Leading International Marathi News Daily
सोमवार, २३ मार्च २००९

सेव्ह कोकण
निसर्गरम्य कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे असे राजकारण्यांपासून सगळेच जण म्हणतात. पण कोकणचा कॅलिफोर्निया करायचे म्हणजे नेमके काय करायचे हे कोणच सांगत नाही. कोकणाचा विचार केला तर, आज कोकणात काय नाही? मुबलक पाणी, निसर्गाने लयलूट केलेले समुद्रकिनारे, प्राचीन देवळे, जगाला वेड लावेल असा आंबा, काजू, नैसर्गिक धबधबे अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण असा अमूल्य ठेवा असतानाही जगाच्या नकाशात कोकण कोठेच नाही, अशी स्थिती आहे. कोकणालाच जोडून असलेल्या गोव्यात तसाच निसर्ग पण गोव्याला जागतिक पातळीवर ग्लॅमर लाभले आहे, तसे ग्लॅमर कोकणाला कधी लाभणार, असा प्रश्न आहे.
अर्थात कोकणाला जागतिक नकाशावर आणण्यासाठी सरकार काही करेल असे म्हणून आपण हातावर हात ठेवून बसण्यात काहीच अर्थ नाही. सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला खरा, पण त्यापुढे विशेष काहीच प्रयत्न झाले नाहीत. सरकारच सर्व करेल असे म्हणून लोकांनी काहीच करायचे नाही, असे नाही. कोकणाला जागतिक नकाशावर नेण्यासाठी सरकारी पातळीवर जसे प्रयत्न आवश्यक आहेत, तसे सामाजिक संस्था, बिगर सरकारी संस्था व खासगी कंपन्या यांनी देखील आपल्यापरीने प्रयत्न केले पाहिजेत. अशा संस्थांनी पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणून कोकणाच्या विकासासाठी पावले उचलण्यासाठी भाग पाडले पाहिजे. तरच कोकणाचा विकास होऊ शकतो. कोकण जागतिक पर्यटन नकाशावर झळकल्यास संपूर्ण महाराष्ट्राला पोसू शकेल एवढी कोकणच्या पर्यटनाची आर्थिक ताकद निश्चितच आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या केवळ पर्यटन उद्योगावर फुलल्या आहेत. कोकणही जागतिक पर्यटनाच्या नकाशात आल्यास येथे आर्थिक समृध्दी येईल. यातून येथील स्थानिक रहिवाशांचाही विकास होऊ शकेल. याच विचाराने प्रेरित होऊन कोकणाच्या विकासाचे कंकण हाती घेऊन ‘सेव्ह कोकण लि.’ या कंपनीने अनेक योजना

 

आखल्या आहेत.
उद्योजक अजित मराठे, संजय यादवराव, प्रदीप शिर्के अशा मान्यवरांनी एकत्र येऊन सेव्ह कोकण लि. कंपनी स्थापन केली. त्याद्वारे ते कोकणच्या विकासाचे काम करणार समजल्याबरोबर कल्पना दाद द्यावी अशी वाटली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी न विकता त्या आपल्याकडेच ठेवल्या पाहिजेत. आज कोकणात अनेक जण जमिनी विकत आहेत. अशा जमिनी न विकता त्या जमिनी त्यांनी स्वत:च विकसीत कराव्यात, असे ‘सेव्ह कोकण’ला वाटते. कोकणाचा विकास होताना कोकणी माणूस हा त्याच्या केंद्रभागी असला पाहिजे. ‘बाहेरच्या’ लोकांनी कोकणात येऊन विकास करण्यापेक्षा स्थानिक लोकांच्या पुढाकारने कोकणाचा विकास झाला पाहिजे, असे सेव्ह कोकणचे मुख्य प्रवर्तक अजित मराठे यांना वाटते. आणि ही कंपनी स्थापन करून त्यादृष्टीने विकास करण्याचे त्यांनी ठरविले आहे. ‘‘सहसा समाजासाठी काही काम करायचे असेल तर स्वयंसेवी संस्था- एन.जी.ओ. किंवा सहकारी संस्था हे मार्ग अंगीकारले जातात. त्याऐवजी पब्लिक लिमिटेड कंपनी हा मार्ग मला जास्त योग्य वाटला. कारण यात व्यावसायिक पद्धतीने काम होईल, त्यात लोकांचा जास्तीतजास्त सहभाग असेल, कामात पारदर्शकता असेल,’’ असे मराठे यांनी सांगितले.
