Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईसाठी हायकोर्टात अर्ज
मुंबई, २० मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने ठाण्याच्या लोकमान्य नगरातील पाडा क्र. एक येथे

 

बांधलेल्या पाचमजली अनधिकृत इमारतीवर महापालिकेने सुरु केलेली कारवाई त्या पक्षाचे विधान परिषदेतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हस्तक्षेप करून बंद पाडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन आ. आव्हाड यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) कारवाई केली जावी यासाठी एक अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयात केला गेला.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचेच एक बंडखोर नगरसेवक सुधीर प्रल्हाद बर्गे यांनी अ‍ॅड. एस. एस. कुलकर्णी यांच्यामार्फत हा अर्ज केला आहे. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांसंबंधी वसई येथील ह्युमन राईटस् असोसिएशनतर्फे पन्नालाल एस. एस. यांनी केलेली एक जनहित याचिका प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सर्व बेकायदा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने याआधीच दिले आहेत व त्यावर देखरेख करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीही नेमली आहे.
१८ मार्च रोजी लोकमान्यनगरातील पाच मजली अनधिकृत इमारतीविरुद्ध महापालिकेने सुरु केलेली कारवाई आ. अव्हाड यांच्या हस्तक्षेपामुळे बंद पडली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचा हवाला देऊन नगरसेवक बर्गे यांनी हा अर्ज केला आहे. आ. आव्हाड यांचे हेवर्तन न्यायदान प्रक्रियेतील हस्तक्षेप असल्याने त्यांच्यावर ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. बेकायदा बांधकामे करणाऱ्या, त्यांना संरक्षण देणाऱ्या किंवा त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची तरतूद महापालिका कायद्यात आहे. मात्र आमदाराच्या बाबतीत अशी तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे नगरसेवक अशा कामांसाठी आ. आव्हाड यांचा वापर करून घेतात, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे.