Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

खोटी उपस्थिती दाखवून १ लाख १० हजारांचा गैरव्यवहार
नवलेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाईचा प्रस्ताव
शालेय पोषण आहार योजना

नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतून शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाच या योजनेच्या गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. रोज किमान ३०० मुलांची खोटी उपस्थिती नोंदवून जून ते नोव्हेंबर २००८ या सहा महिन्यांत तांदूळ व इंधनाच्या रकमेतील सुमारे १ लाख १० हजारांचा गैरव्यवहार निष्पन्न झाला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी शाळेत हा प्रकार घडला.

रंग झ्र् २
रंगाचा विषय निघाला
की मला आठवण येते
मुंबईतल्या आर. के. स्टुडिओची
आणि राज कपूर यांची..
कॉलेजमध्ये शिकत असताना
पार्टटाईम करत असलेलं
सहायक कला दिग्दर्शकाचं
काम करतानाचा एक प्रसंग
‘राम तेरी गंगा मैली’
या चित्रपटासाठी
प्रशस्त हवेलीच्या सेटचं काम
काही महत्त्वाच्या सूचना देऊन
आमचे बॉस
दुसऱ्या सेटवर गेले होते

‘कायद्याची उपयुक्तता वकिलांनी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावी’
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

वकील हे खऱ्या अर्थाने कायद्याचे रक्षक असून, त्यांनी कायद्याचे महत्त्व आणि उपयुक्तता समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती बी. बी. वग्यानी यांनी केले. येथील न्यू लॉ महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि जिल्हा विधी साहाय्य केंद्राच्या वतीने आयोजित ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष प्राचार्य विलासराव आठरे होते.

वसुलीसाठी वीज तोडण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची कोंडी
शेवगाव, २१ मार्च/वार्ताहर

थकबाकी वसुलीसाठी अनेक गावांची वीज खंडित करण्याचे धोरण वीज कंपनीने घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वीकारलेल्या या धोरणामुळे जनतेत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. यंदा शेती उत्पन्नाच्या बाबतीत शेतकरी पूर्णपणे तोटय़ात आहे.

सुवर्णसिंहासन चित्रांची शिर्डीत वानवा!
राहाता, २१ मार्च/वार्ताहर

साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी देश-विदेशात साई संमेलने भरविणाऱ्या साई संस्थानमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचाराचे मुख्य साधन असलेल्या सुवर्णसिंहासनाची छायाचित्रे विक्रीस उपलब्ध नाहीत, तसेच साईबाबांची मूळ छायाचित्रे उपलब्ध असताना बाबांच्या काल्पनिक किंवा दुसऱ्याच छायाचित्रांची सर्रास विक्री सुरू आहे. त्यात संस्थानही आघाडीवर आहे! देशविदेशातील भक्तांच्या हृदयसिंहासनावर विराजमान साईबाबांना सुवर्णसिंहासनावर आरूढ करण्याची साईभक्तांची व संस्थानची मनीषा होती.

जिल्ह्य़ात साडेतीन हजार व्यक्तींकडे बंदूक, पिस्तूल
आतापर्यंत केवळ २४२ शस्त्रे सरकारजमा
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील साडेतीन हजार लोकांकडे स्वसंरक्षणासाठी परवानाधारक बंदूक व पिस्तूल आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही शस्त्रे जमा करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत २४२ शस्त्रे जमा झाली आहेत. परवानाधारक शस्त्रे लवकरात लवकर म्हणजे २८ मार्चपूर्वी पोलिसांकडे जमा करावीत, असा आदेश प्रशासनाने दिला आहे. शस्त्र जमा करण्याबरोबरच जिल्ह्य़ातील समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत २३७जणांवर कारवाई झाली आहे. जिल्ह्य़ात एकूण ३ हजार ४९४ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यात २ हजार ९९८ बंदूकधारक, तर ४९६ पिस्तूलधारक आहेत. बंदुकीसाठी प्रांताधिकारी परवाना देतात, तर पिस्तूल परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी शस्त्र परवान्याची मागणी वाढली आहे. विभागनिहाय बंदूक परवाने याप्रमाणे - नगर - १ हजार २२, श्रीरामपूर - ९६४, संगमनेर - २९०, कर्जत - ७२२. संवेदनशील मतदानकेंद्रांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. या वर्षी निवडणूक आयोगाने संवेदनशील मतदानकेंद्र ठरविण्याचे नवीन निकष तयार केले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

भाजलेल्या पती-पत्नीचा उपचार सुरू असताना मृत्यू
राहाता, २१ मार्च/वार्ताहर

स्टोव्हचा भडका होऊन पेटलेल्या पत्नीला वाचविताना पतीही भाजला. त्या दोघांनाही उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचार चालू असताना पती-पत्नीचे निधन झाले. ही घटना तालुक्यातील सावळीविहीर येथे मंगळवारी सायंकाळी घडली. गोरख माधव विटेकर (वय ३८) व वैशाली गोरख विटेकर (वय ३०, राहणार सावळीविहीर) असे या पती-पत्नीचे नाव आहे. गोरख खासगी वाहन चालविण्याचे काम करतो. मंगळवारी सायंकाळी तो घरी आला. पत्नी वैशाली हिस त्याने जेवण बनविण्याचे सांगितले. वैशालीने स्टोव्ह पेटविला असता त्याचा भडका उडाल्याने तिच्या साडीने पेट घेतला. तिचा ओरडण्याचा आवाज आल्याने गोरख आग विझवताना भाजून गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्या दोघांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना वैशालीचे शुक्रवारी सकाळी, तर पती गोरखचा आज सकाळी मृत्यू झाला. तशा प्रकारचा मृत्यूपूर्व जबाब या मयत पती-पत्नीने पोलिसांना दिला आहे. लोणी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

‘श्रीगोंदे’कडून शिलकी अडीच कोटी बँकेत वर्ग
श्रीगोंदे, २१ मार्च/वार्ताहर

श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामात जाहीर केलेल्या १२०० रुपये भावातील शिल्लक शंभर रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने त्यापोटी अडीच कोटी रुपये बँकेत वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले यांनी दिली. ‘श्रीगोंदे’ने संपलेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन १ हजार २०० रुपये पहिला हप्त्यापोटी देण्याचा निर्णय घेतला होता. पैकी शेतकऱ्यांना १ हजार १०० रुपये तातडीने दिले. सध्या मार्चअखेरीमुळे बँका, महावितरण, विमा कंपनी यांची जोरदार वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना ‘श्रीगोंदे’ने दिलेल्या प्रतिटन शंभर रुपये फरकाने चांगलाच हातभार लागणार आहे. कारण सध्या ‘महावितरण’ने कृषिपंप थकबाकीपोटी रोहित्र सोडले आहेत. ही बिले जमा करण्यासाठी या रकमेचा उपयोग नक्की होईल.

पिंपळगाव उज्जनी येथील गावठी दारूअड्डयावर छापा
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जनी येथील गावठी दारूअड्डय़ावर छापा घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ हजार ४०० रुपयांचे दारूचे कच्चे रसायन जप्त केले. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वसंत रखमाजी आल्हाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गावाबाहेर अढय़ाच्या काठी हा दारूअड्डा सुरू होता. पोलिसांनी छापा घालण्यापूर्वीच आल्हाट पसार झाला. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रेय परदेशी, गोविंद आधटराव, पोलीस हवालदार गायकवाड, दीपक हराळ, गणेश धुमाळ, जाकीर कुरेशी यांनी ही कारवाई केली.

लोकसभा अर्जमाघारीपर्यंत भूमिका स्पष्ट करू झ्र् काळे
कोपरगाव, २१ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आमदार अशोक काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गेली ३५ वर्षे तालुक्याचे प्रश्न सुटले नाही. ते सोडविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. पुलांचे प्रश्न मार्गी लावले. उर्वरित प्रलंबित प्रश्नांसाठी तालुक्याचे पुन्हा आमदार होणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
येत्या लोकसभेच्या वेळी कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार, या संदर्भात विचारले असता श्री. काळे यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही हे त्यांनी वारंवार व जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार किंवा शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जनमत अजमावून आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे श्री. काळे यांनी स्पष्ट केले.

वाहनाची धडक बसून होलेवाडीत हरणाचा मृत्यू
श्रीगोंदे, २१ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील होलेवाडी येथे श्रीगोंदे-काष्टी रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसून हरणाचा मृत्यू झाला. हरणाला वाचविण्याचा पशुवैद्यक दिगंबर शिंदे यांनी प्रयत्न केला. वनमंत्री बबनराव पाचपुते यांनीही पुढील उपचारासाठी स्वतची गाडी पाठविली. मात्र, उपयोग झाला नाही. वाटेतच हरणाचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. वेगात रस्ता ओलांडणारे हरीण वाहनाला धडकले. त्यात हरीण जागेवर कोसळले. गावकऱ्यांनी जखमी हरणाला पाणी पाजले. पशुवैद्यक शिंदे यांनी त्यावर उपचार केले. तोपर्यंत लोकांनी वनमंत्री पाचपुते यांना कल्पना दिली. त्यांनी वन अधिकाऱ्यांना पाठविण्याची व्यवस्था केली. मात्र, अधिकाऱ्यांना उशीर झाल्याने लोकांच्या आग्रहावरून पाचपुते यांनी स्वतची गाडी पाठविली व पुढील उपचारासाठी हरणाला नेण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर होऊन हरणाचा मृत्यू झाला.

र्मचट्स असोसिएशनचे बोकडिया अध्यक्ष, उपाध्यक्षपदी झंवर
श्रीरामपूर, २१ मार्च/प्रतिनिधी

र्मचट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश बोकडिया, उपाध्यक्षपदी पुरूषोत्तम झंवर, तर सचिवपदी पुरूषोत्तम मुळे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपाध्यक्ष बिपीन चुडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. त्यात हे पदाधिकारी निवडण्यात आले. नियुक्तीची सूचना संचालक सुधीर डंबीर यांनी केली. संजय कोठारी यांनी अनुमोदन दिले. निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले अनिल कांबळे, संचालक रमण गुजराणी, संजय कोठारी व उपाध्यक्षपदासाठी मोहनलाल कुकरेजा यांनी अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक रमेश कोठारी यांच्या निर्देशानुसार डंबीर यांनी अध्यक्षपदासाठी बोकडिया, उपाध्यक्ष झंवर, सचिव मुळे व सहसचिवपदी राजेंद्र कोठारी यांची नावे सुचविली. त्यास सर्वानी अनुमोदन दिले. अनिल कांबळे, कोठारी यांची भाषणे झाली.

पेहचान-२००९ शिबिर
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नगरमधील सृजन संस्थेतर्फे २३ ते २७ मार्चदरम्यान पेहचान २००९ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ बालभवन (सहकारनगर, सपकाळ हॉस्पिटलजवळ, सावेडी) येथे होणाऱ्या या शिबिरात मानसिक विकास, सामाजिक दृष्टिकोन निर्मितीसाठी सामूहिक कार्यपद्धती, स्व-ओळख याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पद्मजा गोखले व माधुरी यादवाडकर यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

अनधिकृत माती, वाळूवाहतूक;
भीमापात्रात ५ गाडय़ा पकडल्या
श्रीगोंदे, २१ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील अनगरे येथे भीमा नदीपात्रात अनधिकृत माती, तसेच वाळूउपसा करणाऱ्या ५ मालमोटारी प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी पकडल्या. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या आदेशावरून ही कारवाई झाली. वीटभट्टीसाठी लागणारी माती वाहतूक करणाऱ्या ४ मालमोटारी व वाळूची गाडी पकडण्यात आली. या भागातून वाळू व मातीची मोठी तस्करी होते. मात्र, तेथे दहशतीचे वातावरण असल्याने महसूल यंत्रणा कारवाईऐवजी संगनमत करण्यात धन्यता मानते. या पाश्र्वभूमीवर आज दुपारी प्रांताधिकारी गायकवाड यांनी मालमोटारी पकडल्या. यातील एक मालमोटार रात्री निमगाव खलूजवळील रेल्वे रुळावर अडकून पडली होती. रेल्वे पोलिसांनी त्या गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचीही माहिती समजली. दरम्यान, गायकवाड यांनी पकडलेल्या गाडय़ांवर काय कारवाई केली ते समजले नाही.

आचारसंहिता भंगप्रकरणी जिल्ह्य़ातील पहिला गुन्हा
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्य़ातील पहिला गुन्हा एमआयडीसी ठाण्यात शुक्रवारी दाखल झाला. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे हा प्रकार घडला.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शिंगवे नाईक गावात सार्वजनिक ठिकाणी समता परिषदेने परिषदेचा फलक तसाच ठेवला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद ग्रामसेवक संजय भिंगारदिवे यांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी परिषदेचे अध्यक्ष अमोल चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तेली समाजाच्या तंटामुक्ती समितीचे साळुंके अध्यक्ष
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

तेली समाजातील वाद मिटविण्यासाठी जिल्हास्तरावर तंटामुक्त समिती स्थापन करून अध्यक्षपदी बाबूराव साळुंके (साकुरी) यांची नियुक्ती करण्यात आली. तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी ही घोषणा केली. तंटामुक्त समिती जिल्हा न्यायमंच समिती असून, समितीत जिल्ह्य़ातील ३१जणांचा समावेश केला आहे. आता तालुका स्तरावरही तंटामुक्त समित्या स्थापन करून समाजातील तंटे मिटविण्यात येतील, असे श्री. डोळसे यांनी सांगितले. जिल्हा कार्यकारिणी अशी - कार्याध्यक्ष बबनराव भांडकर, उपाध्यक्ष जगन्नाथ लुटे, सचिव डॉ. प्रा. सुधाकर चौधरी, पंच - आसाराम शेजूळ, अशोक साळुंके, विष्णुपंत देहाडराय, विठ्ठल गाडेकर, मारोती भोत, प्रा. माधव कर्डिले, प्रभाकर नागले, शिवनारायण इंगळे, गोरख राऊत, वसंत टेकाळे, पंडित पवार, ईश्वराप्पा कोटकर, मुरलीधर घोडके, विठ्ठल भोज, गंगाधर भागवत, कोंडीभाऊ पतके, लक्ष्मण डोळसे, रमेश शेलार, वसंत क्षीरसागर, चंद्रकांत ससाणे, महारूद्र सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोखंडे, कायदेशीर सल्लागार - सुनील भागवत, तात्या डोळसे, अशोक काळे, मीनानाथ देहाडराय, राजेंद्र सूर्यवंशी.

शिवगर्जना डॉटकॉमचे गुढीपाडव्याला उद्घाटन
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या ‘शिवगर्जना डॉटकॉम’ या वेबसाईटचे उद्घाटन येत्या दि. २७ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्येष्ठ प्रवचनकार बद्रिनाथमहाराज तनपुरे यांच्या हस्ते राहुरी येथील खळवाडी नंबर २ येथे होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत.
शाहिरीचा परिचय करून देणारी ‘शिवगर्जना’ ही महाराष्ट्रातील अशा प्रकारची पहिलीच वेबसाईट आहे. संपूर्ण मराठीत असलेल्या या वेबसाईटवर विविध पोवाडे, तसेच शाहीर तनपुरे यांची माहिती, छायाचित्रे असतील. जगभरातील कोणालाही ही माहिती काही क्षणात उपलब्ध होऊ शकेल.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवगर्जना कलामंचचे रामकिसन परदेशी व इतरांनी केले आहे.

