Leading International Marathi News Daily शनिवार, २१ मार्च २००९
  टोपलीतली तडफड
  पाकिस्तानी शाळकरी मुलीची दैनंदिनी
  श्रीमंत पतीची राणी!
  डबाभर उमेद! आणि उत्साह!
  विज्ञानमयी
  आई- मुलीचं बदलतं नातं
  ‘द लास्ट लेक्चर’
  सुमोपेंट - नेटवरचं मिनी फोटोशॉप
  दिवसाचे तास २५ झाले तर..
  मुलांसोबत दुरुस्ती
  दाता
  वैशाखवणवा
  जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
  अनुभव
  मंगळूरचा ‘कोला’
  प्रतिसाद
  मिस्ट्री हाऊस
  कलात्मक 'चंदेरी' नगरी

समानतेसाठी आम्ही!
स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  कोळिणींपुढे आता प्लॅस्टिकचे डबे घेऊन फिरणाऱ्या मासेविक्रेत्यांनी आणि मॉलमधील माशांच्या दालनांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मध्यंतरी कोळी समाजाच्या मेळाव्यात याबद्दल चिंतेचा आणि तक्रारीचा सूर काढला गेला होता. पिढय़ान्पिढय़ा हा व्यवसाय करणाऱ्यांवर अशी वेळ का आली? टोपलीला टबने दिलेले हे आव्हान कोळिणी कशा पेलू शकतील?
काही फार नव्हे, पण तरी २०-२१ वर्षे तरी असावीत. रविवारी सकाळी एखादा अस्सल मालवणी जाईल तेथे म्हणजे मासळी बाजारात (मार्केट नाही आणि मच्छी मार्केट नाहीच नाही.) मी आणि माझे वडील निघालो होतो. मला नेण्याचं प्रयोजन म्हणजे मासे खाणाऱ्याला ते घेताही आले पाहिजेत ही त्यांची शिस्त.. तर त्या बाजारात प्रवेश करता करताच माझे पिताश्री म्हणाले, ‘‘हे बघ, माझ्या इथे २-३ कोळिणी ठेवलेल्या आहेत.. तुझी ओळख करून देतो..’’ आणि एखाद्या उद्यानात राजाने विहार करावा तसे ते वाटेतली मांजरं, टोपल्या, पाण्याचे
 
ओघळ यांना चुकवून सराईतपणे एका प्रशस्त कोळिणीकडे थांबले. समोरच्या माशांचा ढीग सफाईदारपणे तिने माझ्या बाबांसमोर टाकला. ताजे फडफडीत सरंगे (हलवे आणि आंग्लाळलेल्यांसाठी Black Pomphret) आपटले. किमतीवरून दोघांनी एकमेकांचा मनसोक्त उद्धार केला.
मी मात्र त्या कोळिणीकडेच पाहत होते. भला मोठा प्रशस्त देह.. चापूनचोपून नेसलेले लुगडे.. कोपरापर्यंत पोलका आणि उरलेलं अंग दागिन्यांनी मढलेलं. ठेवलेल्या या शब्दाचा अर्थ बाबांच्या ‘मामी’ या संबोधनातून स्पष्ट झाला.. माझ्या बापाच्या कंजूषपणाचा यथेच्छ उद्धार करून तिने तो फडफडीत सरंगा बघता बघता कापला आणि मी पहिल्यांदा आले म्हणून बचकभर कोलंब्या आमच्या पिशवीत कोंबल्या. कोंबताना म्हणाली, ‘पोरीसला घे, तू नको खावं.. डोकरा एकदम बेकार तुझा..’ आता वडिलांचा वारसा मुलगा चालवतोय..
