Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

नाही चिरा, नाही पणती..
स्वातंत्र्य चळवळीत लोकशिक्षण आणि प्रबोधनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या लाल बावटा पथकातील एक द.ता. गव्हाणकर यांचा आज (२२ मार्च) जन्मदिवस. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत गव्हाणकरांनी लोकनाटय़ आणि पोवाडय़ांच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. विशेषत: ठाणे परिसरात ते सातत्याने कार्यरत राहिले. त्या काळातील एक साक्षीदार

अंधत्व निवारणाच्या व्रताचे अर्धशतक!
संदीप राऊत

डहाणूपासून बोरिवलीपर्यंतच्या नेत्ररुग्णांना ज्या काळी उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी थेट मुंबई गाठावी लागायची, त्या काळी म्हणजेच १९५९ साली वसईत नेत्रशल्यविशारद असलेले डॉ. गणेश भिकाजी परुळेकर यांनी त्यांच्या ठोसर, हटकर, खवणेकर, दोंदे या समकालीनांना हाताशी घेऊन ‘दि वसई ब्लाइंड रीलिफ असोसिएशन’ची स्थापना केली. सुरुवातीला ब्लाइंड रीलिफचं काम वसई नगरपालिकेच्या रुग्णालयात चालायचं. त्या काळात नेत्रशल्यविशारद डॉ.एस.व्ही. ओक शस्त्रक्रिया करीत असत. त्यानंतर वसईतीलच पारनाका येथील काँग्रेस हाऊस सभागृहातील खोल्यांमध्ये काही वर्षे संस्थेचं काम सुरू होतं. १९६७ सालच्या पहिल्या दिवशी संस्थेने पारनाक्याजवळील सध्याच्या वास्तूत प्रवेश केला.

संगीतविषयक पुस्तकांचा प्रचारक
भगवान मंडलिक

रसायन विषयातील बी. टेक. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला एक उमदा तरुण. स्वतंत्र उद्योग व्यवसाय करून देश-परदेशात खूप पैसा कमावू शकतो. मात्र विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला तरुण नोकरीऐवजी व्यवसायच करायचा, या विचाराने झपाटून काम करतो. त्याचे नाव-प्रसाद गोविंद कुलकर्णी. बी. टेक. झाल्यानंतर अगदीच बेकारी नको म्हणून दोन वर्षे त्यांनी नोकरी केली, पण तिथे मन मन रमेना. अखेर इंक एजन्सी आणि प्रिंटिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. प्रचंड कष्ट, मेहनत घेण्याची तयारी.

धिम्या गतीने लुप्त होणारा एक लगाम!
शुभांगी पवार

ठाणे शहर! विविध घटकांमुळे त्याची ओळख अधिकाधिक ठळक होत गेली. मग ती ओळख नाटय़गृहाची असो किंवा तलावांचे शहर म्हणून असो किंवा मग पोस्टर्स आणि बॅनर्सचे शहर म्हणून. पहिली रेल्वे धावलेले हे शहर त्याची जुनी कात टाकत आहे हे प्रकर्षांने जाणवते. उंच इमारती, मॉल्स, इंटरनॅशनल स्कूल्स असं आणखीही बरंच काही.

शब्द ते भारवाही अर्थांचे!
पराग पेठे

सुट्टीचा दिवस. दर आठवडय़ाची सुट्टीच्या दिवशी करू म्हणून पुढे ढकलत गेलेली बरीच कामं होती. जेवणं झाली. दुपारची झोप तर काढायचीच नव्हती, पण जेवण आणि चहाची वेळ यामध्ये काही तरी टाइमपास हवा होता. मग पेपर जमिनीवर पसरवला आणि संपादकीय वगैरे जड स्तंभ वाचायला घेतले. सोबत या जडाव्याला हलकंफुलकं ठेवण्यासाठी रेडीओचा ठणठणाट सुरू ठेवला.

मोबाइल सेवेची गुणवत्ता
दूरसंचार सेवेचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. १) लँडलाइन, २) सेल्युलर मोबाइल आणि ३) ब्रॉड बॅण्ड. या तिन्ही सेवांच्या गुणवत्तेविषयी ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया)ने निकष ठरवले आहेत. त्याप्रमाणे सेवेचा दर्जा सेवक कंपन्या राखतात की नाही हे बघण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षकांकडून सर्वेक्षण करून घेतले जाते. अशा सर्वेक्षणांचे अहवाल ट्रायच्या वेबसाइटवर (\www.trai.gov.in) उपलब्ध आहेत. मुंबई महानगरासाठीचा जानेवारी ते मार्च २००८ या कालावधीचा सुमारे २२५ पानांचा अहवाल डिसेंबर २००८ मध्ये ट्रायच्या वेबसाइटवर टाकला गेला. त्या अहवालाच्या संदर्भाने मोबाइल फोन सेवेच्या गुणवत्तेची चर्चा या लेखात करू.

