Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

योग अभ्यासक भानुदास गोरे यांची राष्ट्रपतींशी भेट
औरंगाबाद, २१ मार्च/प्रतिनिधी

येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आणि योग अभ्यासक भानुदासराव गोरे यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला कवितासंग्रह सादर केला.
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि पैठणचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरुण काळे हे यावेळी उपस्थित होते. जन्मत:च पायाने अपंगत्व आलेल्या आणि वयाच पंचाहत्तरी पार केलेल्या भानुदासराव गोरे यांच्या लिखाणाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. ‘आपुले भाग्य आपल्याच हाती’, ‘रोग अनेक उपचार एक- योगासने’ या स्वलिखित पुस्तकांच्या प्रती भानुदास गोरे यांनी राष्ट्पतींना भेट दिल्या. खासदार चंद्रकांत खैरे यांनी संत एकनाथ महाराजांची प्रतिमा राष्ट्रपतींना भेट दिली.

अखेर तिढा संपुष्टात
आघाडी कायम, काँग्रेस व राष्ट्रवादी चार-चार जागा लढविणार

औरंगाबाद, २१ मार्च/खास प्रतिनिधी

अखेर तब्बल ३० दिवसांच्या जागावाटप चर्चेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. या दोन पक्षांतील तिढा संपला आहे. आघाडी कायम झाल्याने मराठवाडय़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार-चार लोकसभेच्या जागा लढविणार आहेत. आज दिल्लीमध्ये आघाडी झाल्याची घोषणा करण्यात आली. जालना आणि उस्मानाबाद या दोन मतदारसंघावरून आघाडीमध्ये जोरदार वाद झाला होता.

चित्र-व्यथा
‘बाबा, हे बघा. कसं काढलंय?’ हातात चित्र घेऊन मुलगा उभा होता. त्याला प्रश्नाचं उत्तर हवं होतं. ‘छान.’ ‘मस्त.’ ‘झकास.’ ‘अरे वा!’.. असंच काही तरी. बाबांकडून कौतुकाची अपेक्षा होती त्याची. पतंग उडविणाऱ्या मुलांचं चित्र होतं ते. पाहिलं. चुका सांगत राहिलो त्याला. रंगसंगती कशी अजून चांगली झाली असती. मुलांच्या हाता-पायांचे कोन कसे दुरुस्त करता आले असते. प्रमाणबद्धता कशी कमी पडली आहे. पतंगांचे आकार कसे, मांजा कसा दिसला असता..बोलत होतो. अचानक सावध झालो. म्हणालो, ‘‘ते जाऊ दे. एवढं सगळं कमी असलं, तरी मस्त झालंय चित्र. मला तर कधीच, काहीच काढता येत नव्हतं. तू चांगलीच काढतोस चित्रं.’’

खासदार डी.बी. पाटील यांचे प्रेम फक्त रस्त्यांच्याच कामांवर
सर्वसमावेशक कामे झालीच नाहीत, निधीची मात्र १०० टक्के विल्हेवाट!

गणेश कस्तुरे, नांदेड, २१ मार्च

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात रस्त्याचीच कामे व्हावीत यासाठी आग्रही असलेल्या खासदार डी. बी. पाटील यांच्या निधीतून झालेल्या ४६६ कामांपैकी सुमारे ३०० कामे रस्त्याचीच झाली आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत १०० टक्के निधी खर्च करण्यात खासदारांनी यश मिळवले, एवढे मात्र निश्चित.खासदार निधीतून सांस्कृतिक सभागृह, नाल्यांचे बांधकाम, रस्ता, रस्ता मजबुतीकरण, विंधन विहीर, रुग्णवाहिका, शाळा खोली बांधकाम, हातपंप, शाळा-महाविद्यालयांना संगणक, प्रिंटर, प्रवासी निवारे, व्यायामशाळा यांसह सर्वसमावेशक कामे होणे अपेक्षित असताना नांदेडच्या खासदारांनी आपला बहुतांश निधी रस्त्याच्या कामासाठी वापरला.

