Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

सव्वाशे गाडय़ा चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात!
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

उत्तर प्रदेश येथील व्यावसायिक अस्लम खान याची निवडणुकीपूर्वी हत्या करण्यासाठी ३५ लाख

 

रुपयांची सुपारी घेणाऱ्या सानेअली जमालउद्दीन खान ऊर्फ गुड्डू (२५) याला डी. एन. नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप सूर्यवंशी यांच्या पथकाने अटक केली. मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातून सुमारे सव्वाशे गाडय़ा चोरणाऱ्या टोळीचाही गुड्डू म्होरक्या असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
गुड्डू हा गाडी चोरी करण्यासाठी आल्याची पक्की खबर मिळवून श्रीकांत तावडे, शिवाजी बोरसे, धनंजय जाधव या पोलिसांनी सापळा रचून पश्चिम उपनगरातून अटक केली. त्याचे फरार साथीदार इम्रान, शकील तोतला, इशियाक, मुन्ना लंगडा, खुर्शीद आदींचाही शोध जारी करण्यात आला आहे.
गुड्डूने साथीदाराच्या मदतीने कुलाबा, पनवेल, नेरूळ, कौपरखैराने, सानपाडा, घोडबंदर रोड आदी परिसरातून बोलेरो, सँट्रो, तव्हेरा आदी सुमारे सव्वाशे गाडय़ांची गेल्या काही महिन्यांत चोरी करून त्या गाडय़ा गुजरात, बिहार येथे विकल्याची कबुली गुड्डूने दिल्याचे सहाय्यक आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
सानपाडा येथील वर्धमान ज्वेलर्समध्ये २९ सप्टेंबर २००६ रोजी घुसून गुड्डूने गोळीबार केला होता. या गुन्ह्यात त्याने काळ्या रंगाच्या चोरीच्या सॅण्थ्रो गाडीचा वापर केला होता. ऑक्टोबर २००६ मध्ये त्याने नेरूळ सर्कल येथे रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रक्कम लुटली होती. मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा गुड्डू हा सुलतानपूर टोळीच्या नावाने महाराष्ट्रात अनेक गुन्हे केले आहेत.