Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नाही चिरा, नाही पणती..
स्वातंत्र्य चळवळीत लोकशिक्षण आणि प्रबोधनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या लाल बावटा पथकातील एक द.ता. गव्हाणकर यांचा आज (२२ मार्च) जन्मदिवस. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत गव्हाणकरांनी लोकनाटय़ आणि पोवाडय़ांच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. विशेषत: ठाणे परिसरात ते सातत्याने कार्यरत राहिले. त्या काळातील एक साक्षीदार

 

निर्मला सोवनी यांनी जागविलेल्या या आठवणी..
शाहीर द.ना. गव्हाणकर आणि मा.शं. सोवनी (माझे पती) कॉलेजपासूनचे मित्र. दोघांनीही कोल्हापूर कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचर घेऊन बी.ए. केले. गव्हाणकर काकांनी ऑनर्स पदवी मिळविली. त्यांचे मूळ गाव कोल्हापूरजवळ आजरा. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना नाटय़, गाणे, काव्य साहित्याची आवड होती. १५/१६ व्या वर्षी राष्ट्रीय शाहीर नानवडीकरांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्याकडून त्यांनी शाहिराचे धडे घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या गावी न जाता शाहिरी ताफ्याबरोबर मध्य प्रदेशात गेले. तेथून थेट मुंबईला नोकरीसाठी आले. त्याच वेळेस आम्हीही ठाण्यात राहायला आलो. योगायोगाने पुन्हा मित्रांचा मेळावा जमला. गव्हाणकर काका त्रिभुवन रोडला गिरगावात राहात. तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीसाठी शाहिरी पत्करली. याच राष्ट्रीय चळवळीत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे व स्वत: गव्हाणकर या तिघांनी लाल बावटा पथक काढले. खेडोपाडी प्रचार कार्य सुरू केले. प्रतिसाद पण प्रचंड मिळाला. हे तिन्ही शाहीर पट्टीचे गाणारे. त्यांनी पारंपरिक विनोदाला फाटा देऊन आपली गीते व पोवाडे प्रभावी केले. अमर शेख ‘रात्र आहे वैऱ्याची जागा राहा’, अण्णाभाऊ साठे ‘दौलतीच्या राजा उठूनी सर्जा हाक दे शेजाऱ्याला शिवारी चला’ व द.ना. गव्हाणकरांची ‘छकटु’ अशी एकाहून एक सरस गीते ऐकून श्रोते गुंग होत. या कलापथकाचे कार्यक्रम ठाण्यात व आजूबाजूला गावोगावी होऊ लागले. रात्री-अपरात्री आमच्या घराला थाप पडायची (आमच्याकडे तेव्हा लाइट नव्हती.) गव्हाणकर काका आल्याबरोबर म्हणायचे, ‘वहिनी भूक लागली काय असेल ते खायला द्या, खूप दमलोय’ हे त्यांचे वाक्य अजून माझ्या कानात ठसले आहे. पुढे त्यांना राजकीय पकड वॉरंट निघाले. मी ठाण्यात नव्हते. ते आमच्या दोन खोल्यांच्या घरात राहू लागले. माझे पती त्यांना बाहेरून कुलूप घालून कामाला जात. शेजारची मुले सोवनी काकांनी सांगितलेला खानावळीचा डबा त्यांना पटकन देत. असे त्यांनी कोठडीसारखे दिवस काढले. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या तमाशाला बंदी घातली. मुख्यमंत्री मुरारजी देसाई होते. त्यांनी अगदी चिडून बंदी घातली, तरीही नाव बदलून ‘माझी मुंबई’ हे लोकनाटय़ पोलिसांच्या उपस्थितीत सादर करून त्यांनी ‘सळो की पळो’ केले. या लोकनाटय़ात ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ (लेखक अण्णाभाऊ साठे), गव्हाणकर हे गाणे लक्षात राहण्यासारखे शाहिरी आवाजात म्हणत. अण्णाभाऊ साठेही आमच्याकडे वरेचवर येत. पुढे चिनी आक्रमण आले आणि हे त्रिदल फुटले. अमर शेख यांनी पक्ष सोडला. बाकीचे दोघे सैरभैर झाले. मग पूर्वीसारखे पथक टिकू शकले नाही. या सगळ्या चळवळीत देशसेवेला झोकून देणाऱ्या गव्हाणकर काकांनी आर्थिक लाभ अगर आपल्या कुटुंबियांच्या भवितव्याचा विचार केला नाही.
गव्हाणकर काका डफ व हार्मोनियम उत्तम प्रकारे वाजवीत होते. छायाचित्रणही सफाईने करीत. एरवी मृदू आवाजात बोलणारे काका व्यासपीठावर त्यांचा खडय़ा आवाजात छत्रपतींचा व संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा गाताना हेच का ते मृदू बोलणारे काका असा आम्हाला प्रश्न पडे. अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. नाविकांचे बंड, संयुक्त महाराष्ट्र चळवळ , गोवामुक्ती संग्राम यात प्रत्यक्ष भाग घेऊन छायाचित्र टिपण्याचे धाडसही त्यांनी केले. समाजकार्य करताना अर्थार्जन व स्वत:ची प्रकृती याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. जागा नाही, मदत नाही अशा स्थितीत ते आजारी पडले आणि त्यातच १९७१ मध्ये निधन झाले. त्यावेळी लोकचळवळीत सहभागी असणाऱ्यांचा पुढे यथोचित गौरव झाला. त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. गव्हाणकरांचे कार्य मात्र उपेक्षितच राहिले. दोन वर्षांंपूर्वी रोझा देशपांडे यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या त्रिमूर्तीने बजावलेल्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला होता. मराठी लोकनाटय़ परंपरेचा इतिहास लिहिण्याची गवाणकरांची इच्छा मात्र पुर्ण होऊ शकली नाही.