Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
राज्य

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सूत्रसंचालक अरुण म्हात्रे बाजूला अशोक नायगांवकर अन्य कवी.

कर्तृत्ववान स्त्रियांची मराठी साहित्यिकांकडून उपेक्षाच
गणाधिश प्रभुदेसाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री साहित्यनगरी, महाबळेश्वर, २१ मार्च

मराठी साहित्यात कर्तबगार स्त्रियांच्या कर्तृत्वाचे प्रतिबिंब पूरक व समाधानकारक दिसत नसून कर्तृत्ववान स्त्रियांची मराठी साहित्यिकांकडून उपेक्षाच झाली आहे, असा सूर आज येथील परिसंवादात व्यक्त करण्यात आला. कर्तबगार स्त्रियांच्या कर्तृत्वाचे यथायोग्य प्रतिबिंब मराठी साहित्यात कितपत उमटले आहे, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ह. मो. मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात मधू जामकर, जया द्वादशीवार, भगवान ठाकूर, डॉ. सुलक्षणा कुलकर्णी आदी वक्ते उपस्थित होते. स्वाती महाळंक यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. मधू जामकर यांनी ताराबाई शिंदे यांच्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकापासून इंदिरा संत, दुर्गा भागवत ते आताच्या कविता महाजन यांच्या लिखाणाचा आढावा घेतला.

यादवांच्या भाषणाच्या प्रती देण्यास महामंडळाचा नकार
सुनील माळी, महाबळेश्वर, २१ मार्च

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे राजीनामा दिलेले अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या भाषणाच्या लिखित प्रती न वाटण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि स्वागत समितीचे पदाधिकारी डी. एम. बावळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यानंतर पत्रकारांनी पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला, तथापि त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थनच केले. तत्पूर्वी यादव यांच्या भाषणाच्या प्रतींसाठी एक प्रकाशक सुनील मेहता बैठकीस्थानी गेले असता त्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले.

हातकणंगलेकर व यादव यांचे छायाचित्र साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून गायब!
सुनील माळी, महाबळेश्वर, २१ मार्च

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात ‘रानफूल सह्य़ाद्री’चे या स्मरणिकेचे प्रकाशन विख्यात गायिका आशा भोसले यांच्या हस्ते मोठय़ा थाटात झाले खरे पण या स्मरणिकेतून विद्यमान अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर आणि अध्यक्षपदी निवड झाल्यावर राजीनामा दिलेले डॉ. आनंद यादव यांची छायचित्रेच गायब झाली आहेत. डॉ. यादव यांच्यावर स्तुतिसुमने उधळलेला कल्याणी दिवेकर यांच्या लेखाचा मात्र त्यात समावेश असून कळत-न कळत त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव संमेलनात करण्यात आला हे विशेष.

अध्यक्षपदाच्या वादामध्ये ‘काव्या’त्मक न्याय
अवधूत डोंगरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी (महाबळेश्वर), २१ मार्च

संमेलनाध्यक्षपदाच्या वादाविषयी कोणतीही ठाम भूमिका घेण्याचे साहित्य महामंडळाने टाळले असले तरी कविसंमेलनात मात्र या वादाचे पडसाद उमटले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

साहित्यिकांनी लक्ष्मणरेषा सांभाळावी - अभ्यंकर
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २१ मार्च

संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या ओवीची आठवण करून देत साहित्यिक मनाला येईल ते लिहितात. आपल्या संस्कृतीमधील श्रद्धास्थानांबाबत विचार, अभ्यास आणि संशोधन केल्याशिवाय लिहू नये. सर्व साहित्यिक, कवींनी लक्ष्मणरेषा सांभाळावी असे आवाहन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे केले.

सवंगडय़ांना आले आनंदाचे भरते
चंद्रपूरमधील दोन शाळांचे विद्यार्थी संघाच्या सर्वोच्चपदावर!

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २१ मार्च

मोहन भागवत यांच्या आजच्या निवडीने या शहरातील दोन शाळांमधील विद्यार्थी संघाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाले आहेत. मोहन भागवत यांनी येथील लोकमान्य टिळक शाळेतून दहावीची परीक्षा १९६५ मध्ये उत्तीर्ण केली. त्याच्या पंधरा वष्रे आधी संघाचे विद्यमान सरसंघचालक कुप्पी सी. सुदर्शन यांनी येथील ज्युबिली शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सुदर्शन तेव्हा मध्य प्रांतातून गुणवत्ता यादीत चौथे होते. सुदर्शन यांचे वडील वन खात्यात अधिकारी होते. मोहन भागवत यांचे आजोबा नारायण पांडूरंग उर्फ नानासाहेब पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार गुरुजींचे वर्गमित्र होते. हे दोघेही नागपूरच्या जुन्या निल सिटी व आताच्या धनवटे नगर विद्यालयाचे विद्यार्थी होते. नानासाहेब गुजरातचे प्रांत प्रमुख होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लिहिलेल्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात नानासाहेबांच्या कार्यावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकाला मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या देशव्यापी दौऱ्यात खासगी सचिव म्हणून मोहन भागवतांचे वडील मधुकररावांनी जबाबदारी सांभाळली होती.

‘लक्ष्मणरेषा सांभाळा’
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २१ मार्च

संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या ओवीची आठवण करून देत साहित्यिक मनाला येईल ते लिहितात. आपल्या संस्कृतीमधील श्रद्धास्थानांबाबत विचार, अभ्यास आणि संशोधन केल्याशिवाय लिहू नये. सर्व साहित्यिक, कवींनी लक्ष्मणरेषा सांभाळावी असे आवाहन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे केले.

