Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
प्रादेशिक

अर्धांगिनींना बिल्डर बनविणारे म्हाडा अभियंते निलंबित!
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी
भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये नोकरी करता करता बिल्डर होण्याचे स्वप्न अर्धागिनींच्या माध्यमातून पूर्ण करणाऱ्या तिघा अभियंत्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी गौतम चॅटर्जी यांनी आज या आदेशावर सह्या केल्या. आजच किंवा सोमवारी या अभियंत्यांवर निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

सव्वाशे गाडय़ा चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात!
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

उत्तर प्रदेश येथील व्यावसायिक अस्लम खान याची निवडणुकीपूर्वी हत्या करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी घेणाऱ्या सानेअली जमालउद्दीन खान ऊर्फ गुड्डू (२५) याला डी. एन. नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप सूर्यवंशी यांच्या पथकाने अटक केली. मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातून सुमारे सव्वाशे गाडय़ा चोरणाऱ्या टोळीचाही गुड्डू म्होरक्या असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईसाठी हायकोर्टात अर्ज
मुंबई, २० मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने ठाण्याच्या लोकमान्य नगरातील पाडा क्र. एक येथे बांधलेल्या पाचमजली अनधिकृत इमारतीवर महापालिकेने सुरु केलेली कारवाई त्या पक्षाचे विधान परिषदेतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हस्तक्षेप करून बंद पाडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन आ. आव्हाड यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) कारवाई केली जावी यासाठी एक अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयात केला गेला.

‘नॅनो’चे सोमवारी आगमन; प्रत्यक्षात गाडीसाठी प्रतीक्षा मात्र दीड वर्षांची!
मुंबई, २१ मार्च/व्यापार प्रतिनिधी

टाटा उद्योगसमूहाची कंपनी टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘नॅनो’ मोटार अखेर सोमवारी विधिवत बाजारात दाखल होईल. जगातील सर्वात स्वस्त म्हणून लौकिक पावलेली ही कार प्रत्यक्षात चालू वर्षांच्या सप्टेंबरनंतर रस्त्यावर धावताना दिसेल. तर सर्वसामान्यांनी एप्रिलमध्ये केलेल्या बुकिंगनंतर प्रत्यक्षात कार मिळविण्याची प्रतीक्षा दीड वर्षांपर्यंतही लांबू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. वर्षभरापूर्वी नवी दिल्लीच्या ‘ऑटो शो’मध्ये नॅनोवरील पडदा पहिल्यांदा दूर सारण्यात आला तेव्हापासून आजतागायत गेल्या १५ महिन्यांत या छोटेखानी कारला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली आहे. ‘नॅनो’चे सुबक रूपडे गेल्या ऑटो शोमध्ये खासच लक्षवेधी व उत्सुकता निर्माण करणारे ठरले होते. अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेले ६२४ सीसी व ३३ हॉर्सपॉवरचे पेट्रोल इंजिन असलेली टाटा नॅनो म्हणजे सामान्य मध्यमवर्गीयांच्या मोटार बाळगण्याच्या स्वप्नांना मूर्तरूप देणारा चमत्कारच होता. म्हणून नॅनोला ‘जनतेची कार’ असेही गौरवाने म्हटले जाऊ लागले. पण या कारची किंमत आणि प्रतीक्षा ही मूळ आश्वासनापेक्षा जास्तच असेल, असा तर्क आता व्यक्त केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवडी येथे झालेल्या मेळाव्यात काल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले त्याची मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून संबंधित अधिकारी त्याची तपासणी करीत आहेत. दरम्यान, परळ परिसरात पक्षीय झेंडे लावून परिसराचे विद्रुपीकरण केल्यावरून शिवसेना नगरसेवक प्रकाश चाळके यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणांत काही आक्षेपार्ह आढळले तर आम्ही निश्चितपणे कारवाई करू, असे जिल्हाधिकारी आय. कुंदर यांनी म्हटल्याचे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे. प्रचलित पद्धतीनुसार आम्ही सर्व मेळाव्यांचे चित्रीकरण करून तपासणी करणार आहोत. कालच्या सभेत आचारसंहितेचा भंग झाला का, याची तपासणी सुरू आहे, असेही कुंदर यांनी सांगितले. पुणे येथील सभेतही उद्धव यांनी पंतप्रधानांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र पक्षाची ती ‘स्टाइल’ असल्याचे म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला : सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

मुंबईवर २६/११ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी सरकारी पक्षाने एका अर्जान्वये विशेष सत्र न्यायालयाकडे केली आहे. ऑर्थर रोड कारागृहातील न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार असून तेथील सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. या अर्जावर विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी २३ मार्च रोजी आपला आदेश देतील अशी अपेक्षा आहे. दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊ शकते आणि मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब हा त्यामध्ये ऑर्थर रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊ शकतो, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे. ऑर्थर रोड कारागृहातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करावे लागणारे बांधकाम १२ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी गुन्हा अन्वेषण विभागाला पत्र पाठविले आहे.

लोकलमधील स्फोट : तपासाची माहिती प्रसिद्ध करण्यास मनाई
मुंबई, २१ मार्च / प्रतिनिधी

मुंबईतील उपनगरी गाडय़ांमध्ये ७/११ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासाबाबतचे कोणतेही वृत्त प्रसिद्ध करण्यास अथवा प्रक्षेपित करण्यास विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिबंध केला आहे. त्याबाबतचा आदेश विशेष ‘मोक्का’ न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांनी आज दिला. प्रसिद्धीमाध्यमांवर या तपासाबाबतचे वृत्त देण्यास बंदी घालावी, अशा आशयाचा विनंती अर्ज दहशतवादविरोधी पथकाने केल्यानंतर आज हे आदेश देण्यात आले. या खटल्याचे गांभीर्य आणि सार्वजनिक हितासाठी ‘यूएपीए’ कायद्यान्वये हे आदेश देण्यात आले आहेत.