‘आखिर कब तक’ पत्रकप्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड, २१ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नईआबादी परिसरात वाटण्यात आलेल्या ‘आखिर कब तक’ या पत्रकामुळे एकच खळबळ उडाली असून, गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींचे धागेदोरे अद्यापि पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

पूर्णा तालुक्यातील शिवसैनिक सेनेच्याच पाठीशी -जाधव
परभणी, २१ मार्च/वार्ताहर

निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिल्याच्या कारणावरून नाराज झालेल्या पूर्णा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे परत घेतले आहेत. शिवसेनाप्रमुखांचे सच्चे सैनिक म्हणून या पुढेही पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत उमेदवारास निवडून आणू, अशी ग्वाही त्यांनी आज एकमुखाने दिली. आमदार संजय जाधव यांनी पुढाकार घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

कैद्याचा कारागृहात मृत्यू?
नातेवाईकांकडून चौकशीची मागणी
तुळजापूर, २१ मार्च/वार्ताहर

दारू बाळगणे व जुगार खेळल्याच्या गुन्ह्य़ाखाली उस्मानाबाद जिल्हा कारागृहात दाखल झालेल्या युनूस नदाफ (वय ४५, रा. नळदुर्ग) या कैद्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून त्याच्या नातेवाईकांनी मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध त्वरेने कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी बनसोड यांच्याकडे केली आहे. इचकेच नव्हे तर संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही दिल्याचे समजते. दारू बाळगणे तसेच जुगार खेळल्याच्या गुन्ह्य़ाखालील न्यायप्रविष्ट प्रकरणात युनूस नदाफ सतत गैरहजर राहिल्यावरून तुळजापूर न्यायालयाने वॉरन्ट काढण्याचा आदेश दिला होता. याच्या अंमलबजावणीअंती नळदुर्ग पोलिसांनी ६-७ दिवसांपूर्वी त्याला न्यायालयात हजर केले होते व न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी कारागृहात झाली होती. तथापि, कसलीही सूचना वा कल्पना न देता पोलिसांनी युनूसला अटक केली व कोर्टात हजर केले, असा आरोप करून त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी शंका व्यक्त करून मृत्यूची त्वरेने चौकशी करावी, अशी मागणी केली. मृताच्या नातेवाईकांनी तक्रार निवेदन दिल्याबाबतही ‘लोकसत्ता’च्या वार्ताहरास दुजोरा दिला होता. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी लोकायुक्त व उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यावरून पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे.

‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष अभय साळुंकेंना कारणे दाखवा नोटीस
लातूर, २१ मार्च/वार्ताहर

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अनुसार मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांना लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्य़ांतून हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय निलंग्याच्या वतीने बजावण्यात आली आहे. ‘मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणून गैरकायदेशीर मार्गांद्वारे आंदोलने करून सामान्य जनतेचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. आपल्या विरोधात लातूर व निलंगा येथील पोलीस ठाण्यात विविध कारणास्तव गुन्हे दाखल आहेत. आपण गुंडगिरी व दादागिरी करून विघातक कृत्य करतात. आपल्याविरोधात तोंडी व लेखीही अनेक तक्रारी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात शांतता राखण्यासाठी आपल्याला हद्दपार का करण्यात येऊ नये? असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. कुभांड रचल्याचा आरोप आपले खच्चीकरण करण्यासाठी निलंग्यातील सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात हे कुभांड रचले आहे. माझी पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही; त्यामुळे अशा नोटिसीला आपण भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया अभय साळुंके यांनी व्यक्त केली आहे.

दुचाकींच्या धडकेत वाहतूक पोलीस ठार, तीन जखमी
अंबाजोगाई, २१ मार्च/वार्ताहर

अंबाजोगाई शहरापासून काही अंतरावर चनई शिवारातील अंबाजोगाई-बीड महामार्गावर दोन दुचाकींच्या धडकेत गस्त घालणारे वाहतूक पोलीस महारुद्र तोडकर हे जागीच ठार झाले, तर इतर तीन जखमी झाले असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
आज सायं. ६ च्या दरम्यान चनई पाटीवर लोखंडी सावरगाव रस्त्यावर एमएच-२४-६१८५ व एमएच-२३-जी-४७५४ या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस महारुद्र गोपीनाथ तोडकर (वय ४५) हे जागीच ठार झाले. तर एस. बी. शेख हे दुसरे वाहतूक पोलीस जखमी झाले. तसेच विजय दादा पवार (वय ५) व प्रल्हाद जनार्दन पवार (वय ४०) (दोघे रा. वरपगाव) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर वेळीच मदत न मिळाल्याने तोडकर हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

घाणेवाडी जलाशयातील हजारो मासे मृत्युमुखी
जालना, २१ मार्च/वार्ताहर

जालना शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशयातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शनिवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मासे तलावाच्या बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात तलावातील पाणी कमी झाल्याने गाळ वर आल्यावर प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे मासे मृत्युमुखी पडतात, असे या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जलाशयातील पाणी परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणावर मृत्युमुखी पडलेले मासे तलावाच्या बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