खनिज उत्खनन आंदोलनाला हिंसक वळण; सुरक्षारक्षक मृत्यूप्रकरणी २० जणांवर गुन्हा
सावंतवाडी, २१ मार्च/वार्ताहर

दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात खनिज उत्खनन प्रकल्पाला विरोध डावलून नियोजित प्रकल्पाकडे जाणारा अनधिकृत रस्त्याच्या कारणावरून लोकांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे मिनरल्स अ‍ॅण्ड मेटल कंपनीचा सुरक्षारक्षक युसुफ शेख गाडीवरून पडून गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचे निधन झाल्याने २० आंदोलकांवर खुनाचा आणि २०० आंदोलकांवर जमाव जमवून दंगल घडविल्याचा गुन्हा दाखल झाल्याने संतापाची लाट पसरली आहे.

जमिनीच्या वादातून लुल्लेच्या ग्रामस्थांकडून टोळक्यास चोप
मालेगाव, २१ मार्च / वार्ताहर

गावकऱ्यांच्या कब्ज्यात असलेल्या एक हजार एकराच्या वादग्रस्त जमिनीचे चित्रिकरण करताना गावकऱ्यांना मारहाण करीत दहशत बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथून आलेल्या टोळक्यास संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील लुल्ले गावी घडली. या प्रकरणी खाकुर्डी पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करीत नऊ जणांना अटक केली आहे.

आगळ्या दुर्ग साहित्याचे वर्षप्रतिपदेला प्रकाशन
पुणे, २१ मार्च / प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या दुर्ग साहित्य संमेलनात सादर करण्यात आलेल्या निबंधातील विचारांवरील ‘दुर्ग विचार’, ‘गोनीदांचे दुर्गप्रेमींना पत्र’चे इंग्रजी रुपांतर आणि या पत्राच्या मूळ मराठी आवृत्तीवर आधारित तयार केलेल्या ‘शिवशकावली’ या मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (दि. २७) वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे.

जेएनपीटीच्या जागेवर नवी मुंबई सेझचा भराव
उरण, २१ मार्च/वार्ताहर

जेएनपीटीच्या ३२ एकर जागेतच नवी मुंबई सेझ व सिडकोने दगडमातीचा भराव टाकून संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात केल्याने जेएनपीटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या संदर्भात सिडकोकडे तक्रार करून सेझचे काम बंद करण्यात आले असून, जेएनपीटीच्या मालकीची जागा मोकळी करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जागतिक हवामान दिनानिमित्त पर्यावरण तज्ज्ञ प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांचा सत्कार
अलिबाग २१ मार्च / प्रतिनिधी

जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या वतीने सोमवार २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पर्यावरण जागृती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पर्यावरण तज्ज्ञ तथा नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांचा सत्कार आणि ‘ग्लोबल वॉर्मीग’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आह़े

आतापर्यंतच्या सरसंघचालकांचा कार्यकाळ
नागपूर, २१ मार्च/ प्रतिनिधी

मोहन भागवत हे रा.स्व. संघाचे सातवे सरसंघचालक असून, भैयाजी जोशी हे चौदावे सरकार्यवाह आहेत. यापूर्वी होऊन गेलेले सरसंघचालक आणि त्यांचा कार्यकाळ असा: १) डॉ. केशव बळीराम हेडगेवार (जन्म १ एप्रिल १८८९, मृत्यू २१ जून १९४०)- कार्यकाळ १० नोव्हेंबर १९२९ ते १२ जुलै १९३० आणि १७ फेब्रुवारी १९३१ ते २१ जून १९४०. २) डॉ. लक्ष्मण वासुदेव परांजपे (जन्म २० नोव्हेंबर १८७७, मृत्यू २२ फेब्रुवारी १९५८)- कार्यकाळ १२ जुलै १९३० ते १७ फेब्रुवारी १९३१. ३) माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गुरुजी (जन्म १९ फेब्रुवारी १९०६, मृत्यू ५ जून १९७३)- कार्यकाळ ३ जुलै १९४० ते ५ जून १९७३. ४) मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस (जन्म ११ डिसेंबर १९१५, मृत्यू १७ जून १९९६)- कार्यकाळ ६ जून १९७३ ते ११ मार्च १९९४. ५) प्रा. राजेंद्रसिंह उर्फ रज्जूभैया (जन्म २९ जानेवारी १९२२, मृत्यू १४ जुलै २००३)- कार्यकाळ ११ मार्च १९९४ ते ११ मार्च २०००. ६) कुप्प.सी. सुदर्शन (जन्म १८ जून १९३१)- कार्यकाळ ११ मार्च २००० ते २१ मार्च २००९. या सरसंघचालकांपैकी गोळवलकर गुरुजी हे सर्वात तरुण वयात, म्हणजे ३४ व्या वर्षी सरसंघचालक झाले होते. डॉ. हेडगेवार हे ४० व्या वर्षी, तर डॉ. परांजपे हे ५३ व्या वर्षी सरसंघचालक झाले. अलीकडच्या काळात त्या मानाने वयोवृद्ध सरसंघचालक झाले. बाळासाहेब देवरस यांनी ५८ व्या वर्षी, रज्जूभैयांनी ७२ व्या वर्षी, तर सुदर्शन यांनी ६९ व्या वर्षी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी ज्या काळात जंगल सत्याग्रहात भाग घेतला त्या काळात या पदाची सूत्रे डॉ. परांजपे यांच्याकडे सोपवली होती.