Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

रुपेरी पडद्यावर वा रंगमंचावरून आपले मनोरंजन करणे एवढय़ापुरतीच काही कलावंताची अभिव्यक्ती मर्यादित नसते. समाजातील प्रत्येक घडामोडींबाबत तो संवेदनशील भूमिका घेत असतो. २६ जुलैचा महाप्रलय असो की, २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला! सामाजिक स्पंदनांचे प्रतिनिधी ठरत हे कलावंत कृतिशील होतात. त्यावेळी क ोणता पब्लिसिटी स्टंट नसतो की, मेक-अप नि संहिता! असते ती केवळ सामाजिक बांधीलकी! राजकारणाबाबत उदासीन राहणाऱ्या पांढरपेशा मध्यमवर्गाला लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी दिलेला हा झणझणीत इशारा..
भारतामधील राजकीय वाटचालीमध्ये १९७० चे दशक महत्त्वपूर्ण ठरले आहे. इंदिरा गांधी सत्तेवरून पायउतार, देश ढवळून काढणारी आणीबाणी नि त्यानंतर जनता पक्षाचे सरकार! पुन्हा दशक संपताना सत्तारूढ झालेल्या इंदिरा गांधी, अशा टोकाच्या घडामोडींनी हे दशक गाजले. स्वातंत्र्योत्तर काळात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर देश ढवळून निघाला नव्हता. अक्षरश: प्रतिक्रांती म्हणावे अशा पद्धतीचे वातावरण होते.

‘नदी वर्ष २००८’च्या निमित्ताने ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’च्या वतीने ‘जीवनदायी नद्या’ या मध्यवर्ती संकल्पनेवरील छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. गुजरातच्या घनशाम कहार यांनी टिपलेल्या या छायाचित्राला या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. भारतातील नद्यांचे सध्याचे स्वरूप पाहिले तर त्या खरंच जीवनदायी आहेत का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती सध्या आहे. विजय मुडशिंगीकर यांनी अशाच एका प्रेरणेतून ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ची स्थापना केली. गंगा नदीचा उगम ते बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांनी सफर केली आणि गंगा नदीचे बदलते स्वरूप टिपले. गंगा नदीविषयी जागृती निर्माण करण्याची त्यांनी मोहीमच सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जीवनदायी नद्यांवरील छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आलेल्या छायाचित्रांपैकी निवडक २५ छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या २८ व २९ मार्च रोजी प्रभादेवी येथील रचना संसदच्या कलादालनात भरविण्यात आले आहे. रविवार, २२ मार्च, हा जागतिक जलदिन.. त्या निमित्ताने तरी आपल्या नद्यांकडे डोळसपणे पाहण्यास आणि त्यांचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न आपण करणे गरजेचे आहे.

महत्त्वाचा ठरणार इ- फॅक्टर!
नीरज पंडित

यू टय़ूबवरील व्हिडीओ क्लीप्स्, फेसबूक किंवा ऑर्कूट यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सातत्याने होणारे अपडेटस्, ऑनलाइन मतदार नोंदणी उपक्रम आणि नव्याने तयार झालेले ब्लॉग्ज हे भारतातील सध्याचे इ-वातावरण आहे. निमित्त आहे ते पुढील दोन महिन्यांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे. यामुळे यंदांच्या निवडणुकांदरम्यान ‘इ’ फॅक्टर चांगलाच रंगणार आहे. राजकीय पक्षांकडून तसेच प्रशासनाकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापर यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्वाच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरला आहे.

