Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
व्यापार-उद्योग

‘क्लस्टर’ पद्धतीच्या पुनर्विकासाला गती मिळेल
जुन्या इमारतींबाबत राज्याच्या धोरणाचे सेसड् प्रॉपर्टी डेव्हलपर्सकडून स्वागत व्यापार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन मुंबई शहरातील उपकरप्राप्त (सेसड्) आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन व गती देत आहे ही गोष्ट अत्यंत प्रशंसनीय आहे. नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत क्लस्टर पद्धतीने विकासासाठी अधिक सवलती देण्याचेच सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळे म्हाडा, रहिवाशी, इमारत मालक आणि खासगी विकासक यांच्याबरोबरच्या संयुक्त भागीदारीतून विकास योजना अमलात येऊ शकतात. यांपैकी प्रत्येक घटक क्लस्टर पद्धतीच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे उद्गार सेसड् प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ मुंबई (सीपीडीए) चे अध्यक्ष आणि युनिटी इन्फ्राप्रोजेक्टस्चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किशोर अवर्सेकर यांनी काढले.

व्यापार - संक्षिप्त
‘उत्तम गॅल्वा’ला सलग १२व्या वर्षी ‘ईईपीसी’कडून पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: भारतातील गॅल्वनाइज्ड स्टीलचे आघाडीचे उत्पादक- निर्यातदार ‘उत्तम गॅल्वा स्टील्स लिमिटेड’ने सातत्याने १२व्या वर्षी इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल (इइपीसी)चा प्रतिष्ठित ‘एक्स्पोर्ट एक्सलन्स’ पुरस्कार पटकावला आहे. या वर्षांच्या शेवटी कंपनी चार लाख वीस हजार टन मूल्यवर्धीत स्टील निर्यातीपर्यंत जाऊन ठेपेल. पुढच्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीचे अर्धा दशलक्ष टन निर्यातीचे ध्येय असेल. आर्थिक मंदीच्या काळातदेखील उत्पादन आणि भौगोलिक वैविध्यामुळे कंपनीचे मार्जिन त्यामानाने संरक्षित आहेत. उत्तम सध्या जगभरातील १४० देशांत आपली उत्पादने निर्यात करीत आहे.

‘मिटकॉन’च्या शिफारशीनुसार मांसप्रक्रिया मंडळ स्थापन
व्यापार प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया मंत्रालयाने मांस आणि कुक्कुटप्रक्रिया उद्योगाकडे अधिक प्रभावीपणे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, या संदर्भातील अंमलबजावणीसाठी नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील मांस आणि कुक्कुटप्रक्रिया मंडळ स्थापन करण्यात आले आहे. येथील मिटकॉन कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने याबाबत तयार केलेला विस्तृत अहवाल ग्राह्य धरून सरकारने या मंडळाची स्थापना केली आहे. उत्तम आणि स्वच्छ मांस उपलब्ध व्हावे, या दृष्टीने केंद्र सरकार आधुनिक कत्तलखाने उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. या योजनेंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी मिटकॉनची प्रकल्प देखरेख सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेच्या सल्ल्याने नगर येथे एक प्रकल्प उभारण्यात येत असून, असेच प्रकल्प जालना आणि उस्मानाबाद येथेही साकारण्यात येणार आहेत. मिटकॉनच्या येथील कार्यालयात या संदर्भात सल्ला देणारा खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मांसप्रक्रिया उद्योगाला भारतात मोठय़ा प्रमाणावर संधी असल्याचे मिटकॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी व निर्यातीच्या दृष्टीने मोठी संधी असून, अनुषंगिक वस्तूंची निर्मिती व उद्योगांच्या दृष्टीनेही विविध गोष्टी या अहवालात सुचविण्यात आल्या आहेत. त्यासाठी या क्षेत्रात मूलभूत सुविधा प्रदान करण्याची गरज असून, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एस. जी. म्हाप्रळकर ज्वेलर्सचा ‘डायमंड महोत्सव’
व्यापार प्रतिनिधी: साठ वर्षांपेक्षा जास्त काळ ‘सोनपरंपरा’ जपलेल्या दादर येथील ‘एस. जी. म्हाप्रळकर ज्वेलर्स’च्या वतीने ‘डायमंड महोत्सव’ योजण्यात आला आहे. या डायमंड महोत्सवाला चोखंदळ ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून लग्नसराई, मुंज तसेच गुढीपाडवा इत्यादी निमित्ताने आयोजिलेल्या या ‘डायमंड महोत्सवा’चा ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत लाभ घेता येईल. अशा प्रकारच्या महोत्सवाचे एस. जी. म्हाप्रळकर ज्वेलर्सच्या वतीने प्रथमच आयोजन करण्यात आले असून नवीन पिढीचा उत्साहजनक प्रतिसाद हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ असल्याचे आनंद म्हाप्रळकर यांनी सांगितले. सतत दर्जेदार सेवा, उत्तम दर्जा, ग्राहकांकडून येणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया या निकषांवर आधारित देण्यात येत असलेले ‘बिझनेस एक्सलन्स मॉडेल’ हे मानाचे प्रमाणपत्र एस. जी. म्हाप्रळकर ज्वेलर्स यांना प्राप्त झाले आहे. या महोत्सवात सोने, हिरे व मोती यांच्या पारंपरिक डिझाईन्ससह नवीन नक्षीकामांचाही समावेश आहे. पाचू, माणिक अशा रत्नांनी घडवलेल्या नाजूक, नक्षीदार ज्वेलरीचा यात विशेष सहभाग आहे. हिऱ्याच्या क्षेत्रातील नामवंत ऑस्ट्रेलियन कंपनी ‘अरगाईल’ यांच्या ‘रिओटिंटो’ हिऱ्यांचेही खास आकर्षण आहे. मंदीची लाट असली तरी सोने, हिरे व मोती यांचे आकर्षण काही जगावेगळे असते, म्हणूनच तर हा ‘डायमंड महोत्सव’ लोकप्रिय ठरला आहे. अधिक माहितीसाठी फोन-२४३०३२१० वर संपर्क साधता येईल.

मर्केटोर लाइन्सची नवीन जहाज खरेदी
व्यापार प्रतिनिधी: खासगी क्षेत्रातील जहाज वाहतूक क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी मर्केटोर लाईन्स लि.ने सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चुन जॅक अप रिग्ज असलेली जहाजे खरेदी केली आहेत. अलिकडेच कंपनीने याची खरेदी सिंगापूरस्थित केपल्स या कंपनीकडून केली. या नवीन रिग्जची क्षमता समुद्रात ३५० फूट खोल जाऊन उत्खनन करण्याची आहे. ही उत्खनन क्षमता वाढविलीही जाऊ शकते. मर्केटोर ही प्रामुख्याने टँकर वाहतूक क्षेत्रात कार्यरत असून अलीकडेच त्यांनी तेल उत्खनन क्षेत्रात प्रवेश केला होता. दरम्यान, कंपनीने डिसेंबर ०८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १६७३.१२ कोटी रुपये झाली. त्यावर निव्वळ नफा ३८७ कोटी रुपये कमविला.