Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तेल गेले, तूपही गेले..
अनिरुद्ध भातखंडे

‘सर्वात मोठय़ा लोकशाहीचा देश’ असे आपल्या देशाचे वर्णन केले जाते. पण या लोकशाहीला पक्षीय राजकारण, व्यक्तिकेंद्रित निर्णय, गुन्हेगारी वृत्तीचे व प्रत्यक्ष गुन्हेगार असणारे राजकारणी यांनी

 

ग्रासून टाकले आहे. विधिनिषेधशून्य व संधिसाधू राजकारणामुळे लोकशाहीचे पावित्र्य दिवसेंदिवस नष्ट होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आणखी तीव्रतेने याचा प्रत्यय येणार आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्याशी समान अंतर ठेवण्यासाठी निर्माण झालेली तिसरी आघाडी हे याचे ताजे उदाहरण. या तिसऱ्या आघाडीचा निवडणुकीत कितपत प्रभाव पडेल आणि निवडणुकीनंतरच्या घोडेबाजारात तिला किती महत्त्व असेल हे आता कोणीच सांगू शकणार नाही, परंतु रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपच्या तंबूत मात्र या आघाडीच्या स्थापनेमुळे घबराट झाली आहे.
तिसऱ्या आघाडीच्या सर्कसमध्ये डावे पक्ष सहभागी झाल्याने शेतकरी कामगार पक्षही त्यात आपसूक सामील झाला आहे आणि त्यामुळे रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार नाइलाजाने का होईना, उभे राहणार आहेत. या मतदारसंघातील राजकीय समीकरणे लक्षात घेता शेकाप उमेदवार उभा करेलही, परंतु या दोन्ही स्थितीत शिवसेना-भाजप युतीला या उमेदवारांचा फटका बसणार हे नक्की. या बदलत्या राजकीय स्थितीमुळेच शेकापच्या नेतृत्वामागे फरफटत जाण्यात धन्यता मानणाऱ्या सेना-भाजपच्या नेत्यांना वास्तव उमगले असेल. एव्हाना उतरली असेल. काँग्रेस हा प्रस्थापितांचा पक्ष आहे, असा आरोप करीत शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव या मंडळींनी १९४८ मध्ये नाशिकजवळ दाभाडी येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. ‘दाभाडी प्रबंध’ या नावाने या पक्षाची घटना लिहिण्यात आली व मार्क्‍सवाद हा पक्षाचा पाया मानण्यात आला. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे शेकापचा मार्क्‍सवाद आणि शिवसेना-भाजपचा (तथाकथित) हिंदुत्ववाद ही परस्परविरोधी तत्त्वे एकत्र येणे अशक्य, मात्र प्रचलित राजकारणाला कशाचेही वावडे नाही, हेच खरे. कोल्हापूर जिल्ह्याखालोखाल रायगड जिल्ह्यात शेकापचा मोठा प्रभाव होता. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शेजारच्या पनवेलमध्ये मात्र शाखा सुरू करणे शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांना खूपच कठीण गेले. भगवा झेंडा उभारला तरी शेकापच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप बसत असे.
कालांतराने परिस्थिती बदलली. शिवसेना येथेही फोफावली आणि शेकापची पीछेहाट होत गेली. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे बालेकिल्ल्यातच पानिपत झाले. पनवेल-उरण मतदारसंघातून विवेक पाटील निवडून आल्याने शेकापची अब्रू वाचली. त्यापूर्वी झालेल्या पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीतही शेकापच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु सेना-भाजपने त्यांच्याशी युती करून त्यांना जणू संजीवनी दिली. एकेकाळी सर्वाधिक सदस्य निवडून आणणारी शिवसेना आज पालिकेत विरोधी बाकांवर बसण्यात व सत्ताधाऱ्यांच्या ठरावांना होकार देण्यात धन्यता मानत आहे. रामशेठ ठाकूर शेकापमधून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शेकापची ताकद कमी झाली व काँग्रेसची वाढली. आधीच खिळखिळ्या झालेल्या शेकापने अस्तित्वाच्या लढाईसाठी शिवसेना-भाजपशी युती केली. ही युती जिल्हा परिषदेपासून पालिकेपर्यंत व्हाया ग्रामपंचायत अशी झाली. यात लाभ अर्थातच शेकापचा झाला. त्यांच्या पक्षात पुन्हा धुगधुगी आली. काँग्रेसविरोधासाठी त्यांना आयते शस्त्र मिळाले.
शेकापशी युती करून सुस्तावलेले सेना-भाजपचे नेते आणखी निष्क्रिय झाले. पक्ष संघटन, पक्षवृद्धी, सभासद नोंदणी यासाठी विशेष परिश्रम ते घेईनासे झाले. राज्यात आणि देशात नागरिकांना न्याय देण्याच्या बाता मारणारे हे पक्ष पनवेलमधील साध्या समस्या सोडवू शकले नाहीत. निकृष्ट रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक समस्या, रिक्षाचालकांची मनमानी या समस्यांविरोधात त्यांनी कधीच आवाज उठवला नाही, अपवाद शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष.
स्थानिक नेत्यांची अशी अनास्था असताना ‘मातोश्री’कडूनही याबाबत फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला रायगड जिल्ह्याची अ‍ॅलर्जी तर नसावी? रायगड जिल्ह्यात पक्ष वाढण्यासाठी कोणाकडे नेतृत्व सोपवायचे, ती व्यक्ती पात्र आहे अथवा नाही, कितपत सक्षम व कार्यरत आहे याचे ‘ऑडिट’ मातोश्रीवर आजवर झालेच नसावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही वेगळी परिस्थिती नाही. संघाच्या अनेक कार्यक्रमांना विरोधी विचारधारेच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले आहे. संघ परिवारातील एका संस्थेचे अध्यक्षपद, तर काँग्रेसच्या व्यक्तीला देण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. शेकापशी युती करू नये यासाठी ही ज्येष्ठ मंडळी भाजप नेत्यांचे बौद्धिक कसे घेणार? शेकापशी युती करू नये. ते आवळा देऊन कोहळा काढतील, अशी भावना सेना-भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती, परंतु खिसे रिकामे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मताला अन्य पक्षांप्रमाणे युतीतही किंमत नाही.
तिसरी आघाडी अल्पजीवी ठरली तर शेकाप पुन्हा एकदा युतीशी हातमिळवणी करेल. मात्र लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना त्याचा फारसा लाभ होणार नाही. उलटपक्षी शेकापला मात्र विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपमुळे बळकटी येईल. शेकापच्या मागे फरफटत गेल्याने ना राजकीय लाभ, ना पक्ष संघटना अशा दुष्टचक्रात सेना-भाजप अडकली आहे. ‘तेल गेले, तूपही गेले..’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.