Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
विविध

कीर्ती आझाद, शर्मा, सोमजी दामोर यांना भाजपची उमेदवारी
नवी दिल्ली, १९ मार्च / पी.टी.आय.

बिहार, जम्मू-काश्मीर आणि गुजरातमधील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी भाजपच्या केंद्रीय निवडणूक कार्यकारिणीने आज जाहीर केली. यात अमरनाथमध्ये भूखंड वाटप रद्द करण्याच्या मुद्यावरून झालेल्या जनआंदोलनाचे नेते लीलाकरण शर्मा, माजी कसोटीवीर कीर्ती आझाद आणि काँग्रेसचा त्याग करून भाजपवासी झालेले माजी खासदार सोमजी दामोर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी जाहीर झालेले भूखंड वाटप मागे घेण्याच्या मुद्यावरून जम्मूत जनअंदोलन उभे करणारे अमरनाथ संघर्ष समितीचे नेते अ‍ॅड. लीलाकरण शर्मा यांना भाजपने जम्मू लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून डॉ. निर्मल सिंग यांना उधमपूरमधून उभे केले आहे.

पुढारी व्हायचंय? नेतागिरी विद्यालयात दाखल व्हा!
रांची, १९ मार्च/पीटीआय

आयुष्यात काहीही होता आले नाही की राजकारणात जा असे पूर्वी म्हटले जायचे मात्र आता राजकीय नेता होण्यासाठी चढाओढ सुरू असते. खाबुगिरीमुळे अनेक राजकीय नेते बदनाम झाले आहेत. असे असले तरी राजकीय क्षेत्रात अजूनही काहीतरी चांगले घडेल अशी आशा अनेकांच्या मनात जिवंत आहे. त्यातूनच रांची येथे नेतागिरी विद्यालय सुरू करण्यात आले आहे. उत्तम राजकीय नेते घडविणे हे या विद्यालयाचे उद्दिष्ट आहे.

‘अल् काईदा’ आणि ‘तालिबान’ बलुचिस्तानात नाहीत; पाकिस्तान सरकारचा दावा
वॉशिंग्टन, १९ मार्च/पी.टी.आय.

‘तालिबान’ किंवा ‘अल् काईदा’कडून आपले तळ आता पाकिस्तानच्या आदिवासी भागातून हलविण्यात आले असून, बलूचिस्तानमध्ये आता हे दहशतवादी गट कार्यरत नसल्याचा दावा आज पाकिस्तानकडून करण्यात आला. सीमालगतच्या वायव्य सरहद्दीमधून तालिबानी आणि अल् काईदाचे हस्तक निघून गेले असून, अमेरिकेने या भागांमध्ये ‘ड्रोन’ हल्ले करू नयेत, अशी मागणी पाकिस्तानच्या एका सरकारी अधिकाऱ्याने केली आहे.

रशियात ३१ मार्चपासून साजरे होणार ‘भारतवर्ष’
मॉस्को, १९ मार्च/पी.टी.आय.

रशिया आणि भारतातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी मॉस्कोत ३१ मार्चला ‘भारतवर्ष’ सुरू होणार आहे. बोल्शॉय थिएटरमध्ये या भारतवर्षांचा दिमाखदार शुभारंभ होणार आहे, असे भारतीय दूतावासाने जाहीर केले आहे. ‘इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ (आयसीसीआर)चे अध्यक्ष करण सिंग आणि रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर डी. शुकॉव्ह यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. सोविएत युनियनच्या विघटनानंतर उभय देशांतील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये हार्दिक संबंध जोपासण्यासाठी उभय देशांमध्ये असा उपक्रम साजरा करण्याची सूचना प्रथम रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी केली होती.

तेलगीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
अहमदाबाद, १९ मार्च / पी.टी.आय.

कोटय़वधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. गोहिल यांनी तेलगीसहित त्याला याप्रकरणी मदत करणारा सादिक इब्राहम याला सात तर सिध्दार्थ उर्फ पीटर फर्नाडिस याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याबरोबर तेलगी व सादिक यांना अनुक्रमे ३५ व ३० हजार रुपयांचा दंडही भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट मुद्रांक प्रकरणी गुजरातमध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यात बुधवारी न्यायालयाने या तिघांना दोषी ठरविले होते. तेलगी आणि त्याच्या साथीदारांनी बनावट मुद्रांकाचे जाळे महाराष्ट्राबरोबरच गुजरात तसेच अन्य काही राज्यात पसरविल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला ‘सीबाआय’ च्या विशेष न्यायालयासमोर चालविण्यात आला.