विनोदाचा भाग सोडला तर जातिवंत मत्स्याहारीच्या अशा पिढिजात कोळणी ठरलेल्या असायच्या. आताचे MBA मार्केटिंगवाले झक मारतील, अशी त्यांची स्ट्रॅटेजी असायची. प्रत्येक गिऱ्हाईकाची कौटुंबिक माहिती त्यांना असायची. समजा माल नसेलच चांगला तर नेत्रपल्लवी व्हायची.. याच मामीने माझ्या बाळंतपणामध्ये मला खास मुडइशा (सुके lady fish) पाठवल्या होत्या. वडील गेल्याचे कळल्यावर तिने आमचे दु:ख हलके व्हावे म्हणून आमचे वाभाडे न काढता मासे दिले होते. स्व. जयवंत दळवी यांनी कोळिणी आणि त्यांचे पिढीजात ग्राहक याचे नाते सुरेख वर्णन केलेय. दारावर तशाच कोळणी यायच्या. श्रीयुत कोळी कधी दिसायचेच नाही. (कोळी नृत्य वगळता!) कोळणीची खासियत म्हणजे सीझननुसार मासे आणि ताजेपणाबद्दल खात्री.. पुन्हा अनेकदा उधारीही व्हायची.
या अशा ‘खान’दानी परंपरेतून आलेल्या मला एके दिवशी मुंबईच्या दूर उपनगरातल्या मैत्रिणीकडे गेले असता जबरदस्त धक्का बसला. रविवारी एक लुंगीवाला प्लॅस्टिकच्या टबमधून मासे घेऊन आला.. आणि मैत्रिणीने ते घेतले. मला मात्र ते पचनी पडणं कठीण गेलं. कारण एक तर पुरुष, पुन्हा तो मराठी नाही आणि प्लॅस्टिकचा टब..? मैत्रिणीचा युक्तिवाद बिनतोड होता.. मासळीबाजार तिच्या घरापासून लांब.. पुन्हा गर्दी, येण्याजाण्यात मोडणारा वेळ.. त्याऐवजी हा पर्याय उत्तम. त्यांच्या कॉलनीत तो मासेवाला नेहमीचा झाला होता.
शेवटी न राहवून एके दिवशी मी बाजार गाठला. इथे कोळणींना बोलकं करणं एकदम सोपं असतं. ‘तुम्ही त्या लांबच्या सोसायटय़ांमध्ये का जात नाही?’ असं विचारल्यावर उत्तर आलं, ‘येवत्या लांब कोन जानार? पुन्हा माल नाय उठला तर?’ मग इथे उरलेल्या माशांचं काय करता? या प्रश्नाला जबाब आला.. ‘बाजूच्या बारवाल्यांची मानसा येतात.’ इथे customer is king, Home Delivery ही स्ट्रॅटेजी मान्यच नव्हती.
पुढे पुढे मात्र ही टबवाली मंडळी राजरोस दिसू लागली. आधी ते दुपारी फिरायचे. आता सकाळी यायला लागले.. आपल्या बसण्याच्या जागेवर एक इंच जरी अतिक्रमण झालं तरी कोयता उचलणाऱ्या या मर्दानी कोळणींनी हे मान्य कसं केलं? ही शंका मनात यायचीच. अर्थात कितीही सोयीस्कर पडलं तरी टबातली मासळी माझ्या घरात त्याज्य होती म्हणा.. पण आता तर दूरची उपनगरे, वसाहती, नव्या कॉलन्या येथे दारावर येणारी कोळीण फार क्वचित आढळते. मराठी कोळी समाजाच्या या वहिवाटीला हल्ली टबवाल्यांनी चांगलाच शह दिलाय.. आणि आता तर चकचकीत मॉल्समध्येही scientifically cleaned fish मिळायला लागलंय.. तुम्हाला हवं तसं कापून सोलून मासे मिळायला लागले आहेत. बाजारात हे शक्य नसायचे. ‘झिंगा घरी झेजा.. बायकुला सांग सोलावा’ असं उत्तर सालासकट कोलंबी देताना यायचं. कुणी क्वचित मोठय़ा माशांचे हाडांशिवायचे पिसेस मागितले तर तमाम कोळी माम्या आणि मामा त्याला पार नव्‍‌र्हसच करायचे. ‘काटय़ाशिवाय मासळी खातो तू? कायपन गावनार नाय!’ मॉल्समध्ये मात्र ग्लोव्हज घातलेला अ‍ॅप्रनधारी अटेंडंट आपल्याला हवे तसे मासे कापून देतो आणि हो, कोळंबीचा दोरापण काढून देतो. असले नखरे करण्याची हिंमत बाजारात शक्यच नाही. आमच्यासारखे इरसाल आणि जातिवंत मासे खाणारे जे आहेत, ते आजही बाजारातच जातात, पण ती संख्या झपाटय़ाने कमी होतेय. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी हमखास दिसणाऱ्या कोळीण मावश्या/ माम्या हळूहळू गायबच होताहेत. त्यांचं ते विशिष्ट लुगडं आणि दागिने फक्त कोळीनृत्यात आणि कोळी महोत्सवातच दिसू लागलंय.