तर कळवा आम्हाला..
यू गेट द किंग यू डिझव्‍‌र्ह.. या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. राजकारणापासून सामान्य समाज अलिप्त राहायला लागल्यापासून आपला प्रवास त्या क्षेत्रात अधोगतीच्याच दिशेने सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.. निवडून कुणीही आले तरी आपल्याला काय फरक पडतो, ही मानसिकताच त्याच्या मुळाशी आहे. आता या मानसिकतेला छेद द्यायला हवा. नेमकी तीच भूमिका प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मांडली आहे. केवळ राजकारणसाक्षर नव्हे तरी राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ व्हायला हवे, असे सांगताना त्यांनी ‘मतदानामध्ये ‘वरीलपैकी कुणीही नाही’ हा पर्याय तर राजकीयदृष्टय़ा आत्महत्याच असेही म्हटले आहे. अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला २२८४६२७७/ २२८२२१८७ वर फॅक्सने पाठवू शकता किंवा vruttant@gmail.com या ई मेलवर नोंदवू शकता.

पेव्हर ब्लॉक : एक विचारमंथन
‘पेव्हर का फेव्हर ब्लॉक?’ रस्त्याच्या कामासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग मोठय़ा प्रमाणात मुंबईत होत आहे. त्यामुळे नगरिकांच्या ज्वलंत प्रतिक्रिया या मथळ्याने प्रसारमाध्यमातून प्रकाशित होत आहेत.
शास्त्रीय पातळीवरून सोप्या भाषेत रस्ते बांधणी तंत्राच्या उत्क्रांतीचा इतिहास समजावून घेतल्यास ‘पेव्हर ब्लॉकचा’ इष्टतम (ऑप्टिमम) उपयोग करून घेण्याचे फलदायी विचारमंथन करणे शक्य होईल.

अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा
क्लासिक क्रिएशन्स संस्थेच्या वतीने अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे २९ मार्च ते ३१ मे कालावधीत होणार आहे. प्रवेश अर्ज रविंद्र नाटय़मंदिर (प्रभादेवी), शिवाजी मंदिर (दादर), दीनानाथ नाटय़गृह (विलेपार्ले) व गडकरी रंगायतन (ठाणे) येथील तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता संपर्क -९८२०६०२२४८. सत्यज्योत आर्टस या नाटय़संस्थेच्या वतीने हौशी कलाकारांसाठी वैयक्तिक अभिनय स्पर्धा व नाटय़प्रशिक्षण शिबिराचे आयोजन १५ एप्रिलपासून करण्यात आले आहे. अभिनय स्पर्धेत १५ वर्षांवरील सर्वाना भाग घेता येईल. अधिक माहितीकरिता संपर्क - विजय पाटणकर ९३२४६५६६१९, किंवा प्रतिक पाटणकर ९२२१७००५५४. तसेच मंगेश कला मंच संस्थेच्या वतीने १२ एप्रिल ते १४ जून (फक्त रविवार) दुपारी ४.३० ते सायं. ६.३० वेळेत बोरिवली येथे नाटक, दूरदर्शन, चित्रपट अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मिती सावंत, राजन ताम्हाणे, शरद पोंक्षे, अनिकेत विश्वासराव, सुहास कामत, दिनपाल गांगुली आदी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश व अधिक माहितीकरिता संपर्क ९८६९८७४१८२, ९३२३१७३४३७.
प्रतिनिधी

चित्र(माहिती)पट!
एखाद्या गंभीर विषयावर किंवा प्रेक्षकांना काहीतरी सांगण्याच्या हेतूने चित्रपट तयार केला जातो तेव्हा त्या विषयाच्या आकलनाप्रमाणेच चित्रपटाने प्रेक्षकाला त्यावर विचार करायला भाग पाडले किंवा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तर त्या चित्रपटाने अपेक्षित परिणाम साधला असे म्हणता येईल. ‘मेड इन चायना’मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) हा विषय उलगडून दाखविला असला तरी मांडणी तितकीशी प्रभावी नाही. त्यामुळे एसईझेड या विषयाबाबतचे विविध पैलू प्रेक्षकाला समजूनही चित्रपट म्हणून त्याचा हँगओव्हर मात्र राहत नाही.

बारा आण्यांपैकी ४० पैसेच वसूल
काही वेळा कथेचा जीव फारच छोटा असतो. अशा वेळी अनपेक्षित वळणे घेत ती कथा शेवटापर्यंत पोहोचली तर प्रेक्षकांना चित्रपट पाहताना मजा येते. तसे झाले नाही तर मात्र प्रसंग घडत जातात, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटते, पण चित्रपट म्हणून तो लगेचच विस्मृतीत जातो. ‘बारा आना’ हा चित्रपट पाहताना काही प्रसंगांमुळे आणि चुरचुरीत संवादांमुळे दोन घटका मनोरंजन होते पण तो खूपच क्षणिक आनंद असतो. वेगवान पटकथेअभावी या बारा आण्यांपैकी प्रेक्षकाचे चाळीस पैसेच वसूल होतात.

व्यक्तिवादाचा स्मार्ट उपहास
व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद आणि व्यवहारवादी दृष्टिकोन या साऱ्याचा अतिरेक आज सर्वत्र होताना आपल्याला दिसतो आहे. किंबहुना त्याच्या प्रखर झळाही अनेकांना बसू लागल्या आहेत. मानवी आयुष्यात ‘मी, माझं, मला’ यापलीकडे मानवता, माणुसकी, सहृदयता, सहिष्णुता तसंच समता आणि समजूतदारपणाचा एक मोठा प्रदेश असतो. परंतु याची जाणीव या टोकाच्या व्यक्तिवादानं पछाडलेल्या मंडळींत फारच क्वचित दिसून येते. कदाचित नेणिवेच्या पातळीवर तशी त्यांना ती जाणवतही असली, तरी मीपणाच्या, सत्ता-संपत्तीच्या माजामुळे त्याकडे ही मंडळी दुर्लक्ष करीत असतात.

सत्कार लावणी कलावंतांचा..
अभिजन वर्गाप्रमाणेच परदेशी पर्यटकांनाही महाराष्ट्रातील लोककलांची माहिती व्हावी म्हणून शासनातर्फे गेली काही वर्षे मुंबईत एन. सी. पी. ए.मध्ये लावणी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाही नुकताच हा महोत्सव साजरा झाला. लावणीविषयक कार्यशाळा आणि महाराष्ट्रातील विविध लावणी पथकांच्या सादरीकरणाबरोबरच ज्येष्ठ लावणी कलावतींचा सत्कारही शासनातर्फे या महोत्सवात करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुलाबबाई संगमनेरकर आणि अनसूयाबाई जावळे-लोणंदकर या दोघी ज्येष्ठ कलावतींचे सत्कार करण्यात आले. गुलाबबाई संगमनेरकर यांचे वय आज ७६ वर्षे आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून गुलाबबाईंनी लावणी नृत्याला सुरुवात केली. ती त्यांची चौथी पिढी! आज त्यांचा मुलगा आणि एक मुलगी त्यांचा हा वारसा चालवीत आहेत; तर दोन नातीही परदेशात लावणी नृत्याचे धडे देण्यासाठी जात असतात. गुलाबबाईंना आपली कला सादर करण्यासाठी १९७१ साली यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीत बोलावलं होतं. तर जया बच्चन यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता.

तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. ‘नॅशनल पार्क’मधल्या वाघिणीला दोन पिल्लं झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप असा निरोप मिळाला. तेव्हा पिल्लांना बघायला जायची उत्सुकता मनात निर्माण झालीच. पण या ना त्या कारणानं भेटणं लांबणीवर पडत होतं. अगदी कान्हा अभयारण्यातल्या त्यांच्या काकांना भेटण्याचा योगही जुळून आला, पण पुतण्यांचं दर्शन काही होत नव्हतं. गेल्या रविवारी अचानक ठरलेला प्रोग्रॅम कॅन्सल झाला तेव्हा कॅमेरा घेऊन तडक नॅशनल पार्क गाठले, ‘दुनिया की कोऊ ताकद अब तुम्हे मिलनेसे नही रोक सकती’, अशा थाटात.प्रसन्न सकाळी वाघीणबाई दोन्ही बछडय़ांना घेऊन मस्त, कोवळं ऊन अंगावर घेत बसल्या होत्या. पिवळ्या-काळ्या सुवर्णपाठी सूर्याच्या किरणांनी अप्रतिमशा झळाळून उठल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचा भारतीय मार्ग
आपली शिक्षणपद्धती पाठांतरावर अवलंबून आहे, त्यात विद्यार्थ्यांच्या खऱ्या बुद्धिमत्तेला वाव नाही, घोकंपट्टी केल्याने उत्तरे पाठ होतात पण विषय समजत नाही अशी तक्रार नेहमीच सर्व स्तरांतून व्यक्त होते. एखाद्या विषयावर आपली पकड असणे ही आजच्या काळाची गरज आहे, पण विद्यार्थीदशेत अशा प्रकारे स्वत:चा विकास करायला कोणाला फुरसत नसते व त्याचे तोटे पुढच्या आयुष्यात जाणवतात. जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला प्रचंड महत्त्व निर्माण झाले आहे. जगातील विविध देशांत संबंध कसे आहेत, हे कळणे व त्याचा अभ्यास करणे हे जितके छान आहे तितकेच महत्त्वाचेही.

‘मारवाडय़ाची गोष्ट’आता इंग्रजीत यावी : कुमार केतकर
व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार असलेल्या गिरीश जाखोटिया यांनी लिहिलेल्या ‘एका मारवाडय़ाची गोष्ट’ या वाचकप्रिय कादंबरीची दोन वर्षांत चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. राजेंद्र प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या कादंबरीच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन आज ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते एका अनौपचारिक कार्यक्रमात करण्यात आले. आता ही कादंबरी लवकरच इंग्रजी भाषेत अनुवादित करण्यात यावी, अशी सूचना केतकर यांनी या वेळी बोलताना केली.

‘मेड इन चायना’च्या कलाकारांबरोबर आज परिसंवाद
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीने कौटिल्य मल्टी क्रिएशनच्या सहकार्याने ‘तरुणाईच्या बदलत्या महत्वाकांक्षा’ हे सूत्र धरून ‘मेड इन चायना’ चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधण्याची एक अनोखी संधी आयोजित केली आहे. या चित्रपटातील संदीप कुलकर्णी, मधुका वेलणकर, शिल्पा नवलकर, कांचन पगारे आणि दिग्दर्शक संतोष कोल्हे या संवादात सहभागी होणार आहेत.
रविवार, २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रोटरी गार्डन सभागृहात (पेंढारकर महाविद्यालया समोर) हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. या कार्यक्रमाला ‘सीकेपी’ बँकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : मनोज चौधरी ९३२४६५२४५७ किंवा कमलेश चिटणीस ९३२०५८६८३ .
प्रतिनिधी

१२ न्यायालयीन केंद्रांत आज लोक अदालत
बृहन्मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई आणि काही वित्तसंस्थांच्या सहयोगाने उद्या (रविवार, २२ मार्च) ‘मेगा लोक न्यायालया’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या अखत्यारीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयां मधील कलम १३८ अन्वये दाखल झालेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार आहे. या प्रकरणांचा तडजोडीने जलद निकाल देण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता शहर व उपनगरांतील १२ न्यायालयीन केंद्रांत ‘मेगा लोक न्यायालय’ भरविण्यात येणार आहे. एस्प्लनेड, माझगाव, दादर, गिरगाव, बेलार्ड पिअर, बांद्रा, कुर्ला, अंधेरी, विक्रोळी, बोरिवली, मुलुंड आणि लघुवाद न्यायालय या १२ केंद्रांचा त्यात समावेश आहे.
प्रतिनिधी