Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बोरखार गाव खाडी पुलाचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत!
मधुकर ठाकूर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही उरण तालुक्यातील बोरखार गाव अद्याप दुर्लक्षितच राहिले आहे. खाडीकिनारी वसलेल्या या गावासाठी खाडीवर शंभर मीटर अंतराचा पूल बांधण्याचेही विविध राजकीय पक्षाच्या सरकारला अद्याप जमले नसल्याने ऊन-पावसात शेकडो गावकऱ्यांना छोटय़ा होडीतून धोकादायक

 

जीवघेणा प्रवास करावा लागतो.
उरण तालुक्यातील विशेषत: पूर्व ग्रामीण भागातील अनेक गावांकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. आदिवासी पाडे असोत वा नागरी वस्तीतील गावे असोत, समस्या नाहीत असे एकही गाव नाही. मात्र त्यातही अत्यंत दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणून बोरखार गावाकडे पाहिले जाते. उरण शहरापासून खाडीमार्गे होडीने गेल्यास साधारण आठ किमी अंतरावर बोरखार गाव आहे. विंधणे, नवापाडा, खालचा पाडा, कंठवली, टाकी, धाकटी जुई आणि बोरखार आदी आठ गावांतील लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे. या आठ गावांचा कारभार पाहण्यासाठी विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीपैकी बोरखार एक असून गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजारापर्यंत आहे. अशा या गावकऱ्यांसाठी रहदारीचा मार्गही नऊ वर्षांंपूर्वी तयार करण्यात आला आहे. मात्र त्याआधी रस्ताच नसल्याने बाजारासाठी व शासकीय कामांसाठी उरण तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. मात्र यासाठी स्वातंत्र्यापासून बोरखार खाडी पार करावी लागते. त्यासाठी जिल्हा परिषदेने ये-जा करण्यासाठी छोटय़ा होडीची व्यवस्था केली आहे. ऊन, पाऊस व इतर बदलत्या हवामानातही या खाडीमार्गावरून गावकऱ्यांचा धोकादायक व जीवघेणा प्रवास अद्याप सुरूच आहे. बोरखार गाव व उरण- धुतुम रस्ता यामधील खाडीवरील अंतर अवघ्या शंभर मीटरचे. मात्र शंभर मीटर खाडीतील हा प्रवासही बोरखारवासीयांना जीवघेणा ठरू लागला आहे.
तसे पाहिले तर या गावापर्यंत पहिली एसटी बस पोहोचली तीही नऊ वर्षांंपूर्वी. कारण गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने वाहने जाण्याचीही फारशी सोय नाही. गावकऱ्यांना विंधणे गावापासून बरीच पायपीट करावी लागते. हा पर्याय गावकऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याने खाडीमार्गे होडीतून प्रवास करण्याची पाळी येते. खरं तर उरण ते बोरखार खाडीमार्गे प्रवास फक्त आठ किमी अंतराचा तर उरण ते विंधणे मार्गे बोरखार गावापर्यंतचे अंतर २४ किमी भरते. यामुळे खाडी प्रवासच नागरिकांसाठी सोयीस्कर ठरतो. वेळ, इंधन, खर्चाची बचत करणारा खाडीमार्गावरील प्रवास सुखकर व्हावा, अशी रास्त अपेक्षा गावकऱ्यांची आहे. त्यासाठी या बोरखार खाडीवर शंभर मीटर लांबीचा पूल बांधावा, अशी मागणी स्वातंत्र्यप्राप्तीपासून ग्रामस्थांची आहे.
बोरखार खाडीवर पूल झाल्यास त्याचा फायदा बोरखार गावाबरोबरच विंधणे, नवापाडा, खालचा पाडा, कंठवळी, टाकी, धाकटी जुई आदी आठ गावांतील दहा हजार नागरिकांना होणार आहे. यासाठी त्वरेने बोरखार खाडीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी युद्ध पातळीवर ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या मागणीचा सारासार विचार व गरज लक्षात घेऊन प्रशासनानेही मध्यंतरी बोरखार खाडीवर पूल बांधण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू केल्या होत्या. या खाडीवरील शंभर मीटर लांबीच्या पुलासाठी नऊ कोटींची योजनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केली आहे. १०० मीटर लांबीचा पूल बांधण्याचा नियोजित प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून शासन दफ्तरी धूळ खात पडून आहे. शासनानेच बोरखार खाडी पूल बांधण्याच्या प्रस्तावाला अद्याप तरी मंजुरी दिली नाही. यामुळे बोरखार खाडी पुलाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. बोरखार गावापर्यंत विंधणे गावाकडून रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यांशी जोडलेल्या गावासाठी पूल बांधण्यास शासन राजी होईल की नाही, अशी शंका शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त केली जाते. तसेच या पुलामुळे बोरखारसह दहा गावांतील दहा हजार नागरिकांनाही दळणवळणासाठी मोठा फायदा होऊन त्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे बोरखार खाडीवर पूल आवश्यक असल्याचे मतही काही शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे नऊ कोटीचा खर्च कुणी करावा, याबाबतही मतभिन्नता आहे. कुणी म्हणते सिडकोने खर्च करावा, तर कुणी म्हणते जेएनपीटीने खर्च करावा. मात्र खर्चाची जबाबदारी अद्याप तरी कोणत्याही शासकीय विभागाने स्वीकारली नाही. यामुळे बोरखार खाडी पूल बांधण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यातच एक महिन्यापूर्वी बोरखार गावात येणाऱ्या एसटी गाडय़ा रस्त्यावरील दोन्ही साकव धोकादायक झाल्याने बंद केल्या आहेत. दिवसाकाठी एसटी बसच्या होणाऱ्या दोन फेऱ्याही बंद पडल्याने बोरखारवासीयांना होडीतून जीवघेणा प्रवास करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही.