Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
क्रीडा

भारताचा ३३ वर्षांनंतर न्यूझीलंडभूमीत कसोटी विजय
हॅमिल्टन, २१ मार्च / पीटीआय

अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंगने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचा बोलबाला झालेल्या सेडन पार्कच्या खेळपट्टीवर यजमान न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना अलगद फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि भारतीय संघाने तब्बल ३३ वर्षांच्या कालखंडानंतर न्यूझीलंडभूमीत कसोटी विजय साजरा केला. पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज चौथ्याच दिवशी विजयाची मोहर उमटवत भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या विजयाची भारताला कालच मजबूत पायाभरणी करून देणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सामनावीराचा मानकरी ठरला.

हरभजनला सचिनची सोनेरी भेट
विनायक दळवी, मुंबई, २१ मार्च

न्यूझीलंडमध्ये आज इतिहास घडला. हॅमिल्टन कसोटी जिंकून भारतीय क्रिकेट संघाने ३२ वर्षांनी विजयाचा इतिहास घडविला. या इतिहासाचे कर्ते पुरुष होते सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, झहीर खान, इशान्त शर्मा, मुनाफ इत्यादी.. इत्यादी त्या सर्वामधला ज्येष्ठ होता सचिन तेंडुलकर. इतिहासाचे नवे पान लिहिता लिहिता या लिटिल मास्टरने त्या इतिहासावर नव्या आदर्शाची वेलबुट्टी काढली. सचिन तेंडुलकरने आपल्या सहकाऱ्यांसाठी एकमेकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची नवी परिमाणे निश्चित केली.

‘सचिन, द्रविडला मालिका विजयाची भेट द्यायची आहे’
हॅमिल्टन, २१ मार्च/ वृत्तसंस्था

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना मालिका विजयाची भेट द्यायची आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर व्यक्त केली. या विजयाचे सारे श्रेय धोनीने सचिन तेंडुलकर आणि आपल्या गोलंदाजांना दिले. १९६८ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजय मिळविला होता. त्यानंतर ४१ वर्षांच्या कालखंडात भारताला न्यूझीलंडच्या भूमीवर मालिका विजय मिळविता आलेला नाही. ४१ वर्षांत जे जमले नाही ते आम्ही सचिन, राहुल यांच्यासाठी साध्य करुन दाखवू, असे धोनी म्हणाला.

भारताला तिसरे स्थान
सिडनी, २१ मार्च / पीटीआय

भारताने आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. बँक्सटाऊन ओव्हल मैदानावर आज पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ४६ षटकांच्या झालेल्या या लढतीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा डाव ४४.४ षटकात १४२ धावात गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४३.५ षटकात ७ गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. कर्णधार कॅरेन रॉल्टन (५२), लिसा स्थळेकर (३०) आणि अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल (१९) यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या अन्य महिला फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे दुहेरी धावसंख्या नोंदवण्यात अपयश आले.

इंग्लंडचा एका धावेने विजय; वेस्ट इंडिजचे चुकले गणित
प्रॉव्हिडन्स (गयाना), २१ मार्च / एएफपी

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक जॉन डायसन यांनी डकवर्थ-लुईस नियमाचा अर्थ लावताना केलेल्या गणिती गफलतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा अवघ्या एका धावेने पराभव सहन करावा लागला. पॉल कॉलिंगवूड आणि ओवेस शहा यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २७१ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पेलताना सामन्यात प्रचंड रंगत निर्माण झाली होती. सामना मंद प्रकाशामुळे थांबविण्यात आला तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडने विंडीजच्या दिनेश रामदिनला पायचीत पकडल्यानंतर विंडीजची अवस्था ४६.२ षटकांत ७ बाद २४४ अशी झाली होती. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडचा संघ विंडीजपेक्षा सरस ठरत होता.

गिब्स-लॉईड क्रिकेट हॉल ऑफ फेम ‘कॅप्स’ने सन्मानित
गयाना, २१ मार्च / पी. टी. आय.

लान्स गिब्स आणि क्लाइव्ह लॉईड या महान विंडीज क्रिकेटपटूंचा आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्याच्या स्मृत्यर्थ ‘कॅप्स’ या दोघांनाही सन्मानपूर्वक देण्यात आला. येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय लढतीत उपाहारादरम्यान गिब्स आणि लॉईड यांना विंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आयसीसीचे संचालक डॉ. ज्युलियन हंट, तसेच गयाना क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष छेत्राम सिंग यांनी या ‘कॅप्स’ सन्मानाने दिल्या.

वेळापत्रक बदलणे पुरेसे नाही - चिदंबरम
नवी दिल्ली, २१ मार्च / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदानाच्या तारखा टाळून सामन्यांचे वेळापत्रक बनविण्यात आले असले तरी या स्पर्धेला केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी मिळण्यासाठी एवढे पुरेसे नाही, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले. सीएनएन- आयबीएन दूरचित्रवाणी वाहिनीवरील करण थापर यांच्या डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट या कार्यक्रमात बोलताना चिदंबरम यांनी ही माहिती दिली. ज्या राज्यात आयपीएल चे सामने होणार आहेत तेथील मतदानाच्या तारखा विचारात घेऊन चालणार नाहीत तर शेजारच्या राज्यातील मतदानाच्या तारखाही लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत, असे चिदंबरम यांनी सांगितले.

कॅरम : संजय मांडे, राजन भाटकर, निसार शेख विजयी
मुंबई, २१ मार्च / क्री. प्र.

महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन मान्यताप्राप्त आणि शिवाजी पार्क जिमखाना आयोजित राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या माजी राष्ट्रीय विजेता संजय मांडेने ब्रेक टू फिनिश नोंदवून एकतर्फी लढतीत मुंबईच्या श्रीनिवास सामलचा २५-७, २५-३ असा सरळ गेममध्ये पराभव करून तिसरी फेरी गाठली. अन्य सामन्यात मुंबईच्या राजन भाटकरने मुंबईच्याच देवेंद्र भवरचा २५-१५, २५-१ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून आगेकूच कायम ठेवली. दुसऱ्या एका एकतर्फी झालेल्या सामन्यात धुळ्याच्या निसार शेखने मुंबईच्या मंगेश सावंतचे आव्हान २५-०, २५-७ अशा सरळ दोन गेममध्ये संपुष्टात आणले.

आयपीएलसंदर्भात आज बीसीसीआयची बैठक
मुंबई, २१ मार्च / क्री. प्र.

सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्यावरुन अडचणीत सापडलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेविषयी निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक उद्या बोलाविण्यात आली आहे. मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेच ही माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेला सुरक्षा व्यवस्था पुरविण्याविषयी या स्पर्धेचे सामने ज्या ज्या राज्यांत होणार आहेत तेथील राज्य सरकारांनी काही आक्षेप नोंदविले आहेत. याचे मुख्य कारण स्पर्धेच्या तारखा आणि मतदानाच्या तारखा एकाच वेळेस येत आहेत. ही स्पर्धा १० एप्रिल ते २४ मे या काळात भरविण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ठरविले होते. मात्र हे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याअगोदर जाहीर करण्यात आले होते. या तारखांना केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप घेतल्यानंतर आयपीएल आयोजकांनी तीन वेळा स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल केला. मात्र या बदलांनंतरही केंद्रीय गृह मंत्रालयाचे समाधान न झाल्याने या स्पर्धेला अद्याप हिरवा कंदिल मिळू शकलेला नाही.त्यामुळे या स्पर्धेविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी ही तातडीची बैठक बोलाविण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्याने नमूद केले.

ही माझीच चूक - डायसन
प्रॉव्हिडन्स (गयाना), २१ मार्च / एएफपी

गणिती अंदाज चुकल्यामुळे वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागल्याची कबुली विंडीजचे प्रशिक्षक जॉन डायसन यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डायसन यांना वेस्ट इंडिज संघ इंग्लंडपेक्षा त्या स्थितीत सरस आहे, असे वाटल्यामुळे आपल्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतण्यास सांगितले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. डायसन म्हणाले की, आम्ही एका धावेने मागे होतो, तेव्हा मला वाटले आम्ही पुढे आहोत. त्यामुळे झालेल्या या चुकीबद्दल मीच जबाबदार आहे. मी चूक स्वीकारतो. मी संघाची माफी मागतो. या चुकीमुळे मी निराश झालो आहे.

इंडियन वेल्स टेनिस : रॉडिक, नदाल उपान्त्य फेरीत
इंडियन वेल्स, २१ मार्च / एएफपी

अ‍ॅन्डी रॉडिक व राफेल नदाल यांनी अनुक्रमे गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिक व जुआन मार्टिन डेल पोट्रोचा पराभव करत इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रॉडिकने सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिकचा ६-३, ६-२ गुणांनी धुव्वा उडवला. नदलाने सहाव्या मानांकित अर्जेन्टिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोचा ६-२, ६-४ गुणांनी पराभव केला. दोन दिवसांपूर्वीच नदालला डेव्हिड नालबंडियनविरुद्ध विजय मिळवताना घाम गाळावा लागला होता. दरम्यान, चौथ्या मानांकित रशियाच्या व्हेरा झोनारेव्हाने तिची दुहेरीतील सहकारी व्हिक्टोरिया अझारेन्काचा पराभव करत महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली. झोनारेव्हाने बेलारूसच्या अझारेन्काचा ६-३, ६-३ गुणांनी पराभव केला. अ‍ॅना इव्हानोव्हिक आणि अनास्तसिया पाव्हलीचेन्कोव्हा यांच्यात दुसरी उपांत्य लढत रंगणार आहे.