Leading International Marathi News Daily
सोमवार, २३ मार्च २००९

मुंबई, २२ मार्च / क्री.प्र.
लाहोरमध्ये श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेला हल्ला आणि भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या दोन्ही घटनांना महत्त्व न देता आयपीएलचेच घोडे दमटविणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाची मिजास केंद्रीय गृहमंत्रालयाने उतरवली आहे. अनेक राज्यांनी आयपीएलला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास नकार दर्शविल्यामुळे अखेर आयपीएलला भारताबाहेर घेऊन जाण्यास बीसीसीआयला भाग पडले आहे. इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा दुसरा हंगाम आता भारत भूमीऐवजी इंग्लिश किंवा आफ्रिकन भूमीवर बहरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाल्यावर दुसऱ्या पर्वाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी ललित मोदी अ‍ॅन्ड कंपनी सज्ज झाली होती. परंतु एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आणि लाहोर हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता.

सारे आलबेल नाही!
मुंबई, २३ मार्च / क्री. प्र.
भारतीय क्रिकेट बोर्डाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली इंडियन प्रीमियर लीग परदेशात खेळविण्याचा चंग बांधला असला तरी या स्पर्धेपुढील समस्यांचे बाऊन्सर मात्र ललित मोदी आणि मंडळींना थोपविणे कठीण होणार असल्याचीच चिन्हे आहेत. परदेशात आकारण्यात येणारा भरमसाठ कर, टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क, सामन्याच्या वेळा, उपलब्ध मैदाने, प्रायोजक आदि समस्यांची मालिका आता इंडियन प्रीमियर लीगबरोबर सुरू होणार आहे.
राजकारणापाठोपाठ खेळाच्या पीचवरही काँग्रेसचा पवारांना झटका!
मुंबई, २२ मार्च / खास प्रतिनिधी

राजकीय पिचवर काँग्रेस नेतृत्वाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची कोंडी केली असतानाच आयपीएलच्या सामन्यांवरून खेळाच्या पिचवरही काँग्रेसने पवारांना चांगलाच झटका दिला आहे. राज्यात गृह खाते राष्ट्रवादीकडे असतानाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुरक्षेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीची डाळ शिजू शकली नाही. यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी, आयपीएलचे सामने देशाबाहेर जाण्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या काँग्रेसशासीत राज्य सरकारांना जबाबदार धरले आहे.

प्रक्षोभक भाषणाबद्दल वरुण गांधी दोषी..
नवी दिल्ली, २२ मार्च/वृत्तसंस्था
लोकसभेचे पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे उमेदवार वरुण गांधी यांनी याच मतदारसंघात मुस्लिम आणि काँग्रेस पक्षाविषयी भाषणातून केलेली टीका निवडणूक आयोगाला आक्षेपार्ह वाटली असून आयोगाने गांधी यांना त्याबद्दल दोषी ठरविले आहे. वरुण गांधी यांनी आयोगाकडे मांडलेली आपली बाजू फेटाळण्यात आली असून भाजपने वरुण गांधी यांना उमेदवारी न देण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. वरुण गांधी यांच्या या भाषणानंतर उत्तरप्रदेशसहीत देशभर मोठे वादळ उठले होते. वरुण गांधी यांचे विचार हे पक्षाचे विचार नाहीत असे स्पष्ट करून भाजपने त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आता याप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आल्याने हे वादळ पुन्हा चांगलेच घोंगावत राहणार आहे.

जेड गुडीचे निधन
लंडन, २२ मार्च /ए.पी.

अभिनेत्री आणि रिअ‍ॅलिटी स्टार जेड गुडी हिचे काल रात्री उशिरा कर्करोगाने निधन झाले. २७ वर्षीय जेडला दोन मुले आहेत. गेले काही दिवस ती कर्करोगाने आजारी होती. अलीकडेच तिने आपल्या एका मित्राशी विवाह केला होता. ‘बिग ब्रदर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये शिल्पा शेट्टीला वर्णभेदी वागणूक दिल्याने जेडवर सर्वत्र टीकेचा भडिमार झाला होता. यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेरही जावे लागले होते. यानंतर शिल्पा शेट्टी हिने जेडला माफ केल्याने या विषयावर पडदा पडला होता. अशाच प्रकारच्या ‘बिग बॉस’ या भारतामधील स्पर्धेत शिल्पाने जेडला खास आमंत्रित केले होते. या स्पर्धेत असतानाच जेडची प्रकृती बिघडली. यावेळी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जेडला स्पर्धा सोडून पुन्हा लंडनला जावे लागले.