मुळचे कोकणातले असलेले अजित मराठे मुंबईत वाढले पण त्यांना कोकणाचे नेहमीच आकर्षण वाटत होते. बी.ई. झाल्यावर दोन वर्षे ते संघाचे प्रचारक होते. घरी उद्योगाची पाश्र्वभूमी नव्हती, पण त्यांनी त्यांचे अगदी बालपणापासूनचे मित्र राजेंद्र सावंत यांच्याबरोबर काम करणे सुरू केले. फक्त २५ हजार रुपये भांडवलावर १९९५ साली काम सुरू झाले. आधी इंटेरिअर डेकोरेशनचे काम ते घेत. नेरळला त्यांना मावशीचा प्लॉट विकसित करण्याची संधी मिळाली.
ती बिल्डिंग त्यांनी आधी बांधली, त्यातून दुसरी असे करत विस्तार केला. बांधकाम व्यवसायात त्यांनी स्थापन केलेल्या ‘निर्माण ग्रुप’ने अल्पावधीत चांगले नाव कमविले. आज नेरळमध्ये त्यांची मोठी टाऊनशिप आहे. मुंबईत कांदिवली, जोगेश्वरी व महालक्ष्मी अशा अनेक ठिकाणी त्यांचे काम सुरू आहे. त्याशिवाय खंडाळा, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर अशा अनेक ठिकाणी काम सुरू आहे. निर्माण ग्रुप ऑफ कंपनी ही आता पब्लिक लिमिटेड कंपनी आहे.
अजित मराठे एकदा कोकणात गेले असताना त्यांना एक बिल्डर भेटले. ३.५० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी एक प्रकल्प जवळजवळ पूर्ण केला होता, पण विक्री नव्हती. ते अडचणीत होते. निर्माणने त्यांच्याबरोबर सामंजस्य केले. निर्माणचे नाव दिले व मार्केटिंग केले. १५ दिवसांत ७० घरे विकली गेली. तसेच कोकणशी संबंधित काम करणारे संजय यादवराव व इतर लोक यांच्याबरोबर चर्चा सुरू असायची. कोकणभूमी प्रतिष्ठानतर्फेही कोकण विकासाचे काम सुरू होते. याच वेळेस मग ही सेव्ह कोकण लिमिटेड कंपनी स्थापन करण्याचे ठरले. पुण्याजवळील मगरपट्टासारखे जमीन न विकता जमिनीचा विकास करायचा, ती लिज्ने द्यायची व नफा शेअर करायचा ही मुख्य संकल्पना आहे. यात जमिनीच्या बदल्यात कंपनी शेअर देईल तसेच जमीनमालकाला नियमित उत्पन्नाचा स्रोत असेल. अजित मराठे, संजय यादवराव, प्रदीप शिर्के अशा सात प्रवर्तकांनी मिळून ही कंपनी सुरू केलेली आहे. द. म. सुकथनकर, नितीन पोतदार, भानू देसाई असे मान्यवर मार्गदर्शक आहेत. कोकणचा विकास होईलच त्याबरोबर जगही समृद्ध होईल असे ध्येय आहे. या कंपनीचे अनेक उद्देश आहेत. सध्या या उद्देशांवर आधारित कंपनी काम करील. त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
१) हेल्थ पॅक: कोकणच्या गावागावात अनेक पदार्थ बनतात, पण त्याची स्थानिक पातळीवरच विक्री होते. स्वत:चा व्यवसाय वाढविण्याची वृत्ती ज्यांच्याकडे आहे व पदार्थाच्या गुणवत्तेबाबत जे जागरूक आहेत अशा लोकांना कंपनीने एकत्र आणलेले आहे. अशा ९० पदार्थाची १२ महिने विक्री करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात साधारणत: आठ ते १० पदार्थ. प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पदार्थ मिळतील. त्या त्या हंगामाप्रमाणे ते असतील. वर्षांला ६,००० रुपये म्हणजे महिना ५०० रुपये या हिशेबाने हे पदार्थ ग्राहकाच्या दारात पोहोचविले जातील. मात्र वार्षिक रक्कम एकदम देणे आवश्यक आहे. यातूनच काही रक्कम सामाजिक कामासाठी वेगळी काढली जाईल.