वीज कामगाराचा ऑटोच्या धडकेत मृत्यू
अंबाजोगाई, २१ मार्च/वार्ताहर

घाटनांदूरहून उजणीच्या ३३ केव्ही उपकेंद्राकडे जात असलेल्या गणपत आनंदराव चव्हाण (वय ४७) या वीज कामगाराच्या मोटरसायकलीला ऑटोने जोराने धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दोन वकिलांमध्ये न्यायालयातच हाणामारी
नांदेड, २१ मार्च/वार्ताहर

पुस्तक मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन वकिलांमध्ये न्यायालयातच हाणामारी झाली. कंधार येथे आज दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
सूत्रांनी सांगितले की, कंधार येथील न्यायालयात दुपारी अभिवक्ता संघाच्या कार्यालयात अभिवक्ता संघाचे सहसचिव अ‍ॅड. टी. एम. शिंदे यांनी उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव मोरे यांना वाचण्यासाठी पुस्तक मागितले. याच कारणावरून दोघांत सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकाला धक्काबुक्की केली. उपस्थित असलेल्या काही वकिलांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनीही त्यांना जुमानले नाही. न्यायालय परिसरातच ही घटना घडल्याने बघ्यांची गर्दी वाढली. नांदेड येथून न्यायालयीन कामकाजासाठी गेलेल्या काही वकिलांनी मध्यस्थी केल्यानंतर भांडणावर पडदा पडला.

‘राष्ट्रवादी’ च्या संपर्कात असल्याची अफवा - आमदार पंडित
बीड, २१ मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही नेते आपल्या संपर्कात नसून निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरविण्याचा व लोकांचे लक्ष विचलित करण्याचा खोडसाळ प्रयत्न असल्याचा खुलासा भाजपाचे आमदार अमरसिंह पंडित यांनी केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे, अशी चर्चा व अफवाही पसरू लागल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार अमरसिंह पंडित यांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, पक्षांतराचा त्यांना प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतचे वृत्तही एका दैनिकातून प्रसिद्ध झाले. या पाश्र्वभूमीवर अमरसिंह पंडित यांनी एका पत्रकाद्वारे खुलासा केला असून राष्ट्रवादीचा कोणताही नेता आपल्या संपर्कात नसून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

लोहा तालुक्यात १५ गावांना टँकरद्वारे पाणी
लोहा, २१ मार्च/वार्ताहर

लोहा तालुक्यातील १५ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आठ गावे टँकरसाठी प्रस्तावित आहेत. सोनखेड, गोळेगाव, शंभरगाव, दापशेड, कलंबर, वडेपुरी, सायाळ, भाद्रा- भाद्रा तांडा, बोरगाव (आ.), सावरगावअंतर्गत वाडी-तांडे, माळाकोळीअंतर्गत तांडे व घुगेवाडी या गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी आठ टँकर प्रस्तावित आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच भूजल पातळी खालावल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जवळपास अडीच महिने उन्हाची तीव्रता राहणार असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांना पाणीटंचाईच्या झळा बसणार, असे चित्र समोर आले आहे.

आयआयएचटीच्या लातूर केंद्राचे उद्या उद्घाटन
लातूर, २१ मार्च/वार्ताहर

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी देशातील आघाडीची संस्था इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हार्डवेअर टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयएचटीची अद्ययावत शाखा शहरात सुरू होत आहे. डॉ. गोपाळराव पाटील व जगप्रसिद्ध सिक्युरिटीतज्ज्ञ अंकित फादिया यांच्या हस्ते सोमवारी (दि. २३) सायंकाळी ५.३० वा. उद्घाटन होणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर जोशी यांनी दिली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

अंधांच्या मतदानासाठी ब्रेल लिपीचा वापर
हिंगोली, २१ मार्च/वार्ताहर

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणूक काळात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. अंधांसाठी १७५९ मतदान केंद्रांवर ब्रेल लिपीचा वापर करून मतदान करण्याची सोय करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान यंत्राची माहिती दुर्गम डोंगराळ भागातील रहिवाशांना देऊन मतदान कसे करावे याची माहितीही देण्यात येणार आहे. तसेच १४ ते १७ एप्रिल आणि १५ ते १७ मे दरम्यान दारू विक्रीवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनिता सिंघल यांनी दिली आहे.

