Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९बोरखार गाव खाडी पुलाचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत!
मधुकर ठाकूर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही उरण तालुक्यातील बोरखार गाव अद्याप दुर्लक्षितच राहिले आहे. खाडीकिनारी वसलेल्या या गावासाठी खाडीवर शंभर मीटर अंतराचा पूल बांधण्याचेही विविध राजकीय पक्षाच्या सरकारला अद्याप जमले नसल्याने ऊन-पावसात शेकडो गावकऱ्यांना छोटय़ा होडीतून धोकादायक जीवघेणा प्रवास करावा लागतो. उरण तालुक्यातील विशेषत: पूर्व ग्रामीण भागातील अनेक गावांकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. आदिवासी पाडे असोत वा नागरी वस्तीतील गावे असोत, समस्या नाहीत असे एकही गाव नाही. मात्र त्यातही अत्यंत दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणून बोरखार गावाकडे पाहिले जाते. उरण शहरापासून खाडीमार्गे होडीने गेल्यास साधारण आठ किमी अंतरावर बोरखार गाव आहे.

तेल गेले, तूपही गेले..
अनिरुद्ध भातखंडे

‘सर्वात मोठय़ा लोकशाहीचा देश’ असे आपल्या देशाचे वर्णन केले जाते. पण या लोकशाहीला पक्षीय राजकारण, व्यक्तिकेंद्रित निर्णय, गुन्हेगारी वृत्तीचे व प्रत्यक्ष गुन्हेगार असणारे राजकारणी यांनी ग्रासून टाकले आहे. विधिनिषेधशून्य व संधिसाधू राजकारणामुळे लोकशाहीचे पावित्र्य दिवसेंदिवस नष्ट होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आणखी तीव्रतेने याचा प्रत्यय येणार आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्याशी समान अंतर ठेवण्यासाठी निर्माण झालेली तिसरी आघाडी हे याचे ताजे उदाहरण. या तिसऱ्या आघाडीचा निवडणुकीत कितपत प्रभाव पडेल आणि निवडणुकीनंतरच्या घोडेबाजारात तिला किती महत्त्व असेल हे आता कोणीच सांगू शकणार नाही, परंतु रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपच्या तंबूत मात्र या आघाडीच्या स्थापनेमुळे घबराट झाली आहे.

एका सुवर्णमहोत्सवी सहजीवनाची कृतार्थ कहाणी..
मीना गोडखिंडी

आपल्या सुंदर प्रेमबंधनाचे, भावबंधनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष कुटुंबापुरतेच आणि मित्रमैत्रिणींपुरतेच मर्यादित न राखता, आपल्या विवाहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करून डोंबिवलीच्या शरयू कुलकर्णी व त्यांचे पती विष्णू कुलकर्णी या दांपत्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे आणि याच आदर्शाची डोळस पूजा खास वाचकांसाठी! शरयूताई व विष्णू कुलकर्णी यांच्या विवाहाला ११ मे २००८ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आणि मुलांनी, सुनांनी व नातवंडांनी आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचे ठरविले. त्याची कुणकुण शरयूताईंना लागली. त्यांनी मुलांना समजावून सांगितले, ‘आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने, समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी आहे आणि हा वाढदिवस आम्ही कमीत कमी सहा महिने तरी साजरा करणार आहोत! तेही घरगुती पद्धतीने व आमच्या खर्चानेच!’ दर शनिवार-रविवार एक मेहूण याप्रमाणे सहा-सात महिन्यात ५१ मेहुणांना जेवायला बोलवायाचे, त्यांच्या आवडीनुसार जेवण व पक्वान तयार करायचे. मग त्यांनी मेहुणांची यादी तयार केली. त्या यादीत जातपात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव नव्हता, तर त्या यादीत भाजीवाली, मोलकरीण, गजरेवाली, मतिमंद, अपंग, आदिवासी आणि श्रमजीवी मेहुणांचाच समावेश होता. कारण आर्थिक अडचण काय व कशी असू शकते, याची पूर्णपणे जाणीव व अनुभव या दांपत्याजवळ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शरयूताईंनी अविरत कष्ट केलेले आहेत. १९६७ ते १९९२ पर्यंत तब्बल २५ वर्षे ३० जणांचे जेवणाचे डबे तयार करून व रात्री १५ जणांची जेवणाची सोय करून त्यांनी संसाराला आर्थिक हातभार लावून तीन मुलांची इंजिनीयपर्यंतची शिक्षणे पूर्ण केली आहेत. रोज जवळजवळ ३०० ते ३५० पोळ्या त्या करत असत. पहाटे चारला त्यांचा दिवस सुरू व्हायचा व मध्यरात्री बाराला मावळायचा. अविरत कष्ट हीच त्यांची जीवनशैली बनली. १९९२ ला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यावर, मुलांचे शिक्षण, संसार मार्गी लागल्यावर त्यांनी जेवणाचे डबे बंद केले. विष्णू कुलकर्णींची कंपनी बंद पडली म्हणून शरयूताई खचून गेल्या नाहीत. कष्ट करण्याची तयारी असेल तर यश पदरी पडतेच, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. १९९५ ते १९९७ दोन वर्षे त्यांनी कोठिंबे येथील आश्रमाला दिली आहेत. त्या आश्रमातील ३५ आदिवासी मुलांची जबाबदारी या दांपत्याने घेतली आहे. शरयूताई रोज पाच-सहा मैल चालत जाऊन आदिवासी पाडय़ातील मुलांना शाळेत घेऊन येत असत. त्यांना स्वच्छतेचे धडे देत असत. आदिवासी महिलांना कुटुंबनियोजनाची व आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगत असत. दोन वर्षे त्यांनी आदिवासी पाडय़ात काम केले. असे हे सेवाभावी दांपत्य आपल्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव उत्सवी स्वरूपात साजरा करणे शक्यच नव्हते. सुवर्णमहोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ५१ मेहुणांना जेवायला बोलावयाचे या मागचा उद्देश एकच होता, तो म्हणजे प्रत्येक मेहुणाला त्यांच्या आवडीप्रमाणे आयते जेवण मिळावे, त्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात, त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू देऊन खारीचा वाटा उचलावा. या पद्धतीने परस्परांमध्ये स्नेहबंध निर्माण करून ५१ कुटुंबे जोडली जावीत आणि पहिलेच मेहूण त्यांनी गौराबाई जाधव यांचे बोलावले. या गौराबाई भाजी विकून संसार चालवितात. २५ वर्षे त्या भाजी विकत आहेत. व्यसनी नवऱ्याच्या बायकोच्या नशिबी जे भोग येतात, तेच सारे भोग या भाजीवालीच्या वाटेला आलेले आहेत. पण या परिस्थितीवर मात करून या भाजीवालीने मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभे केले आहे. याची जाणीव शरयूताईंनी गौराबाईच्या नवऱ्याला करून दिली. पुरणपोळीचे जेवण या मेहुणाला देऊन गौराबाईची साडीचोळी देऊन ओटी भरली व स्वावलंबी स्त्री-जीवनाचा गौरव केला. दुसऱ्या आठवडय़ात त्यांनी मनीषा व प्रभात या फुलवाल्या दांपत्यांना बोलावले. हे सुखी समाजाचे कष्टकरी दांपत्य डोंबिवलीच्या आयडीबीआय बँकेच्या समोर बसून हार, गजरे, वेण्या, बुके तयार करून पोटाची खळगी भरत आहे. या दांपत्याला जिलबीचे जेवण देऊन मनीषाची ओटी भरून, प्रभातला बुके बनविण्याचे साहित्य भेट देऊन त्यांच्या