टंकलेखन, लघुलेखन संस्थाचालकांची कार्यशाळा
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील टंकलेखन, लघुलेखन संस्थाचालकांसाठी आयोजित कार्यशाळा नुकतीच हॉटेल यश पॅलेस येथे पार पडली. कार्यशाळेत सुमारे १५० टंकलेखन व लघुलेखन संस्थाचालक उपस्थित होते. कार्यशाळेस सहायक शिक्षण उपनिरीक्षक जी. एन. कांबळे, महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटस् असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कराळे, प्राचार्य आर. जी. गवळी, प्राचार्य मुसळे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत जिल्हा सांकेतांक, कोड, परीक्षा कोड, आवेदन फॉर्मच्या बदलांसह नवीन आवेदन फॉर्म भरण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यापुढे टंकलेखन, लघुलेखन परीक्षेचा कालावधी चार दिवसांचा असेल, तसेच जी. सी. सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ८० ते १२० दिवस हजेरी असणे अनिवार्य केल्याचे प्रकाश कराळे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनुराधा थिटे यांनी केले. आभार सुरेश जगदाळे यांनी मानले.

‘चूक सुधारण्याची संधी बालकांना मिळायला हवी’
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

बालकांना संधी मिळाल्यास ते चुका सुधारून चांगले नागरीक बनू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. बी. पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघटना व जिल्हा न्यायालयातर्फे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी रिमांड होममध्ये लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
बालकांच्या हातून नकळत चुका होतात. गुन्हा घडल्यानंतर त्यांना एकदा माफ केले पाहिजे म्हणजे सुधारण्याची संधी मिळेल, असे न्यायाधीश पाटील म्हणाले. बालगुन्हेगारी खटले चालविणाऱ्या न्यायालयाचे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. वकील संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश दिवाणे, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, सरकारी वकील सुरेश लगड आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विभावरी नगरकर यांनी केले. या वेळी एम. बी. सय्यद, आर. जे. दाणी उपस्थित होते.

निवडणुकीतील भूमिकेबाबत मराठा महासंघाची उद्या बैठक
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबाबत झालेली आंदोलने व लोकसभा निवडणुकीत घ्यायची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक दि. २३ला मुंबईत होणार असल्याची माहिती महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी दिली. महासंघाची विभागीय बैठक येथे झाली. बैठकीचा अहवाल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांना सादर केला जाणार आहे. बैठकीस नाशिक, औरंगाबाद, बीड व नगरचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे एस. एस. नवले, संतोष ननावटे, शशिकांत पिसाळ, गणेश नाईकवाडी, दत्ता गायकवाड, डिंबा निकम आदींनी चर्चेत भाग घेतला.

नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत संजय लोळगे यांना सुवर्ण
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

येथील रंगसाधना अकादमीचे अध्यक्ष संजय लोळगे यांना ४८व्या मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयासाठी सुवर्णपदक मिळाले. मुंबईतील शिवाजी नाटय़मंदिरात ४८व्या मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ‘एप्रिल फूल बनाया’ या दोन अंकी मराठी नाटकातील उत्तम अभिनयासाठी लोळगे यांना सुवर्णपदक देण्यात आले. या यशाबद्दल लोळगे यांचे सिनेअभिनेते मोहन जोशी, प्रदीप कबरे, नाटय़ परिषदेचे शाखाध्यक्ष सतीश लोटके, नगर हौशी नाटय़संघाचे अध्यक्ष बलभीम पठारे, संजय घुगे, मोहिनीराज गटणे आदींनी अभिनंदन केले.

‘मराठा ओबीसीकरण’ पुस्तकाचे आज प्रकाशन
नगर, २१ मार्च/प्रतिनिधी

कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रा. अशोक बुद्धिवंतलिखित ‘मराठा ओबीसीकरण’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (रविवारी) सकाळी ११ वाजता येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगावचे माजी आमदार पांडुरंग अभंग असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रा. हरी नरके, पत्रकार उत्तम कांबळे, औरंगाबाद येथील वकील सगर किल्लारीकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे आनंद परूळेकर व बाबा साटम यांनी केले आहे.