ढाब्यांवर अवैध मद्यविक्री!
गंगाखेड, २१ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू असतानाही महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे शहर व परिसरात अवैध चालणाऱ्या ढाब्यांवर खुलेआम मद्यविक्री होत आहे. नवा मोंढा, बसस्थान, परळी नाका व परळी वैजनाथ रस्ता या परिसरात खानावळी व ढाब्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या खानावळीवर खुलेआम मद्यविक्री होत असते. परळी नाका परिसरात एक कायदेशीर बार व अवैध १० ते १५ ढाबे आहेत. राज्य हमरस्त्यावरील ढाब्यात मद्यविक्री होत आहेत. निवडणुकीच्या काळात अवैध खानावळी व ढाबेचालकांवर बंधने राहावीत म्हणून आचारसंहितेत स्पष्ट सूचना केलेल्या असतानाही मद्यविक्री वाढली आहे. पोलिसांनी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर एका हॉटेलवर छापा घालून हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला.

सेतू केंद्रातून संगणकाची चोरी
जिंतूर, २१ मार्च/वार्ताहर

येथील तहसीलच्या आवारातील सेतू केंद्रातून दोन संगणक चोरीला गेले असून, या प्रकरणी सेतू केंद्रचालक दिलीप अप्पासाहेब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
केंद्राचे दार तोडून चोरटय़ांनी ३६ हजार रुपये किमतीचे दोन संगणक पळविले. पंधरा दिवसांपूर्वी मोबाईल व स्टुडिओचे दुकान फोडून दोन लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी पळविला होता.

कळमनुरीमध्ये पाणीटंचाई
हिंगोली, २१ मार्च/वार्ताहर

हिंगोली जिल्ह्य़ातील कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाई झाली असून २८ गाव टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. यापैकी १३ ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे. पाणीटंचाई संदर्भात कळमनुरी पंचायत समितीने यंदा २ कोटी २३ लाख निधीची मागणी पाणीटंचाई निवारण आराखडय़ातून केली आहे. कळमनुरी तालुक्यात एकूण १०३१ विंधन विहिरी असून ५६ विंधन विहिरी खोदण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

कथालेखन स्पर्धेत चैताली भोसले प्रथम
औरंगाबाद, २१ मार्च/खास प्रतिनिधी

औरंगाबाद महानगरपालिकातर्फे आयोजित निसर्ग कट्टा उपक्रमांतर्गत ‘शोध उद्याच्या मराठी लेखकाचा’ कथालेखन स्पर्धेत शारदा मंदिरच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व सिद्ध केले. चैताली भोसलेने प्रथम व अबोली देशमुखने दुसरा क्रमांक मिळविला. जागतिक वनीकरणा दिनानिमित्त स. भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. चैताली भोसले आणि अबोली देशमुख यांना अनुक्रमे एक हजार व सातशे पन्नास रुपयांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. चैतालीने ‘मोत्या’ तर अबोलीने ‘मानवता’ ही कथा लिहिली होती. शारदा मंदिरच्या ऋतुजा कौशिके हिने ‘गॉडमदर’ ही कथा लिहून तिसरे स्थान प्राप्त केले. मंगेश बक्षीआणि त्रिवेणी काकडे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य रा. रं. बोराडे, स. भु. शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, निसर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. विजय दिवाण, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योती शास्त्री आणि पक्षीमित्र दिलीप यार्दी यांच्या हस्ते झाला.

कोक येथे दीड लाखांचा कडबा जळून खाक
बोरी, २१ मार्च/वार्ताहर

बोरीजवळ असलेल्या कोक येथील जनार्दन रासवे यांच्या शेतातील कडबा जळाल्याने दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. कोक येथील प्रगतशील शेतकरी जनार्दन शिवाजीराव रासवे यांच्या शेतात कडब्याच्या १५ हजार पेंढय़ा ढीग करून ठेवल्या होत्या. वळई रचणाऱ्या माणसास आणण्यासाठी श्री. रासवे सकाळीच गेले होते. अचानक दुपारी १२च्या सुमारास कडब्याला आग लागली. ग्रामस्थांनी लगेच रासवे यांना कळवले. पाहता पाहता कडब्याच्या पाचही ढिगाला आग लागली. आगीने एवढे रौद्र रूप धारण केले होते की, त्या ठिकाणी असलेले नारळाचे उंच झाड आगीत भस्मसात झाले. जिंतूर व परभणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यापूर्वी ग्रामस्थांनी जनाभाऊ रासवे व बाबासाहेब पाराजी रासवे यांच्या विहिरीचे पाणी मोटर लावून आग विझविण्यासाठी वापरले. सायंकाळी सातपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू होते.

