Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अर्धांगिनींना बिल्डर बनविणारे म्हाडा अभियंते निलंबित!
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी
भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये नोकरी करता करता बिल्डर होण्याचे स्वप्न

 

अर्धागिनींच्या माध्यमातून पूर्ण करणाऱ्या तिघा अभियंत्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी गौतम चॅटर्जी यांनी आज या आदेशावर सह्या केल्या. आजच किंवा सोमवारी या अभियंत्यांवर निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
‘म्हाडा अभियंत्यांच्या अर्धांगिनी बनल्या बिल्डर’ या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम (१६ फेब्रुवारी) प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या तिघा अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. सध्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पात प्रतिनियुक्तीवर असलेले केतन पडते, मुंबई मंडळाच्या वांद्रे डिव्हिजनचे रमेश अकुलवार आणि झोपडपट्टी सुधार मंडळातील प्रसाद धात्रक अशी या तीन निलंबित अभियंत्यांची नावे आहेत.
नोकरीत असताना अन्य व्यवसाय करता येत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नींच्या नावे सिद्धाई होम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर अशी कंपनी स्थापन केली आहे. दहिसर-चुनाभट्टी येथील एमएचबी कॉलनीतील ३२ ते ३४ क्रमांकाच्या स्नेहसागर तसेच १६ ते १८ क्रमांकाच्या साफल्य या सोसायटीच्या पुनर्विकासासाठी वास्तुतज्ज्ञ सुहास बोराळे यांनी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावात त्यांनी ६० रहिवाशांना फक्त २३० चौरस फुटाची सदनिका देण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे साफल्य या सोसायटीबरोबर त्यांचा करारनामाही झाला नव्हता. सदर कंपनी आपल्या नावावर नसून पत्नीच्या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा यापैकी दोघा अभियंत्यांनी सदर प्रतिनिधीकडे केला होता. विशेष म्हणजे या तिन्ही अभियंत्यांच्या पत्नींचा बांधकाम क्षेत्राशी अजिबात संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.