Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या अटींमुळे पवारांपुढे पेच!
नवी दिल्ली, २१ मार्च/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात जातीयवादी तत्त्वांविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेससोबत युती करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही, असे निसंदिग्धपणे जाहीर करावे तसेच लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला सोडून जाणार नाही याची हमी द्यावी, अशा अटी काँग्रेसश्रेष्ठींनी घातल्यामुळेच उभय पक्षांदरम्यानची जागावाटपाची बोलणी पुढे सरकत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये आणि निवडणुकांनंतर शरद पवार काय करतील, याचा भरवसा उरला नसल्याने काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्याशी जागावाटपाच्या बोलणीत या दोन महत्त्वाच्या अटी घातल्याचे समजते. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण हवे आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. पण नेमके कोणते स्पष्टीकरण हे सांगण्याचे त्यांनी टाळले आहे. मात्र, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही आणि मनमोहन सिंग हेच आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तसेच आपण निवडणुकांनंतरही युपीएमध्येच राहू याविषयी ‘वचनबद्ध’ होण्यास पवार वा त्यांचे सहकारी अजून तयार झालेले नसल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचा समझोता केला तरीही पवार नेहमीप्रमाणे काही अपक्ष उमेदवारांना िरगणात उतरवून काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करतील, हेही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या प्रेरणेने काँग्रेसच्या विरोधात उभ्या झालेल्या अशा काही ‘संशयित’ उमेदवारांना बसविण्याची जबाबदारीही पवार यांनी स्वीकारावी म्हणून त्यांना जागावाटपाचा समझोता होण्यापूर्वी गळ घातली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या मते काँग्रेसश्रेष्ठी या मुद्यांवर पवार यांच्याकडून प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहेत. काँग्रेसश्रेष्ठींच्या सांगण्यावरून पंतप्रधानांची खुर्ची रिकामी नाही, असे पवार यांच्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते व परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी मुंबईत येऊन इशारा दिल्यानंतरही
अद्याप पवार यांच्याकडून प्रतिसाद आला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शुक्रवारी रात्री सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत युतीचा मुद्दा अनिर्णित ठेवण्यात आल्याचे समजते. बिहारमध्ये तारीक अन्वर काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत, तर मेघालयमध्ये संगमा यांनी काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडली आहे. यातून काँग्रेसकडे संमिश्र सिग्नल्स पाठवून पवार यांनी स्वतविषयीचा संभ्रम कायम राखल्याचे सांगण्यात येते.