Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

सचिनची सोनेरी भेट
विनायक दळवी, मुंबई, २१ मार्च

न्यूझीलंडमध्ये आज इतिहास घडला. हॅमिल्टन कसोटी जिंकून भारतीय क्रिकेट संघाने ३२ वर्षांनी विजयाचा इतिहास घडविला. या इतिहासाचे कर्ते पुरुष होते सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, झहीर खान, इशान्त शर्मा, मुनाफ इत्यादी.. इत्यादी त्या सर्वामधला ज्येष्ठ होता सचिन तेंडुलकर. इतिहासाचे नवे पान लिहिता लिहिता या लिटिल मास्टरने त्या इतिहासावर नव्या आदर्शाची वेलबुट्टी काढली. सचिन तेंडुलकरने आपल्या सहकाऱ्यांसाठी एकमेकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची नवी परिमाणे निश्चित केली. पूर्वी राजे-महाराजे दर्जेदार कामगिरी करणाऱ्यांना आपला रत्नजडित कंठा बक्षीस द्यायचे. सचिनने आपल्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट सहा बळी घेणाऱ्या हरभजनसिंगला बक्षीस दिले. सोन्याचे हे ‘ब्रेसलेट’ सचिनसाठी सुदैवी ठरले होते.

मोहन भागवत नवे सरसंघचालक
सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी

नागपूर, २१ मार्च/प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी मोहन भागवत आणि सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. मावळते सरसंघचालक सुदर्शन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदत्याग करण्याची व्यक्त केलेली इच्छा मान्य करून भागवत यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. आज सकाळपासूनच संघ वर्तुळाला या बदलाचे वेध लागले होते. सकाळपासूनच नागपुरातील स्वयंसेवकांनी सायंकाळी संघ कार्यालयाच्या परिसरात जमावे, असे निरोप देण्यास सुरुवात झाली आणि संघातील संभाव्य बदलांची चाहूल लागली. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा सध्या रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात सुरू आहे. या प्रतिनिधी सभेत नव्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. सरसंघचालक पदासाठी मात्र निवडणूक होत नसते. मावळते सरसंघचालक नवीन सरसंघचालकांच्या नावाची घोषणा करतात. मावळते सरसंघचालक कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन हे त्यांच्या पदावर कायम राहतील, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. परंतु आज सकाळी काही वेगवान घडामोडी घडल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे निवडणुकीतील व्यस्ततेमुळे प्रतिनिधी सभेत येणार नाहीत असे संघाच्या अ.भा. प्रचार प्रमुखांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. तथापि राजनाथसिंग आज सकाळी तातडीने येथे आले. त्यामुळे काहीतरी महत्त्वाची घडामोड होणार, याची चाहूल लागली.

काँग्रेसच्या अटींमुळे पवारांपुढे पेच!
नवी दिल्ली, २१ मार्च/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात जातीयवादी तत्त्वांविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेससोबत युती करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही, असे निसंदिग्धपणे जाहीर करावे तसेच लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सोडून जाणार नाही याची हमी द्यावी, अशा अटी काँग्रेसश्रेष्ठींनी घातल्यामुळेच उभय पक्षांदरम्यानची जागावाटपाची बोलणी पुढे सरकत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

न्यूझीलंडचे ‘डर भजन’
‘टेस्ट’मध्येही भारत बेस्ट
हॅमिल्टन, २१ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज ऑफ स्पिनर हरभजनपुढे लोटांगण घातले. भज्जीने घेतलेल्या अर्धा डझन बळींमुळे भारताने न्यूझीलंडच्या मातीत तब्बल ३३ वर्षांंनंतर कसोटी विजय नोंदविला. न्यूझीलंडला १० विकेट्सनी पराभूत करून भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हरभजनने ६३ धावांच्या मोबदल्यात यजमानांचे ६ फलंदाज माघारी धाडले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात २७९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पहिल्या डावातही किवी संघाला एवढीच धावसंख्या गाठता आली होती. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात केवळ ३८ धावांची आघाडी घेतल्यानंतर राहुल द्रविड व गौतम गंभीर यांनी ही धावसंख्या ५.२ षटकांत पूर्ण करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने यापूर्वी १९७६मध्ये ऑकलंड येथे आठ विकेट्सनी न्यूझीलंडवर विजय मिळविला होता. ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. भारतीय संघ आता मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असून १९६८ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका जिंकली होती. सचिन तेंडुलकरने केलेल्या १६० धावांमुळे भारताने आपल्या पहिल्या डावात ५२०धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावात भारताला २४१ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडची अवस्था पाहता एका डावाने भारतीय संघ विजय मिळविल अशीच चिन्हे होती, पण ब्रेन्डन मॅकक्युलम (८४) आणि डॅनियल फ्लिन (६७) तसेच ओब्रायन यांनी केलेल्या चिवट खेळामुळे ३८ धावांची आघाडी घेण्यात न्यूझीलंडला यश आले. भारताची आता दुसरी कसोटी २६ मार्चपासून नेपियर येथे होणार आहे.

आयपीएलचे भवितव्य आज ठरणार
नागपूर, २१ मार्च/ प्रतिनिधी

सुरक्षेच्या मुद्यावरून केंद्र सरकारने कोंडी केलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या इंडियन प्रिमियर लीगचे दुसरे पर्व दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यासाठी आयोजकांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. कुठल्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पार पाडायचीच, असा निर्धार बीसीसीआयच्या थिंकटँकने केला असून त्यासाठी हा पर्यायही त्यांनी खुला ठेवला आहे. यासाठीच उद्या, मुंबईला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्य समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे. उद्या होणाऱ्या बोर्डाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर दुपापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे आयपीएलच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. एक तर स्पर्धेतील सामन्यांमध्ये कपात करणे, दुसरे म्हणजे, काही सामने भारतात आणि उर्वरित सामने परदेशात आयोजित करणे आणि तिसरे म्हणजे, स्पर्धाच रद्द करणे, असे तीन पर्याय आमच्यापुढे शिल्लक आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे दुसरे पर्व आयोजित करण्यासाठी सहर्ष सहमती दर्शवली असून बोर्डाचा ही स्पर्धा सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेल्या इंग्लंडमध्ये आयोजित करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमालियन चाच्यांकडून १६ भारतीय ओलीस
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी सोमालियन चाच्यांनी एका जहाजाचे अपहरण केले. या अपहृत जहाजावरील १६ भारतीयांना चाच्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती नौकानयन महासंचालकांनी दिली आहे. सोमालियन चाच्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता सदर जहाजाचे अपहरण करुन त्यावरील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याचे नौकानयन महासंचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भात, गहू, रिफाइण्ड तेल व अन्य प्रकारचा माल घेवून जाणारे हे जहाज दुबईहून मोगादिशूकडे जात असताना सोमालियन चाच्यांनी त्याचे अपरहण केले आहे. एडनच्या आखातातील भारतीय नौदलाच्या जहाजांसह मित्रराष्ट्रांच्या फौजांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांना ओलिसांच्या मदतीला जाण्यास सांगितले असल्याचे नौकानयन महासंचालकांनी म्हटले आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी