबाजी लक्षात घेता काँग्रेसची जागा जिंकायची असेल तर वामन कासावर यांना उमेदवारी दिली पाहिजे, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. दरम्यान, कासावार यांच्या बाबतीत एक अडचण अशी आहे की, प्रदेश काँग्रेसतर्फे त्यांचे नावच दिल्लीत पाठवण्यात आलेले नाही. अर्थात ‘दिल्लीश्वरां’नी ठरवले तर काहीही होऊ शकते, असा कासावार समर्थकांचा तर्क आहे.

सागवान तस्कराला अटक
परतवाडा, १९ मार्च / वार्ताहर

सागवान तस्कर मलिल शहा गफार शहाला वन कर्मचाऱ्यांनी अखेर अटक केली असून अचलपूर न्यायालयाने आरोपीची रवानगी कारागृहात केली आहे. अचलपूर येथील गांधी पुलाजवळील शेतामध्ये वनकर्मचाऱ्यांनी ९ फेब्रुवारी ला छापा टाकून ३० हजारांचे सागवान फर्निचर जप्त केले. आरोपी मलिल शहा हा घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीने अटकपूर्वक जामीन मिळण्याकरिता अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला; परंतु वनविभागाची बाजू सरकारी वकील बोरेकर व सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे यांनी मांडली. त्यामुळे अचलपूर न्यायालयामध्ये आरोपीला जामीन नाकारला. आरोपीवर यापूर्वीची वनविभागाची प्रकरणे दाखल आहेत. वन कर्मचारी गेल्या २५ दिवसांपासून आरोपीच्या मार्गावर होते. सहा. वनपरिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे, काळे, पी.जी. मावोदे, नरेंद्र बोके, बाळू खंडार, वनमजूर या वन कर्मचाऱ्यांनी पहाटे आरोपीस अटक केली. प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक राजेश कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद तोरो यांच्या नेतृत्वाखाली सहा वनपरिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे करीत आहे.

महिलेस फसवणाऱ्या दोघांना अटक
खामगाव, १९ मार्च / वार्ताहर

पैसे जास्त करून देतो असे म्हणून महिलेकडून १५०० रुपये घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या साधूच्या वेशातील दोघांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. समता कॉलनी भागात ही घटना घडली. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता ललित केरोसिया यांच्या समता कॉलनी भागातील घरी त्यांच्या पत्नी दीपमाला व आई कमला या दोघी होत्या. दरम्यान, साधूच्या वेशातील दोन भामटे त्यांच्या घरी आले. त्यांनी धार्मिक पुस्तकातील ५०० रुपयांची नोट दीपमाला यांना दाखवली. तुम्हाला अशीच बरकत पाहिजे असेल तर ५०० च्या ३ नोटा आणा, दुप्पट करून दतो, असे म्हणत पैशाची मागणी केली. दीपमाला यांनी त्यांना शंभर रुपयांच्या १५ नोटा दिल्या. त्यानंतर दोघेही बाहेर येऊन पसार होण्याचा प्रयत्न करू लागले. महिलेने आरडाओरड केल्याने नागरिकांनी सुनील राजेंद्र शिंदे व संजय दादाराव मांडोकार यांना पकडले व चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. दारू पकडली विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी निर्मल टर्निगजवळ पकडले. प्रकाश हरिभाऊ सुलताने (रा. गोंधनापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७६० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई ब्रिजलाल मापारी, चिखलकर, बंडू जाधव यांनी केली. सुलतानेविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अस्वल पिंजरा तोडून पळाले
भंडारा, १९ मार्च / वार्ताहर

साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा व किन्ही मार्गावर १४ मार्चला पकडलेले जखमी अवस्थेतील अस्वल पिंजरा तोडून पळाले. सुमारे एक क्विंटलपेक्षा अधिक वजन असलेल्या तीन फूट उंचीच्या नर अस्वलला गडेगाव लाकूड आगारातील एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. पिंजरा तोडून बाहेर आल्यावर तो गॅरेजचा परिसर बंदिस्त असल्याने अस्वलाला बाहेर पडता आले नाही. हे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर गॅरेजभोवती जाळे लावून अस्वलाला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. या अस्वलाला आगारात आणण्यापूर्वी जंगलातच दोन नर अस्वलांमध्ये जुंपली व त्यात हे अस्वल गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे हे अस्वल वनविभागाला सापडले तेव्हापासून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अन्नु वराडकर औषधोपचार करीत आहेत. त्यांनी प्रमाणपत्र दिल्यानंतरच अस्वलाला जंगलात सोडण्यात येणार होते. सुस्थितीत नसलेल्या पिंजऱ्यात अस्वलाला ठेवण्यात आल्यामुळे अस्वलाला पळून जाता आले.

आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल चार व्यावसायिकांना दंड
चंद्रपूर, १९ मार्च/ प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर दुकानांवर मराठी पाटय़ा लावा, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले असताना हे आदेश झुगारून इंग्रजी फलक लावणाऱ्या शहरातील चार व्यावसायिकांवर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्हय़ात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्यामुळे इंग्रजी फलक दुकानांवर मिरवणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुकानात मराठी पाटय़ा लावण्याचे आंदोलन संपूर्ण राज्यभर राबवले. मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार दुकानाच्या दर्शनी भागात मराठी पाटय़ा लावणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील आदेशही राज्य शासनाने जारी केले आहेत. मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका येथील कमल श्यामलाल कोठारी यांच्या दुकानाला बसला. येथील कस्तुरबा मार्गावर त्यांची वर्ल्ड ऑफ टायटन, जॉन प्लेअर, रिबॉक व सिग्रेचर ही चार दुकाने आहेत. सहायक कामगार आयुक्त अ.त्र. माडीवाले यांच्या नेतृत्वाखाली गुमास्ता निरीक्षक सुरेश राऊत १ फेब्रुवारीला दुकानात गेले असता दुकानावर इंग्रजी फलक दिसले. राऊत यांनी हे प्रकरण न्यायदंडाधिकारी एस. गोसावी यांच्यासमोर नेले. न्यायदंडाधिकारी गोसावी यांनी या प्रकरणात महाराष्ट्र दुकान व आस्थापना १९६१, नियम २० अ चे उल्लंघन केले म्हणून कोठारी यांना चार हजार रुपये दंड सुनावला.