खरं म्हणजे मुंबईचे आद्य रहिवासी असलेला हा वर्ग. याने इथं भक्कमपणे टिकायला हवं होतं, कारण त्यांच्यात एक जातिवंत आक्रमकता आहे. स्वत:च्या रिवाजांना व रूढींना न सोडण्याची शक्ती आहे. मग आपल्या पोटावर सरळसरळ पाय येताना दिसूनही त्याविरुद्ध एकत्रित प्रयत्न झालेले आढळत नाहीत. मध्ये या परप्रांतीयांच्या घुसखोरीबद्दल कोळी स्त्रियांनी बराच विरोध केला होता.. नंतर थोडी फार परिस्थिती बदललीही होती, पण सध्या मात्र सगळेच थंड दिसतंय. तेज धारीचा कोयता आणि त्यापेक्षाही धारदार जिभेची गोमूबाय हळूहळू पाठी पडतेय.
वाईट वाटायचे कारण म्हणजे कोळी हे या मुंबई शहराच्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि पुन्हा त्यांचा व्यवसायसुद्धा कालबाह्य ठरलेला नाही. मग आता काय चुकतंय?
आपण मुंबई शहर, उपनगरे आणि परिसर यांचा विचार केला, तर त्यात अंदाजे कुलाब्यापासून डहाणू-पालघपर्यंत किनारपट्टी आहे. त्यात कुलाब्याचा कोळीवाडा आला, शिवडीचा आला आणि पुढे वेसावे, अर्नाळाही आला. या पट्टय़ामध्ये वांद्रे, माहीम, वेसावे आणि पुढे मालाड, वसईपर्यंत बहुतांशी ख्रिश्चन (किरिस्ताव-बोलभाषेत) कोळी समाज येतो. थोडाफार भाषेचा आणि वेशभूषेचा फरक सोडल्यास बाकी व्यवहार सारखाच असतो. पुन्हा उरण, नवी मुंबई येथलेही कोळी आहेत. या सर्वाच्या व्यवसायावर परिणाम झालेला आढळतोय. मला इथे फार खोलात जायचे नाही, कारण मग तो राजकीय प्रश्न होतो. मला खंत आहे ती गायब होणाऱ्या कोळीमाम्यांची.
काही कोळी व्यावसायिकांशी बोलल्यावर बऱ्याच बाजू कळल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायात तरुण पिढी येऊ इच्छित बघत नाही. माझ्या तरुणपणची मामी आता म्हातारी झालीय. तिची सून/लेक दुसरीकडे नोकरी करतात. पारंपरिक व्यवसायाची लाज वाटते म्हणून नव्हे, पण त्यांनाही वेगळं करायची इच्छा आहे आणि आपण दारोदार फिरलो तसे आपल्या मुलांनी फिरू नये, हे वाटले तर चूक नाही.
पहाटे तीनला उठून डॉकवर जाऊन मासे घेऊन ते बाजारात वा बाहेर फिरून विकणे आणि घरी जाणे हे येरागबाळ्याचे काम नाही. पुन्हा लोकलची गर्दी, टॅक्सीची भाडी हे घटक आहेतच. एका माझ्या कोळी मैत्रिणीने मला सरळ नेऊन बाजारातला त्यांचा संडास दाखवला. त्याला पाणी सोडाच, आडोसाही नव्हता. सकाळपासून एके ठिकाणी बसणाऱ्या बाईला साधी शरीरविधीलाही नीट जागा नव्हती.
दारोदार जाणाऱ्या विक्रेत्यांच्या वेगळ्या समस्या आहेत. पूर्वी चाळी होत्या. माणसाला माणूस ओळखायचं. एका मजल्यावर गेले की खालच्या-वरच्या मजल्यावरची गिऱ्हाईकं तेथे यायची. त्यातल्याच कुणाकडे शरीरविधी उरकता यायचा. आता पहिल्यांदा अडवतो वॉचमन. शिवाय प्रत्येकाच्या घरी जिने चढून जावं लागतं. लिफ्टमधून जायला बऱ्याच सोसायटय़ांमध्ये बंदी असते. डोक्यावर ओझं घेऊन ४-५ मजले चढायचे आणि पुन्हा माल खपेल याची गॅरंटी नाही.
एका मार्केटिंग तज्ज्ञाने यावर बोलताना सांगितलं की, बदलत्या गरजाप्रमाणे या वर्गाने स्वत:ला बदलवलं नाही. त्यात थोडं तथ्य आहे. पूर्वी चांगले मासे साधारणपणे दिवाळीनंतर मिळायचे, तोपर्यंत बारके मासे चालायचे. पण आजच्या ग्राहकाला बाराही महिने पापलेट आणि सुरमई हवी असते आणि ती पुरवण्याची क्षमता होडी घेऊन मासेमारी करणाऱ्या लहान कोळ्यांची नसते. साहजिकच मग मोठे ट्रॉलरवाले येतात. त्यांचा माल मधले दलाल घेतात आणि उरलेला गाळ लहान विक्रेत्यांना जातो.
या प्रश्नांवर महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी आणखी प्रकाश टाकला. त्यांच्या मते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायाकडे आजही सरकार पुरेशा गांभीर्याने पाहत नाही. रेल्वे स्थानकाजवळचे बाजार ५०-६० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत, ते तसेच आहेत. तिथे २४ तास पाणी नाही. स्वच्छतेची सोय नाही. पुन्हा बदलतं हवामान, प्रदूषण, वाहतूक, बर्फ या सर्वाचा परिणाम मासळीचे भाव वाढण्यावर होतो. जुनं गिऱ्हाईक तुटत नाही, पण नवं मात्र येत नाही.
अनंत तरे यांच्या मते परप्रांतीयांचं आक्रमण जे होतं, त्याला लोकांची मानसिकताही जबाबदार आहे. खराब पाण्यातला (प्रदूषित) मासा जातिवंत कोळी कधीही विकणार नाही, पण हे उपरे विक्रेते अशी कुठलीही चाड बाळगत नाहीत. माल खपला.. बस्स. एकेकाळी बेलापूर, उरण, वाशी पट्टय़ात उत्कृष्ट कोळंबी मिळायची. वांद्रे, माहीम भागात पापलेट आणि वसईपासून पुढे तर चंगळच होती. सध्या मात्र समुद्रात खोलवर गेल्याखेरीज मोठी मासळी मिळत नाही. बेसुमार प्रदूषण, अनेक पूल, प्रकल्प बांधकामे यामुळे खाडय़ा बुजून चालल्यात. साहजिकच त्याचा माशांवर परिणाम होतोच. इथे टिकू शकतात ते बडे ट्रॉलरवाले. त्यांचा निम्मा माल जातो एक्स्पोर्टला आणि निम्मा दलालांना. कोळी विक्रेत्यांचा मधला वर्ग आता नामशेषच होतोय. तरे यांनी या वेळी सांगितलं की, या व्यवसायाची अजिबात माहिती नसलेला मंत्री किंवा अधिकारी आमच्या समस्या कशा सोडवणार? कोळ्यांची नवीन पिढी या व्यवसायाकडे बघायला तयार नाही. ज्यांचा धंदा चालू आहे, अशा विक्रेत्यांच्या मालाला उठाव नाही. आर्थिक पाठबळ नाही.. कायदेशीर संरक्षण नाही आणि मुख्य म्हणजे एकसंध नेतृत्व नाही. त्यामुळे नेत्यांचा निम्मा वेळ अंतर्गत दुफळी शमवण्यातच जातो.