कष्टाला शरयूताईंनी वंदन केले. तिसऱ्या आठवडय़ात स्वत:च्या घरी मोलकरीण कामाला नसल्यामुळे शेजारच्या मोलकरीण दांपत्याला त्यांनी मेहूण म्हणून जेवायला बोलावले. शेवंता ही मोलकरीण गेली २० वर्षे धुण्याभांडय़ाची, केर-लादीची कामे करून संसाराला हातभार लावत आहे. तिचा नवरा यशवंता हा अपंग असल्यामुळे संसाराचा गाडा हाकणे अवघड गोष्ट आहे. या दांपत्याला श्रीखंडपुरीचे सुग्रास जेवण देऊन शेवंताच्या मुलांना शाळेचे गणवेश भेट म्हणून देऊन या दांपत्याचा आशीर्वाद शरयूताईंनी घेतला. चौथे मेहूण त्यांनी मतिमंद मुलीच्या आईबाबांचे घातले. मतिमंद मुलीच्या अगतिक आईबाबांच्या पाठीवर त्यांनी आधाराचा, विश्वासाचा हात फिरविला त्यावेळी डबडबत्या डोळ्यांनी त्या मुलीची आई म्हणाली, ‘माझी मुलगी मतिमंद आहे, बाहेर गेल्यावर ती त्रास देते म्हणून कोणीच आम्हाला जेवायला बोलावत नाही.’ त्या दिवशी शरयूताईंनी उकडीचे मोदक केले होते व त्या मतिमंद मुलीसाठी खास तिला आवडतात म्हणून पोह्याचे पापड आठवणीने तळले होते. त्या २२ वर्षांंच्या मतिमंद मुलीला त्यांनी खास भेट दिली आणि त्या दांपत्याला एक आनंदाचा क्षण दिला. पाचवे दांपत्य त्यांनी कॅटरिंग व्यवसायातील कर्मचाऱ्यांचे बोलावले. खास या दांपत्याच्या आवडीची सांज्याची पोळी बनविली. त्यांच्या बायकोला साडी दिली व मुलांना शालोपयोगी साहित्य दिले. त्यावर त्याची तीन वर्षांची मुलगी म्हणाली, ‘माझ्या पेन्सिली व वह्या संपल्यावर परत मला वह्या द्याल का?’ त्यावर विष्णू कुलकर्णी यांनी आनंदाने होकार दिला व तू खूप खूप शिक, असा आशीर्वाद दिला. या पद्धतीनेच आदिवासी मेहूण त्यांनी जेवायला बोलाविले होते. बिचाऱ्यांना फक्त जाडय़ाभरडय़ा तांदळाचा भात, शक्य असेल तेव्हा नाचणीची भाकरी हेच जेवण ठाऊक होते. कोठिंब्याला आदिवासी पाडय़ात काम केल्यामुळे कुलकर्णी दांपत्याला आदिवासी जीवनशैलीची जवळून माहिती होतीच, पण त्या दिवशीच जेवणाचा थाट काही औरच होता. गुळपोळी, वांग्याचे चमचमीत भरीत, मिरचीचा ठेचा, मसाले भात असे साग्रसंगीत जेवण पाहून आदिवासी जोडप्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. असे जेवण कशा पद्धतीने जेवायचे असते, हेच बिचाऱ्यांना ठाऊक नव्हते. पण शरयूताईंनी त्यांना समजावून सांगितले व आग्रह करकरून जेवायला वाढले. त्या आदिवासी महिलेची ओटी भरताना शरयूताईंनाच गहिवरून आले. अशा पद्धतीने शरयूताईंनी लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रुखी समाज, भाजीवाली, मोलकरीण, फुलवाली, अपंग इ. दांपत्यासहित काही विविध क्षेत्रांतील दांपत्यांनाही जेवायला बोलावले होते. या पद्धतीने ५१ वे मेहूण २६ जानेवारी रोजी पूर्ण झाली आहेत. बसायला रंगीत पाट, केळीचे पान, रांगोळीचा थाट, उदबत्तीचा सुगंध, सनईची सुरावट, पक्वानासहित गरमागरम सुग्रास भोजन व जोडीला कुलकर्णी दांपत्याचे प्रेमळ अगत्य पाहून सारीच जोडपी भारावली. एकावेळी एकच मेहूण, यामुळे प्रत्येकाशी आपुलकीने सुसंवाद त्यांना साधता आला! याची दखल अनेकांनी घेतली. जागतिक वृद्ध दिनानिमित्त कुलकर्णी दांपत्याचा या आदर्श संकल्पनेबद्दल सत्कार करण्यात आला. सर्व स्तरांवरील समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कुलकर्णी दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे!