Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
विशेष लेख

मूक झालो!
नुसता ठळक निषेधही केला नाही मराठी साहित्यवर्तुळाने, जेव्हा एरवी असंघटित वाटणारा वारकरी संप्रदाय हात धुवून आनंद यादवांच्या मागे लागला! घटना घडतात. त्यामागचे राजकारण काहींना कळते तर काही त्याबाबत कायमचेच अनभिज्ञ राहतात. यादवांचा पाडाव झाला ही घटना दु:खद होती, हे नि:संदिग्धपणे आणि जोराने का ऐकू आले नाही सगळीकडे? विचारस्वातंत्र्याच्या प्रेमिकांना खरेच का हे मान्य आहे? प्रश्न तुकाराम महाराजांच्या अपमानाचा होता, का अनेक वर्षे मनात साठलेली खुन्नस परस्पर उतरवायचा होता? स्पष्टच बोलायचे तर ‘कलेचे कातडे’ प्रकरण मनात ठुसठुसत होते, म्हणूनच का साहित्यक्षेत्राने या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतली? या निमित्ताने सगळ्यांचेच डबल स्टँडर्ड असतात हे सिद्ध झाले. तस्लिमा नसरीन आणि सलमान रश्दी वगैरेंच्या लेखनस्वातंत्र्याचे गोडवे गाणारे यादवांच्या मागे ठामपणे का उभे राहिले नाही? याचे एक कारण मुळात यादवांनी घेतलेली पळपुटी आणि बोटचेपी भूमिका हे आहे. विरोध झाल्यावर लगेच कादंबरी मागे घेणे हा यादवांचा प्रमाद होता. आपल्या मुलावर चोरीचा आरोप झाला म्हणून तो माझा मुलगाच नाही, असे जाहीर निवेदन देण्यासारखेझाले हे. हा तर सरळसरळ लेखननिष्ठेचा अभाव होता. मर्ढेकरांनी लेखनपूर्व आणि लेखनगर्भ आत्मनिष्ठेचा मुद्दा मांडला होता; पण लेखनोत्तर आत्मनिष्ठेचे काय? मातृभूमीच्या प्रेमाखातर क्रांतिवीर बलिदान करू शकतो, जन्मभूमीच्या अस्मितेसाठी सैनिक प्राणार्पण करतो, तसे आपल्या लेखननिष्ठेसाठी लेखक काय करू शकतो, हाच प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. प्रेम, निष्ठा, अस्मिता वगैरे शब्द वापरणे आणि लिहिणे सोपे असते. पण त्यांचे प्रत्यक्षात मोल देणे किती अवघड असते हे या निमित्ताने सिद्ध झाले.

डॉ. यादव एकाकी का?
डॉ. आनंद यादव यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही वादग्रस्त कादंबरी मी वाचलेली नाही, परंतु वारकऱ्यांच्या आक्षेपानंतर ज्या तत्परतेने डॉ. आनंद यादव यांनी माफी मागितली आणि आपली कादंबरी मागे घेतली त्यावरून तिच्यातला मजकूर पुरेसा उथळ, थिल्लर, आक्षेपार्ह आणि गर्हणीय असावा किंवा महाबळेश्वर येथे भरू घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदासाठी आपल्या कादंबरीला थिल्लर ठरवण्याची ‘तडजोड’ डॉ. आनंद यादव यांनी केली असावी. पहिली शक्यता अधिक असावी. कारण अशा प्रकारची चारित्र्यहननपर कादंबरी डॉ. यादव काही पहिल्यांदा लिहित नाहीत. यापूर्वी त्यांनी व्यंकटेश माडगूळकरांवर ‘कलेचे कातडे’ नामक कादंबरी लिहून माडगूळकरांचेही चारित्र्यहनन केलेले आहे. (ती कादंबरी मी वाचलेली आहे.) दोन्ही शक्यता लक्षात घेतल्या तरी ‘साहित्यिक’ म्हणून डॉ. आनंद यादव हे नेमके किती पाण्यात आहेत, हे या निमित्ताने ध्यानी यावे. या प्रसंगी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तरी समस्त मराठी साहित्यिक गप्प का’ असा सवाल खासगी वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये वारंवार करण्यात आला. याचे एक कारण असे देण्यात येते आहे की, या आंदोलनामागे मराठा जातीयवादी दहशतवादी शक्ती असल्या’मुळे घाबरून मराठी साहित्यिक गप्प आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे आंदोलन वारकऱ्यांनीच चालवलेले होते. वारकऱ्यांमध्ये आणि वारकऱ्यांच्या नेत्यांमध्ये फक्त मराठा जातीचे लोक नाहीत. इतर जातींचेही आहेत. संभाजी ब्रिगेड किंवा मराठा महासंघ यांसारख्या संघटना यामागे असल्याचे माझ्या माहितीत नाही. याचे एक कारण हेही असेल की मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांनी सदैव ‘ब्राह्मणशाही आणि ब्राह्मण’ यांना आपले लक्ष्य केलेले आहे. इथे तुकोबाही ‘आपले’ आणि आनंद यादवही ‘आपले’च! आपलेच दात आणि आपलेच ओठ- तेव्हा विरोध तरी नेमका कुणाला करायचा? डॉ. यादव यांच्या लिखाणामागे ‘ब्राह्मणी मनोवृत्तीच्याच लोकांची चिथावणी आहे’ असा बादरायण संबंध जोडून विरोध करणे त्यांना अशक्य नव्हते, पण त्यांनी ते केलेले नाही.