प्रसाद केरकर, मुंबई, २२ मार्च
टाटा उद्योग समूहाने पूर्ण भारतीय बनावटीने तयार केलेली आणि सोमवारी लाँच होत असलेली नॅनो ही छोटी मोटार म्हणजे संपूर्ण जगाला अचंबित करणारा आविष्कार.. भविष्यात आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने भारताने टाकलेले ठोस पाऊल म्हणूनही त्याचेकडे पाहिले जाते. जगातील वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांनी अनेक महागडय़ा मोटारी यापूर्वी सादर केल्या परंतु केवळ एक लाख रुपये किमतीत (किंवा १९०० डॉलर) चार सीट असलेली सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी मोटार तयार करणे ही सोपी बाब नव्हती. सुझुकीचे प्रमुख ज्यावेळी भारतात आले होते, त्यावेळी त्यांनीही एक लाखाच्या मोटारीबाबत आश्चर्य व असमर्थता व्यक्त केली होती. परंतु असे असूनही भारतीय तंत्रज्ञांनी ती बाब प्रत्यक्षात उतरवून दाखविली.

निषेध!!!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात ठराव

शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २२ मार्च

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम समाजातील काही बाह्य़शक्ती करत असून, त्यामुळे व्यक्ती, संस्था आणि समाजाचे खच्चीकरण होत आहे, असे सांगतानाच लेखक-प्रकाशकांनीही आपल्या सामाजिक बांधीलकीचे भान ठेवावे, असा ठराव ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आज झालेल्या समारोपाच्या सत्रात मंजूर करण्यात आला. ठरावातील लेखकांबाबतचा मजकूर म्हणजे खुद्द अखिल भारतीय साहित्य महामंडळानेच या संमेलनाचे राजीनामा दिलेले अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याचे मानले जात आहे.

अखेर ठाले-पाटील नमले!
गणाधीश प्रभुदेसाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री साहित्यनगरी, महाबळेश्वर, २२ मार्च

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभातील आपल्या भाषणातील मते ही आपली वैयक्तिक असून, त्याचा महामंडळाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला. उद्घाटन समारंभातील भाषणानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन ठाले-पाटील यांना हा खुलासा करत नमते घ्यावे लागले.

राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक, २२ मार्च / प्रतिनिधी
जाहीर सभेत प्रांतवादी वक्तव्य करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुध्द जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या आदेशान्वये येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ राज ठाकरे यांनी शनिवारी येथील अनंत कान्हेरे मैदानात आयोजित जाहीर सभेने केला. सभेच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे यांना जपून बोलण्याविषयी नोटीस दिली होती.

काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा.. पण निर्विवाद बहुमत दूरच
तिसऱ्या आघाडीचे तीन तेरा वाजणार?

मुंबई, २२ मार्च/प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीबद्दलच्या पहिल्या जनमत चाचणीचे निष्कर्ष आता सामोरे आले असून त्यामध्ये सत्ताधारी काँग्रेसला १४४ तर भाजपाला १३७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्टार न्यूज, स्टार माझा- नेल्सन यांच्यातर्फे करण्यात आलेल्या या पाहणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी २५७ जागा जिंकून बहुमतापासून किंचित दूर राहण्याची चिन्हे वर्तवण्यात आली आहेत. स्टार माझा-नेल्सनतर्फे घेण्यात आलेल्या या पाहणीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पारडय़ात १८४ जागा तर तिसऱ्या आघाडीच्या पारडय़ात ९५ जागा पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून सात जागा मिळण्याची शक्यता आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी