Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

बिनमुद्दय़ाच्या निवडणुकीत मराठी हितालाच प्राधान्य - राज ठाकरे
नाशिक, २१ मार्च / प्रतिनिधी

उघड आणि छुप्या युत्या-आघाडय़ांचा देशभरात सध्या सुरू असलेला प्रकार उबग आणणारा असून त्यातच यंदाची लोकसभा निवडणूक बिनमुद्दय़ाची असल्याचे सांगताना अशा परिस्थितीत मराठी माणसाचे हीत व स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम असेल हे राज ठाकरे यांनी येथे मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडताना अधोरेखीत केले. येथील गोल्फ क्लब मैदानावर मनसेच्या प्रचार शुभारंभासाठी आयोजित सभेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राज यांनी विविध मुद्दय़ांना स्पर्श करीत आपण गेल्या तीन वर्षांत जी आंदोलने हाती घेतली ती तडीस नेल्याचे सांगून मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावरच भर दिला.

प्रजाराज्यम वास्तुनाडे..!
समर खडस, हैदराबाद, २१ मार्च

‘‘सामाजिक न्याय कोसम प्रजाराज्यम वास्तुनाडे..’ सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रजाराज्यम पक्ष आला आहे. तेलुगू सिनेजगताचा सुपरस्टार चिरंजिवीच्या एकेका शब्दासाठी आसुसलेल्या चार लाख लोकांच्या कानावर हे वाक्य पडताच त्यांनी टाळ्या, शिट्टय़ा आणि घोषणांच्या गदारोळात हैदराबादच्या मध्यवर्ती भागातील महाप्रचंड परेड ग्राऊंड अक्षरश: डोक्यावर घेतले.आजवर रेड्डींच्या काँग्रेसला किंवा कम्मांच्या तेलुगू देसमला कोणत्याही अपेक्षेशिवाय पाठिंबा देणाऱ्या कावू समाजाला चिरंजिवीच्या निमित्ताने नवा स्वजातीय राजकीय मंच मिळाला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा भरिप स्वतंत्रपणे लढणार
मुंबई, २१ मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने सहकार्यासाठी हात पुढे केला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. पक्षाने १९ उमेदवार जाहीर केले असून, स्वत: आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. यापूर्वी दोनदा आंबेडकर या मतदारसंघातून वियजी झाले होते. गेल्या वेळी तिरंगी लढतीत मात्र अकोल्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. आंबेडकर यांनी एकापेक्षा जास्त जागांची अपेक्षा व्यक्त केली होती.

शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये छुपी युती - राज ठाकरे
नाशिक, २१ मार्च / प्रतिनिधी

एकमेकांमधून विस्तव जात नाही, तरी देखील केवळ सत्तेसाठी विविध पक्षांचा युती व आघाडय़ांचा खेळ सुरू असल्याचे सांगतानाच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छुपी युती असल्याचा आरोप मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या प्रचाराचा नारळ आज नाशिकमध्ये फोडण्यात आला. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर शरसंधान साधत राज यांनी मराठीच्या मुद्यावर मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मनसेच्या आणखी तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये नाशिकसाठी हेमंत गोडसे, पुणे रणजित शिरोळे व ठाणे मतदार संघासाठी राजन राजे यांचा समावेश आहे.

‘पंतप्रधान’ पवार यांच्या प्रचारासाठीचे कोटय़वधींचे साहित्य वाया जाणार?
नवी दिल्ली, २१ मार्च/खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होणे तर दूरच त्यासाठी धडाकेबाज प्रचार मोहीम राबविण्यासाठी तयार करण्यात आलेले हायटेक प्रचार साहित्यही मतदारांपर्यंत पोहोचणे दुरापास्त झाले आहे. पंतप्रधानपदासाठी पवार यांचे नेतृत्व किती सक्षम आणि योग्य आहे, असा राज्यभर प्रचार करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हायटेक प्रचार साहित्य काँग्रेसच्या दडपणामुळे वाया जाण्याची चिन्हे आहेत.

गुरुदास कामत, गोविंदा, गायकवाड, शिंगडा यांच्या उमेदवारीचा खल सुरूच!
मुंबई, २१ मार्च / खास प्रतिनिधी

गुरुदास कामत, गोविंदा, एकनाथ गायकवाड, दामू शिंगडा या काँग्रेसच्या विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवरून अद्यापही खल सुरू आहे. मतदारसंघाची रचना बदलल्याने दोन विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळणार नाही तर दोघांचा पत्ता कापला जाईल, अशी चिन्हे आहेत.

निवडणुकीनंतरही कॉँग्रेसला समर्थन देणार नाही -बर्धन
नवी दिल्ली, २१ मार्च / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीनंतरही कोणत्याही स्थितीत कॉँग्रेसप्रणित सरकारला पाठिंबा देणार नसल्याचे भाकपेचे सरचिटणीस ए.बी. बर्धन यांनी सांगितले. जर आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो आम्ही का नाकारू, मग त्यामध्ये कॉँग्रेस असेल तरीही चालेल असेही ते म्हणाले. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा येथे आज प्रकाशित करण्यात आला त्यावेळी बोलताना बर्धन म्हणाले की, केंद्रात कॉँग्रेसप्रणीत आघाडी सरकार तसेच भाजपाच्या ‘रालोआ’ ला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. ही आघाडी साम्राज्यविरोधी धर्मनिरपेक्ष राजकारण तसेच स्वतंत्र आर्थिक धोरण राबविण्याची वेगळी व चांगली परंपरा पुढे नेतील.

राष्ट्रवादीला धडा! पवार समर्थक सुरेश देशमुखांची वर्धेत बंडखोरी
प्रशांत देशमुख, वर्धा, २१ मार्च

कोल्हापूरचे विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापाठोपाठ शरद पवार यांचे विदर्भातील एक कट्टर समर्थक, सहकाराच्या क्षेत्रातील दिग्गज प्रा. सुरेश देशमुख यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. ‘पक्षात गृहित धरले जाते’ असे कारण देत प्रा. सुरेश देशमुख यांनी लोकसभेची निवडणूक वर्धा मतदार संघातून अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश देशमुख राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात जुने व निष्ठावंत सहकारी तसेच विदर्भातील सहकार नेते प्रा. सुरेश देशमुखांच्या निर्णयाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडीला मोठा फ टका बसू शकतो. आपली उमेदवारी दत्ता मेघे यांच्या विरोधात नसून पक्षश्रेष्ठींना अस्तित्व दाखवून देण्यासाठी असल्याचेही प्रा. देशमुख यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेस बिहारमध्ये ३७ जागा लढविणार
नवी दिल्ली, २१ मार्च / पी.टी.आय.

संयुक्त पुरोगामी आघाडीला बिहारमध्ये लालू तसेच रामविलास पासवान यांनी केवळ तीन जागा देऊन हरताळ फासण्याचा प्रयत्न केल्याने चिडलेल्या कॉँग्रेसने ४० पैकी ३७ जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उर्वरित तीन जागा आरजेडी तसेच एलजेपी यांच्यासाठी सोडण्यात आल्याचे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे सांगितले. लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांनी आम्हाला विश्वासात न घेता जागावाटपाची बोलणी केली व केवळ तीन जागा सोडल्या. त्यामुळे आम्ही ३७ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून राहिलेल्या तीन पैकी दोन जागा आरजेडी तर एक जागा एलजेपीसाठी सोडल्याचे शिंदे म्हणाले. पक्षाच्या मध्यवर्ती निवडणुक समितीकडे ३७ जणांची यादी मंजुरासाठी पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविणार-अझरुद्दीन
जयपूर, २१ मार्च / पी.टी.आय.

पक्षाने सांगितले तर राजस्थान अथवा उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या आखाडय़ात उतरणार असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीन याने सांगितले. माझा कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. राजस्थान अथवा उत्तर प्रदेशमधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जर ‘हायकमांड’ ने सांगितले तर मी ते नाकारणार नाही असे सांगतानाच अझरने अप्रत्यक्षपणे निवडणुक लढविण्याची मनिषा व्यक्त केली. अझरला राजस्थानमधील टोंक-सवाईमाधेपूर मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

साधू यादव म्हणाले, ‘जय हो सोनिया, जय हो राहुल ’
नवी दिल्ली, २१ मार्च / पी.टी.आय.

लालू प्रसाद यांच्याशी बगावत करणाऱ्या साधु यादव यांनी आज कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. लालूप्रसाद यादव यांचे मेव्हणे असलेल्या साधु यांदव यांना बिहारमधील बेथिया मतदारसंघातून उमेदवारी हवनी होती. पण ‘एलजेपी’ शी केलेल्या युतीमध्ये ही जागा लालूंनी त्या पक्षाला दिल्याने साधु यादव यांनी बंडाचा झेंडा उभारली होता. राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन साधु आपल्या समर्थकांसहित थेट सोनिया यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी दाखल झाले. सोनिया यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी आपणाला कॉँग्रेसतर्फे बेथिया मतदारसंघातून उमेदवारी मिळेळ असा आशावाद व्यक्त केला. कॉँग्रेमध्ये आल्याने पुन्हा घरी आल्यासारखे वाटते असे म्हणतानाच साधु व त्यांच्या समर्थकांनी ‘जय हो सोनिया व जय हो राहुल’ अशा घोषणा देऊन आपल्या निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.