Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

हरभजनला सचिनची सोनेरी भेट
विनायक दळवी, मुंबई, २१ मार्च

न्यूझीलंडमध्ये आज इतिहास घडला. हॅमिल्टन कसोटी जिंकून भारतीय क्रिकेट संघाने ३२ वर्षांनी विजयाचा इतिहास घडविला. या इतिहासाचे कर्ते पुरुष होते सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, झहीर

 

खान, इशान्त शर्मा, मुनाफ इत्यादी.. इत्यादी त्या सर्वामधला ज्येष्ठ होता सचिन तेंडुलकर. इतिहासाचे नवे पान लिहिता लिहिता या लिटिल मास्टरने त्या इतिहासावर नव्या आदर्शाची वेलबुट्टी काढली. सचिन तेंडुलकरने आपल्या सहकाऱ्यांसाठी एकमेकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची नवी परिमाणे निश्चित केली. पूर्वी राजे-महाराजे दर्जेदार कामगिरी करणाऱ्यांना आपला रत्नजडित कंठा बक्षीस द्यायचे. सचिनने आपल्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट सहा बळी घेणाऱ्या हरभजनसिंगला बक्षीस दिले. सोन्याचे हे ‘ब्रेसलेट’ सचिनसाठी सुदैवी ठरले होते.
या बक्षीसाचे कारणही तसेच वेगळे होते. अनिल कुंबळे निवृत्त झाल्यामुळे या भारतीय संघाला परदेशात फिरकी गोलंदाजीवर आता अवलंबून राहता येणार नाही, असा क्रिकेट समीक्षकांचा दावा होता. हरभजनसिंगने तो दावा आज फोल ठरविला. हरभजनसिंगच्या ऑफस्पिन गोलंदाजीचे या आधीचे कर्तृत्व घरच्या मैदानावर वादातीत होते. स्वगृही अवघ्या ४२ कसोटीत २१४ बळी घेताना १७ वेळा डावात पाचपेक्षा अधिक बळी घेणाऱ्या भज्जीला परदेशात ३३ कसोटीत अवघे १०२ बळीच घेता आले होते. पाचपेक्षा अधिक बळी फक्त चार वेळाच मिळविता आले होते. तो श्रीलंकेत दुखापतीमुळे गेला नव्हता व झहीर खान, इशान्त, श्रीशांत, आर. पी. शर्मा, मुनाफ, प्रवीणकुमार या मध्यमगती गोलंदाजांच्या प्रभावामुळे भारतातले भज्जीचे महत्त्व कमी कमी होत गेले. या पाश्र्वभूमीवर, भारतीय फिरकीची पताका पुन्हा फडकाविताना हरभजनसिंगने हॅमिल्टनमध्ये सहा बळी घेतले आणि सचिनचा हात आपल्या ब्रेसलेटकडे गेला. त्याने उत्स्फूर्तपणे ते हरभजनसिंगला पेश केला, भारतीय फिरकीची इज्जत राखल्याबद्दल.
सहकाऱ्यांच्या बाबतीत सचिन आदर्शाचा नवा पाठ घालून देत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीही कसा मागे राहील?
धोनीने भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात करण्याचा बहुमान राहुल द्रविडला दिला. राहुल द्रविडला सलामीला जायला सहसा आवडत नाही. त्याने अनेकदा भारताच्या डावाची सुरुवात केली; पण ती नाइलाजाने. राहुल द्रविड, भारताच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज या देशांमधील कसोटी विजयाचा एक प्रमुख साक्षीदार होता, सचिनसह न्यूझीलंडमधील कसोटी विजयाचे श्रेय आतापर्यंत या संघातील कुणालाही प्राप्त झाले नव्हते. द्रविडसारख्या संघातील एका ज्येष्ठ खेळाडूचा गौरव म्हणून धोनीने त्याला सलामीला पाठविले. ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब करण्याची संधी दिली. निवृत्त होणाऱ्या गांगुलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत नेतृत्वाची संधी याआधी धोनीने दिली होती. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका विजयाचा चषक स्वीकारण्याचा मान अनिल कुंबळेला दिला होता.
भारतीय बोर्डाने आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना मानाने वागविण्यासाठी काहीही केले नसले तरीही धोनीची, सीनिअर व निवृत्तीकडे झुकलेल्या खेळाडूंप्रती वागण्याची ही अदा लोकांना भावली.
सचिन तेंडुलकरचा सळसळता उत्साह सध्या चर्चेचा विषय आहे. न्यूझीलंडमधील पहिल्या वहिल्या (३३ वर्षांनंतर) विजयाने भारावलेला सचिन प्रचंड उत्साहात वावरत होता. संघाच्या बसमध्ये तो अक्षरश: आनंदाने उडय़ा मारीत होता. प्रत्येकाला आलिंगन देत होता. त्याला हुलकावणी देत असलेले न्यूझीलंडमधील कसोटी शतक हॅमिल्टनमध्ये साजरे झाले होते. त्या शतकाने भारताला तीन दशकानंतर ‘किवीं’च्या देशात कसोटी विजय मिळवून दिला होता. त्यामुळे पहिली कसोटी जिंकल्यानंतरचा जो आनंद खेळाडूला मिळेल तो सचिनच्या वर्तणुकीतून दिसत होता.
बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा आधारस्तंभ असलेल्या सुनील गावसकरने त्यावेळी तीन सलग शतके ठोकली होती. त्यावेळी संघाचे व्यवस्थापक असलेले बडोद्याचे महाराज फत्तेसिंगराव गायकवाड यांनी गावसकर यांना विविध देशांतील वेळ दर्शविणारे मनगटी घडय़ाळ भेट दिले होते. राजे-महाराजे आता राहिले नसले तरी तशी दानत अजूनही दिसून येते. क्रिकेटचा राजा असलेल्या सचिनने हा आदर्श घालून दिला आहे.