Leading International Marathi News Daily
शनिवार , २१ मार्च २००९

सचिनचे ४२ वे कसोटी शतक
भारताने विजयाचा रचला पाया
हॅमिल्टन, २० मार्च / पीटीआय

सचिन तेंडुलकरने आज सेडन पार्कवर ‘मास्टरक्लास’ पेश केला. त्याच्या १६० धावांच्या अप्रतिम खेळीमुळेच भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर तिसऱ्याच दिवशी मजबूत पकड मिळवता आली. पहिल्या डावात २४१ धावांची भक्कम आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने आज दिवसअखेर न्यूझीलंडचे तीन फलंदाज दुसऱ्या डावात माघारी परतवून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. भारताने सेडन पार्कच्या वेगवान खेळपट्टीवर ५२० धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात २४२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या यजमान न्यूझीलंडची भारताने दिवसअखेर ३ बाद ७५ अशी अवस्था केली.
(विजयी पाऊल पडते पुढे)

‘साहित्य महामंडळाला जेव्हा जाग येते’
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध
अध्यक्षाविनाच ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्याहस्ते ‘अक्षय आनंद सोहळ्या’चे उद्घाटन

सुनील माळी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री साहित्यनगरी, महाबळेश्वर, २० मार्च,

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या राजीनाम्यासाठी वारकरी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत इतके दिवस मिठाची गुळणी घेतलेल्या साहित्य महामंडळाने आज आपले डोळे किमान किलकिले केले. यादव यांचा राजीनामा हा लोकशाहीचा पराभव असल्याचा ठराव महामंडळाच्या आज झालेल्या ‘गुप्त’ बैठकीत मंजूर करण्यात आला. साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वाातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या समारोप सत्रात घेण्याचा ठरावही या बैठकीत झाला. त्यानंतर सायंकाळी ख्यातनाम गायिका आशा भोसले यांनी संमेलनाचे उद्घाटन करतांना,‘ साहित्यिकांमुळेच माझे जीवन घडले,’ अशा शब्दात साहित्य आणि साहित्यिकांविषयींची आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याचवेळी वारकऱ्यांच्या रोखाने छानशी गुगलीही टाकली! उद्घाटन समारंभातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पाटबंधारे मंत्री रामराजे निंबाळकर यांनी समाजातून हरवत चाललेली सहिष्णुता साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून टिकवून ठेवावी, असे आवाहन केले, तर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी बेलगाम, निराधार विधाने करण्याची संधी यंदाही सोडली नाही. साहित्याच्या या अक्षय आनंद सोहळ्याचे उद्घाटन अखेर अध्यक्षाविनाच पार पडले.

‘साऱ्याच भाषणाचे झाले सुरेल गाणे..!’
महाबळेश्वर, २० मार्च/विशेष प्रतिनिधी

‘‘सगळ्य़ा दर्जेदार साहित्यिकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं.. कविता वाचायला गेले नाही, पण कवितांनाच माझा आवाज आवडला. अन् त्या माझ्याकडं येऊ लागल्या,’’ असं म्हणत आशाताईंनी अनेक साहित्यिकांपाठोपाठ कवींची आठवण काढत त्या प्रतिभावंतांच्या काव्यसरींची बरसात आपल्या गर्भरेशमी आवाजामध्ये रसिकांवर केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसले यांच्या हस्ते झाले. तीन दिवसांच्या या संमेलनातील या सलामीच्या फलंदाजाने अख्खे मैदान नव्हे तर महाबळेश्वरच्या पोलीस परेड मैदानावरील मांडवाचा परिसर गाजविला. आशाताई गद्यात बोलल्या, पद्यातही ‘बोलल्या’, पण हे गद्य आणि पद्य यांतील फरकच जाणवत नव्हता. उत्स्फूर्तपणे, गप्पा माराव्यात तशा त्या रसिकांशी संवाद साधत होत्या. त्या रसिकांना हसवत होत्या, रडवत होत्या, सर्वसामान्यांच्या जीवनातील साहित्याचा अर्थ सांगत होत्या आणि त्याला दाद देताना गच्च भरलेल्या मांडवातील प्रत्येकजण समृद्ध होत होता. त्यामुळं बाहेर पडणारा प्रत्येक रसिक मनात गुंतूनच होता. ‘साऱ्याचं भाषणाचे झाले सुरेल गाणे..!’’

कौतिकरावांची मुक्ताफळे
‘‘इंदिरा संत यांना सुमार लेखकांकडून पराभूत व्हावे लागले.., संमेलनाला गर्दी वाढू लागल्याने बहुजन समाजाचे स्वागताध्यक्ष होऊ लागले..’’ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात अशी बेदरकार मुक्ताफळे उधळली. कौतिकरावांच्या मुक्ताफळांचा सर्व उपस्थितांनी तिथल्यातिथेच निषेध नोंदविला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष वि. भा. देशपांडे व माधवी वैद्य यांनी आपण ठाले पाटील यांच्याशी सहमत नसल्याचे सांगितले. तसेच अनेक साहित्यिकांनीही तशीच प्रतिक्रिया नोंदवली.

आशाताईंचे भाषण म्हणजे सुरेल संवादाची मैफलच!
सुनील माळी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री साहित्यनगरी, महाबळेश्वर, २० मार्च,

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसले यांच्या हस्ते झाले. आशाताई गद्यात बोलल्या, पद्यातही ‘बोलल्या’, पण हे गद्य आणि पद्य यांतील फरकच जाणवत नव्हता. उत्स्फूर्तपणे, गप्पा माराव्यात तशा त्या रसिकांशी संवाद साधत होत्या. ‘‘एके दिवशी सकाळी सकाळी एक फोन आला, गोड शब्दांत कुणीतरी सांगितलं ‘तुम्हाला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला यायचंय’ मी अवचितपणे हो म्हटलं. त्यानंतर मी टाळायचा केलेला प्रत्येक प्रयत्न अनेकांनी अयशस्वी ठरवला. त्यामुळं मी आज इथं आले आहे.’’ अगदी प्रांजळपणे अशी सुरुवात आशाताईंनी केली.

जागावाटपाचा चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात !
मुंबई, २० मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपात २६ व २२ जागांचे सूत्र मान्य झाले असले तरी याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी राष्ट्रवादीकडून अद्यापही ‘वेट अँण्ड वॉच’ अशी भूमिका घेण्यात आली आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. शेवटपर्यंत दोन्हीकडून चांगल्या जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काँक्रीटच्या विमानाचा पंख तुटला; मुलगा ठार
मुंबई, २० मार्च / प्रतिनिधी

जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम (जेव्हीपीडी) बागेतील सिमेंट काँक्रीटच्या विमानचा पंख तुटल्याने, त्याखाली सापडून आज आठ वर्षांचा एक मुलगा मरण पावला. या प्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या गंभीर प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव प्रवीण जमदाळे असून, तो जुहू कोळीवाडा येथील रहिवासी आहे. आज संध्याकाळी खेळण्यासाठी पालकांसोबत बागेत गेला असताना हा अपघात घडला. तो विमानाच्या बाजूला खेळत असताना अचानक काँक्रीटच्या विमानाचा उजवा पंख तुटला. त्याखाली सापडून तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तो मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच याप्रकरणी सुरू केलेल्या चौकशीत बागेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

 


प्रत्येक शुक्रवारी