Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘नॅनो’चे सोमवारी आगमन; प्रत्यक्षात गाडीसाठी प्रतीक्षा मात्र दीड वर्षांची!
मुंबई, २१ मार्च/व्यापार प्रतिनिधी

टाटा उद्योगसमूहाची कंपनी टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘नॅनो’ मोटार अखेर

 

सोमवारी विधिवत बाजारात दाखल होईल. जगातील सर्वात स्वस्त म्हणून लौकिक पावलेली ही कार प्रत्यक्षात चालू वर्षांच्या सप्टेंबरनंतर रस्त्यावर धावताना दिसेल. तर सर्वसामान्यांनी एप्रिलमध्ये केलेल्या बुकिंगनंतर प्रत्यक्षात कार मिळविण्याची प्रतीक्षा दीड वर्षांपर्यंतही लांबू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
वर्षभरापूर्वी नवी दिल्लीच्या ‘ऑटो शो’मध्ये नॅनोवरील पडदा पहिल्यांदा दूर सारण्यात आला तेव्हापासून आजतागायत गेल्या १५ महिन्यांत या छोटेखानी कारला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आहे. ‘नॅनो’चे सुबक रूपडे गेल्या ऑटो शोमध्ये खासच लक्षवेधी व उत्सुकता निर्माण करणारे ठरले होते. अॅल्युमिनियमपासून बनलेले ६२४ सीसी व ३३ हॉर्सपॉवरचे पेट्रोल इंजिन असलेली टाटा नॅनो म्हणजे सामान्य मध्यमवर्गीयांच्या मोटार बाळगण्याच्या स्वप्नांना मूर्तरूप देणारा चमत्कारच होता. म्हणून नॅनोला ‘जनतेची कार’ असेही गौरवाने म्हटले जाऊ लागले. पण या कारची किंमत आणि प्रतीक्षा ही मूळ आश्वासनापेक्षा जास्तच असेल, असा तर्क आता व्यक्त केला जात आहे.
सोमवारच्या मुंबईत होत असलेल्या कार्यक्रमात टाटा मोटर्सकडून या तर्कवितर्काना पूर्णविराम देणारा नॅनोविषयीचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे जाहीर केला जाईल. तोवर त्यासंबंधी कोणतेही विधान न करण्याचे संकेत कंपनीचे अधिकारी काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. इतकेच काय टाटा मोटर्सच्या नियमित डीलर्सनाही यासंबंधाने अद्याप कोणतीच माहिती दिली गेलेली नाही, असे फॉच्र्युन कार्सचे विक्री व्यवस्थापकांनी सांगितले. येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून बुकिंग सुरू होईल आणि प्रत्यक्षात जुलैअखेपर्यंत पहिली डिलिव्हरी सुरू होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथील पूर्वनियोजित प्रकल्प अकस्मात गुजरातमध्ये हलवावा लागल्याने, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी नॅनोची विक्री सहा महिने लांबणीवर पडली. तर गुजरातमधील नियोजित प्रकल्पातून उत्पादनही २००९ अखेरपासून सुरू होऊ शकणार आहे. तोवर टाटा मोटर्सच्या पंतनगर (उत्तरांचल) येथील प्रकल्पातून तात्पुरत्या स्वरूपात नॅनोचे उत्पादन घेतले जात असून, चालू वर्षांत केवळ ५० हजार मोटारीच विक्रीसाठी उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नॅनोसाठी उत्सुकांना आणखी दीड वर्षे तरी प्रतीक्षा करणे भाग आहे, मात्र आताच त्यासंबंधाने दररोज शेकडो ग्राहकांकडून चौकशी सुरू असल्याचे वासन मोटर्स आणि फॉच्र्युन कार्स या टाटा मोटर्सच्या दोन्ही मुख्य विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. गुजरातमधील प्रकल्पातून पुढल्या वर्षी दरसाल अडीच कार या क्षमतेने उत्पादन सुरू होईल.
जनतेची कार असलेली नॅनो ही अस्सल व गरजू ग्राहकांच्याच हाती पडेल याला प्राधान्य देणारेच कंपनीचे धोरण असेल, असा विश्वासही डीलर्सकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नॅनोसाठी एकरकमी ५० ते ७० हजार रुपयांचा आगाऊ एकरकमी भरणा अनिवार्य केला जाणार असून, जोवर कारची डिलिव्हरी दिली जात नाही तोवर या रकमेवर रीतसर व्याज देण्याची टाटा मोटर्सने तयारी केली असल्याचे सांगितले जाते. एक लाख रुपयांच्या कारचे स्वप्न दाखविणारी ‘नॅनो’ आता प्रत्यक्षात मूल्यवर्धित कर, वाहतूक खर्च व अन्य अधिभार जमेस धरून १.३४ लाख रुपयांवर जाईल, असाही एक तर्क व्यक्त केला जात आहे.