शतायुषी!
आत्माराम नाटेकर

मालवण तालुक्यातील तोंडवळी हे समुद्रकिनाऱ्यावरील एक निसर्गसुंदर गांव. अरबी समुद्राच्या लाटांच्या गाजेमुळे सदोदित जागे राहणारे. उंचच उंच सुरूच्या बनांनी किनाऱ्याची धूप रोखलेली. शुभ्र वाळूचे डोंगर सागरी लाटांचा मारा खंबीरपणे झेलत उभे आहेत. मासेमारी हा येथील मुख्य धंदा. जेवणात बाराही महिने मासे. माशाच्या कालवणाशिवाय गळ्याखाली घास उतरत नाही. बारा वाडय़ांचा गांव, पण घरं विखुरलेली. घराच्या आजूबाजूला मासे पकडण्याची जाळी लटकलेली. येंड, कांडाळ, पाग, आकली ही छोटीमोठी जाळी. सर्वात मोठी रापण!

रांगोळीचा थाट
सुचित्रा साठे

रांगोळीचा विषय निघाला की लहानपणची एक आठवण माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून सूरदिशी वरती येते. त्यावेळी घर ‘काळोख’ असतानाच जागं व्हायचं. उठल्याउठल्या आईचं पहिलं काम काय असायचं तर अंगणात बादलीभर पाण्याचा सडा टाकायचा आणि रांगोळीच्या चार रेघा काढायच्या, म्हणजे अशी म्हणायची पद्धत हो! उभ्या, आडव्या रेघांनी छोटीशी रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकवाची बोटं उमटवायची. दारातल्या उंबरठय़ावर पाण्याचा हात फिरवून आलटून पालटून, उंबऱ्याला काटकोन करतील अशा दोन समांतर रेघा व गोपद्म काढून तो सजवला की मगच तिची दुसऱ्या कामांना सुरुवात व्हायची. अंगणात पाणी शिंपडल्यावर तो मृत्तिकागंध घरात आम्हाला उठवायला यायचा आणि आमची सुगंधी प्रभात उगवायची. मग तीच रांगोळी देवाचं नाव घेत देव्हाऱ्यासमोर विसावायची. गायीची चार पावलं आणि स्वस्तिक तिची सोबत करायचे. रांगोळीला हात लावला नाही असं कधी व्हायचंच नाही. रांगोळी दिसली नाही तर ‘अघटित काही घडले’ याची पक्की खूणगाठ बांधली जायची. अशी ही रांगोळी आपल्या जीवनात मानाचं पान पटकावून बसली आहे. पूजा आणि रांगोळी याचं अगदी मेतकूट. रांगोळीचं फूल आणि त्यावर हळदीकुंकवाची चिमूट घातल्याशिवाय पूजेसाठी चौरंगाची स्थापना व्हायचीच नाही. दिवाळीत पाडवा, भाऊबीज, रक्षाबंधन, वाढदिवस या दिवशी औक्षण करण्यासाठी किंवा ओटी भरण्यासाठी पाट मांडला असेल तर तिथे रांगोळीला विसरून चालणार नाही. गौरी-गणपतीत गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीची रांगोळीची पावलं घरभर उमटायलाच हवीत. तसंच गौरी विसर्जनाच्या दिवशी रांगोळीच्या पाऊलखुणा मागे ठेवल्यानंतरच गौरीला निरोप दिला जातो. देवापुढच्या दिव्याभोवती रांगोळीचं कडं पाहिजेच. तुळशी वृंदावन मग ते अंगणातलं असो नाहीतर बाल्कनीच्या कट्टय़ावर, तिच्या पुजेची सुरुवात रांगोळीनेच होते. लग्न, मुंज, यज्ञयाग, व्रतवैकल्ये यासारख्या कोणत्याही धार्मिक कार्यात सामानाच्या यादीत रांगोळीचा पहिला नंबर. चैत्र महिन्यात चैत्रांगणाच्या माध्यमातून ही आपलं वेगळं प्रतिकात्मक रूप दाखवते. बोढणाच्या वेळी खास नमुन्याचा आग्रह धरते. चातुर्मासात गोपद्म काढण्याच्या निमित्ताने नवविवाहितेशी गट्टी करते. सणासुदीला घरात जेवणाची अंगतपंगत असली की रांगोळीची कमान हवीच. ‘प्रत्येक पानाभोवती वेगळी महिरप हवी हं,’ असा घरातल्या आजीचा आग्रह रांगोळी काढणाऱ्या नातीच्या बोटातील कौशल्याला चांगलं मोकळंढाकळं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचा. अंगातल्या कलेला प्रोत्साहनही मिळायचं. आणि विनासायास प्रदर्शनही घडवलं जायचं. घरातल्या लिंबूटिंबू मंडळींचं रांगोळीकडे बारीक लक्ष असायचं. ‘माझ्या पानाभोवतीची रांगोळी सगळ्यात छान हवी’, या विचारचक्रामुळे कुठे बसावे हा निर्णय घेणे कठीण व्हायचं. या पानावरून त्या पानावर उडय़ा मारल्या जायच्या, पडझड व्हायची. शेवटी रडण्याची वाजंत्री वाजायची आणि भोजनाची रंगत वाढायची. सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा पंगतीत रांगोळीने भरलेलं, दोन तारांत अडकवलेलं, भोकाभोकांची नक्षी असलेलं नळकांडं ‘रोलर’सारखं सरळरेषेत फिरवलं जायचं. मधूनच ते कुरकुरायचं, गप्प उभे राहायचं पण जरा चुचकारल्यावर रांगोळीचा गुलाबी पट्टा पंगतीचं रूप खुलवायचा. कधी एखादी उत्साही व्यक्ती चार बोटांत भरपूर रांगोळी घेत धावतधावत आपला हातगुण ठळकपणे दाखवायची. तर अशी ही चौसष्ट कलांपैकी रोजच्या रोज अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य लाभलेली रांगोळी. रोज तिला हळदीकुंकवाची चिमूट पुरते. पण ती सणाच्या निमित्ताने जेव्हा अंगणात उतरते, तेव्हा नवरंगाची उपस्थिती हवीच. जमीन गेरूने सारवण्यात टंगळमंगळ केलेली तिला चालणार नाही. अंगठा आणि त्याच्या बाजूच्या पहिल्या बोटाच्या चिमटीत रांगोळी पकडून उभ्या आडव्या ठिपक्यांचा चौकोन तयार झाला की हिच्या आस्तित्वाच्या खुणा दिसायला लागतात. ठिपक्यांचा कागद वापरायला हिची ना नसते. ठिपक्यांची जोडणी झाली की हिचे स्वरूप प्रकट होते. जितकी रेषा बारीक तितका कलाकार पारंगत. मग रंगाबरोबर युती करून कमीअधिक गडद, फिकट रंगछटा दाखवताना ही अगदी रंगून जाते. रंगाची निवड, त्यांचा अचूक वापर, आपापसातील सहयोग, जागेचं वाटप सगळं पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो. कलाकार परिश्रमपूर्वक, मान मोडून बैठक जमवून, वेळ देऊन तिची निर्मिती करतो आणि अंगणाची शोभा वाढवतो. दोनच बोटांवर फार ताण आल्यामुळे असेल पाचही बोटं पुढे आणि आणि ठळकरीत्या, घोटीव असा हिचा आविष्कार उमटला. रंगाची चाळणी लागली आणि गडदपणाकडे हिचा कल झुकला. बिंदू सरळरेषा, अर्धवर्तुळ, वर्तुळ, केंद्रवर्धिनी, गोपद्म, सर्परेषा, तुरा अशा शुभचिन्हांनी युक्त असं हिचं देखणं रूप सर्वांना आकर्षून घेऊ लागलं. प्रतीक प्रपंचात विविधतेने एकमेकांशी नातं जोडणारी चिन्हं बरंच काही शिकवून जाऊ लागली. सामूहिकरीत्या हिचा कलाविष्कार सादर होऊ लागला. हाताची पाच बोटं सारखी नसतात, पण एकत्रितरीत्या काम केल्यामुळे उणिवा दूर सारल्या जातात. एका सुंदर रांगोळीचा जन्म होतो. समाजाला संघटित केल्याचं बायप्रॉडक्टही फार महत्त्वाचं. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या दगडापासून बनविलेले रवाळ चूर्ण वापरून सर्वसाधारणपणे रांगोळी रेखाटली जाते. कधी रंगाऐवजी झेंडू, शेवंती, गुलाब, अस्टर्डच्या पाकळ्या, झाडांची पाने तिला आकर्षक रूप व विशिष्ट गंधही बहाल करतात. पाण्यावर कोळशाची पूड टाकून, गुलाबाच्या पाकळ्या टाकून मधे मेणबत्ती लावली की ती पंचतारांकित रूपात समोर येते. मसूरडाळ, मूगडाळ, चणाडाळ, काळे उडीद, तांदूळ अशा धान्यांना तसेच कडधान्यांना जागा देऊन ती त्यांची ‘कड’ घेते. मिठाला आपल्यात सामावून घेते, पण मिठाचा खडा मात्र कुठेही टाकत नाही. तांदळाचे पीठ पाण्यात कालवून त्यांनी रेखाटलेली रांगोळी ‘आयुष्मान् भव’ असा आशीर्वाद खरा ठरवते.