अनंत तरे यांनी आणखी एक नवा मुद्दा सांगितला तो म्हणजे अस्सल मराठी मासेखाऊ माणूस मुंबईत कमी होतोय. त्यांची जागा अन्य भाषिक घेत आहेत. त्यांची मागणी वेगळी असते आणि ती प्लॉस्टिक टबवाले पुरवतात.
काहीही असलं तरी How green was my valley च्या धर्तीवर माझ्यासारख्या अनेक मासेखाऊंना आजही कोळिणीशी भांडून, घासाघीस करून, आपला उद्धार करून मासे बाजारातून आणले नाहीत तर चवीने जेवल्यासारखं वाटतच नाही. खात्याची खोड.. मेल्याशिवाय जाणार नाही.
कोळीणमामी आणि तिचे ग्राहक यांची ही लव्ह-हेट रिलेशनशिप नवख्याला समजणार नाही. त्याकरिता शिवराकवारी (शाकाहारी दिवशी) तुकडी नाही, पण तळलेला सुरण/ कच्चं केळं जेवताना तोंडी लावून, उद्या रसाची आमटी करूया की मासे भाजूया- अशा चर्चा ज्या ठिकाणी होतात त्या मत्स्यगोत्री कुटुंबात जन्मावे, निदानपक्षी राहावे लागते.. हा संबंध कुठल्याही Consumer Relationship वाल्या तज्ज्ञाला चक्कर आणणारा आहे. त्यासाठी पाहिजे जातीचे खाणारे.. आणि विकणारेही..

अनंत तरे यांनी मासेविक्रेत्यांच्या समस्या सांगून अनेक पर्यायही सुचवले-
१) या धंद्याचं आधुनिकीकरण होत नाहीय. त्याला तसं ग्लॅमर नाही. चर्मोद्योग, कृषीक्षेत्र याकडे परंपरागत लोकांशिवाय अन्य लोकही येतात. तसं इथे नाही.
२) हा धंदा संपूर्णपणे हवामानावर, निसर्गावर अवलंबून आहे. कधी बेसुमार मासळी मिळते तर कधी काहीच नाही. त्यामुळे सरकारने ज्याप्रमाणे कापसाला हमी भाव आहे, तसा भाव इथे द्यायला हवा.
३) डिझेल सवलतीच्या दरात मिळायला हवं. शीतगृहांची संख्या वाढवून ती सामान्य विक्रेत्यालाही परवडतील अशा दराने उपलब्ध करायला हवीत. बंदरे गाळमुक्त करायला हवीत.
४) कोळीवाडे सध्या नामशेष होत आहेत. कोळीच राहिला नाही, तर मासे कोण विकणार? याकरिता अफझलपूरकर समितीच्या शिफारशी निदान विचारात घ्यायला हव्यात.
५) नव्याने उभे राहणारे मॉल्स, वसाहती, नगरे येथे ठराविक जागा देऊन त्या ठिकाणी पाणी, बर्फ, शौचालय, साठवण, सुरक्षा यांची सोय करायला हवी. तसेच सध्याच्या मासळीबाजारांची दुरुस्ती करायला हवी.
६) हा उद्योग पारंपरिक आणि अनेक वर्षांचा इतिहास असणारा आहे. त्यामुळे त्याला तसे कायदेशीर संरक्षण आणि सुविधा हव्यात.
शुभा प्रभू साटम