Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मोहन भागवत नवे सरसंघचालक
सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी
नागपूर, २१ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी मोहन भागवत आणि सरकार्यवाहपदी भैय्याजी जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली. मावळते सरसंघचालक सुदर्शन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदत्याग करण्याची व्यक्त केलेली इच्छा मान्य करून भागवत यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
आज सकाळपासूनच संघ वर्तुळाला या बदलाचे वेध लागले होते. सकाळपासूनच नागपुरातील स्वयंसेवकांनी सायंकाळी संघ कार्यालयाच्या परिसरात जमावे, असे निरोप देण्यास सुरुवात झाली आणि संघातील संभाव्य बदलांची चाहूल लागली. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा सध्या रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात सुरू आहे. या प्रतिनिधी सभेत नव्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. सरसंघचालक पदासाठी मात्र निवडणूक होत नसते. मावळते सरसंघचालक नवीन सरसंघचालकांच्या नावाची घोषणा करतात. मावळते सरसंघचालक कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन हे त्यांच्या पदावर कायम राहतील, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. परंतु आज सकाळी काही वेगवान घडामोडी घडल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे निवडणुकीतील व्यस्ततेमुळे प्रतिनिधी सभेत येणार नाहीत असे संघाच्या अ.भा. प्रचार प्रमुखांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. तथापि राजनाथसिंग आज सकाळी तातडीने येथे आले. त्यामुळे काहीतरी महत्त्वाची घडामोड होणार, याची चाहूल लागली.
मूळचे चंद्रपूरचे असलेले डॉ. मोहन मधुकर भागवत यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी झाला. त्यांनी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी (बी.व्ही.एस्सी. अँड डी.एच.) मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्पकाळ नोकरी केल्यावर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. संघात प्रांत प्रचारक, अ.भा. शारीरिक प्रमुख यासारख्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ११ मार्च २०००ला त्यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून सलग ९ वर्षे ते या पदावर आहेत. मोहन भागवत हे मृदुभाषी व्यक्तिमत्व असून संघात त्यांचा अतिशय व्यापक संपर्क आहे. अगदी सामान्य स्वयंसेवकांनाही नावाने ओळखणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. ते ‘टेक्नोसॅव्ही’ आहेत. त्यांनी संघात शिस्त आणण्यासोबतच तणाव दूर करून संघ आणि भाजपात सुसंवाद निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश मिळवले. भागवत हे गोळवलकर गुरुजी यांच्याप्रमाणेच कऱ्हाडे ब्राह्मण आहेत.
नवे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे मूळचे इंदूरचे असून १९४७ साली जन्मलेले भैय्याजी जोशी यांनी ठाणे या शहरात शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी संपादन केली आहे. ते कलाशाखेचे पदवीधर आहेत. विधायक सेवा कार्य करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. सहसरकार्यवाह होण्यापूर्वी अनेक वर्षे त्यांनी संघाचे सेवा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी यांच्या नियुक्तीने संघ तरुण झाल्याचा दावा केला जात असून, मोहन भागवत यांचे वय ५९ तर भैय्याजी जोशी यांचे वय ६३ असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. असे असले तरी संघाचे सर्वात तरुण सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे होते. वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यांची सरसंघचालकपदी नियुक्ती झाली होती. आजवरच्या सरसंघचालकांमध्ये रज्जूभैया व सुदर्शन वगळता इतर सर्वजण मराठी भाषक होते. भागवत यांच्या रूपाने आणखी एक मराठी व्यक्ती या पदावर आली आहे. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे कुटुंब मूळचे आंध्रच्या तेलंगण भागातले, परंतु नंतर ते नागपुरात स्थायिक झाले होते.
मोहन भागवत यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या सरकार्यवाह या पदावर भैय्याजी जोशी यांची निवड करण्यात आली. ते मावळत्या कार्यकारिणीमध्ये सहसरकार्यवाह होते. गेले दोन दिवस सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांची या पदावर निवड होणार असल्याची चर्चा होती, परंतु ऐनवेळी भैय्याजी जोशी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.