उषा सातपुते यांना उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार
औरंगाबाद, २१ मार्च/खास प्रतिनिधी

येथील जलसंपदा विभागातील प्रथम लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या उषा सोनाजीराव सातपुते यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रशासकीय कौशल्याद्वारे ज्या कर्मचाऱ्यांनी आपले नैपुण्य दाखवून प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न केले, अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय झाला. प्रथम लिपिक संवर्गातून उषा सातपुते यांना २००६ आणि २००७ या दोन्ही वर्षांचे पुरस्कार मिळाले आहेत. जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. उषा सातपुते या मूळच्या बीडच्या. विद्यार्थी दशेत युक्रांद चळवळीत सहभागी झाल्या होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांच्या चळवळीतही त्या अग्रभागी असतात. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटनेच्या त्या राज्याच्या उपाध्यक्ष आणि औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या अध्यक्षा आहेत.

दुचाकीची धडक; वकील जखमी
औरंगाबाद, २१ मार्च/प्रतिनिधी

भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने वकील संतोष गोपीकिसन मालपाणी हे जखमी झाले. काल, शुक्रवारी सायंकाळी निराला बाजार येथे हा अपघात झाला. त्या दुचाकीस्वाराने अन्य एका दुचाकीलाही धडक दिली. मालपाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम एच २०- एच आर ३३४७ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत झाल्टा फाटा येथे पायी जाणारे लियाकत शहा (५०) यांना दुचाकीने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उमेदवारांची तुळजापूरमध्ये रीघ; देवीस साकडे
तुळजापूर, २१ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व अपक्ष इच्छुकांनी आपापल्या समर्थकांसह तुळजापूर क्षेत्री येवून देवीदर्शन घेऊन साकडे घालत असल्याचे गेल्या पाच-सहा दिवसांत दिसूत आहे. आमदार रवि गायकवाड, माजी मंत्री पद्मसिंह पाटीलसह सोलापूर जिल्ह्य़ातील तसेच मराठवाडय़ातील अनेक इच्छुकांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तुळजामातेस साकडे घातल्याचे दिसून आले. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना उस्मानाबाद मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी आग्रह करण्यासाठी श्रेष्ठी प्रयत्नशील असल्याच्या वृत्तावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार यादीच्या घोषणेकडे लक्ष लावून आहेत.

सूर्यकांता पाटील यांच्या ‘कार्यपर्व’चे प्रकाशन
हिंगोली, २१ मार्च/वार्ताहर

‘‘काम करणाऱ्यांविरुद्ध काम न करणारे अशी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली जाणार असल्याने मागील पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा सचित्र लेखाजोखा ‘कार्यपर्व’ पुस्तिकेच्या माध्यमातून सादर करण्यात मला आनंद आणि अभिमान वाटतो,’’ असे उद्गार केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी काढले. ‘कार्यपर्व’ पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘कार्यपर्व’चे प्रकाशन हिंगोली जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात श्री. दांडेगावकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाचा समन्वय चांगला असल्याने शेवटच्या टोकावर असलेल्यांचेदेखील भले करण्याचा संकल्प सिद्धीस गेल्याचे म्हटले. श्रीमती पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासह सर्वसामान्यांच्या हितासाठी कोटय़वधींचा निधी आणला जो ऐतिहासिक नोंदीचा असल्याचे म्हटले. माजी खासदार विलास गुंडेवार, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी याप्रसंगी उपस्थित होते.

लातूर विभागातील ८५२ जण तीन वर्षांसाठी रस्टिकेट
उस्मानाबाद, २१ मार्च/वार्ताहर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत भरारी पथकाने ८५२ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविला. लातूर विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांत बारावीचे २८१, तर दहावीचे ५७१ विद्यार्थी भरारी पथकाच्या हाती लागले. पुढील तीन वर्षे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. यंदा तर लातूर विभागात कॉप्यांचा महापूरच होता. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३९ पथके तयार केली होती. त्याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्य़ात सात भरारी पथकेही तैनात करण्यात आली होती.
इयत्ता १२ वीचे २८१ तर १० वीच्या ५७१ विद्यार्थ्यांना कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. तसेच केंद्रप्रमुख व निरीक्षकांनाही भरारी पथकाने कॉपीस प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कारवाई प्रस्तावित केली आहे. मात्र याबाबत मंडळाकडून निश्चित आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील तीन वर्षे कोणतीही परीक्षा देता येणार नाही.