२) आंबा: कोकणात आंबा पिकतो हे तर जगजाहीर आहे; परंतु त्याचे एकच एकच स्टँडर्ड व ग्रेड नाही. विजय जोगळेकर यांनी हे साध्य केलेले आहे. त्यांच्या मदतीने आंब्यांच्या बागांची अशा गुणवत्तापूर्ण पद्धतीने लागवड करायची हा उद्देश आहे. कोणत्याही आंब्याचे वजन २५० ग्रॅमपेक्षा कमी असणार नाही व खराब निघाला तर विनामूल्य बदलून मिळणार. तसेच जोगळेकरांच्या पद्धतीचे पेटन्ट घेणे शक्य आहे का यावर विचार सुरू आहे. अशा प्रकारे ब्रँडेड आंबा सेव्ह कोकण तर्फे बाजारात आणला जाईल. त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा आंबा मिळू शकेल.
३) जमीन: जमिनीच्या बदल्यात शेअर देऊन तिथे रिसॉर्ट, बंगले विकसित करणे. कोकणच्या माणसाला नोकरीधंद्यासाठी मुंबईत येण्याची गरज पडणार नाही इतका कोकणचा विकास होणार आहे. अनेक बंदरे विकसित होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना तिथेच रोजगार मिळेल व जमिनीच्या बदल्यात जे शेअर मिळालेले आहेत त्यातूनही उत्पन्न मिळत राहील.
४) सामुदायिक शेती: कोकणात जागा पडून आहेत व त्या शेतीयोग्य आहेत. जमिनीचे मालक तिथे शेती करत नाहीत किंवा विकतही नाहीत अशा ठिकाणी सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. सामुदायिक शेतीच्या माध्यमातून कोकणात अनेक नवीन पिके घेता येतील.
५) इ-गव्र्हनन्स: सरकारने हाती घेतलेल्या इ-गव्र्हनन्स प्रकल्पातील कोकणातील तीन जिल्ह्यातील फ्रॅन्चाइझी सेव्ह कोकणला मिळाली आहे. यानुसार प्रत्येक पाच गावांसाठी एक किऑस्क उभारले जाईल. यात सर्व प्रकारची सरकारी कागदपत्रे नागरिकांना मिळतील. अशा प्रकारच्या किऑस्कमधून सेव्ह कोकणला उत्पन्न मिळू शकेल.
६) कोकण हॉलिडेज: कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, हे लक्षात घेऊन ३६५ दिवस कोकणात हॉलिडेजचे पॅकेज तयार करण्यात येणार आहे. यात मँगो हॉलिडेज, ओले कोकण, गणेशोत्सव, दीपोत्सव, सह्याद्री महोत्सव, नववर्ष महोत्सव, बॅक वॉटर महोत्सव, एक दिवसांच्या सहली अशा विविध सहली आखण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या सहलींमुळे स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळेल.
सेव्ह कोकणचे स्वरूप हे कंपनीचे असल्याने व्यावसायिक पध्दतीने ती चालविण्याचा प्रवर्तकांचा प्रयत्न राहील. माजी सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, भानू देसाई असे मान्यवर मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा कंपनीला निश्चितच लाभ होईल, यात काही शंका नाही. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार या प्रकल्पाबाबत बोलताना म्हणाले की, ‘‘१०० टक्के पारदर्शकता व शून्य टक्के अहंकार हे काटेकोरपणे पाळल्यास हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल.’’
सेव्ह कोकणच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाचा हा एक चांगला प्रयत्न सुरू झाला आहे, असे म्हटल्यास वागगे ठरू नये.
संपर्क-०२२-६७८७५२५२
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com