Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
अग्रलेख

सुशिक्षितांची निर्बुद्धता!

 

आपल्या समाजात, विशेषत: महाराष्ट्रात, जे सांस्कृतिक अराजक माजले आहे त्याचेच प्रतिबिंब गेली काही वर्षे साहित्य संमेलनांमध्ये पडत आहे. अशा अराजकी गोंगाटात प्रत्येक जण दुसऱ्याने काय करायला हवे हे तावातावाने सांगत असतो. त्यामुळे वितंडवादाला विचारवंतांच्या चर्चेची प्रतिष्ठा प्राप्त होते आणि धिंगाण्याला (लोक)कलेच्या करमणुकीचा दर्जा मिळतो. सगळेच विचारवंत आणि सगळेच कलावंत! आणि प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य! इतकी प्रगल्भता जगात कुठच्याही समाजाने साध्य केलेली नाही! त्यामुळे गेले काही दिवस मराठी सारस्वतात जे काही चालू आहे त्यावर भाष्य करणे, मत प्रदर्शित करणे, सल्ला देणे म्हणजे त्या कर्कश्श गोंगाटात आपलाही हॉर्न वाजवण्यासारखे आहे. प्रत्येक कार जर हॉर्न वाजवीत असेल तर वाहतूक सुरळीत करणे किती अशक्य असते हे आपण सर्वजण दररोज अनुभवीत असतो. मग आपण कारमध्ये असू वा पादचारी असू वा पोलीस. गेली बरीच वर्षे एक स्वयंभू उच्चभ्रूंचा वर्ग, साहित्य संमेलनेच कायमची बंद करावीत असे सुचवीत आला आहे. तरीही गोंधळ, मारामाऱ्या, वितंडवाद, चारित्र्यहनन असे सर्व काही दरवर्षी होऊनही ठिकठिकाणची उत्साही व उत्सवी मंडळी पुढचे साहित्य संमेलन आपल्या गावी व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात. यंदाच्या हैदोस-धिंगाण्यानंतरही ठाणे, पुणे, परभणी, दिल्ली येथील संस्थांनी आपल्या गावी संमेलन घेतले जावे म्हणून महामंडळाला विनंती केली आहेच. या वर्षी रत्नागिरीला पर्यायी संमेलनाचा घातलेला घाट संयोजकांनी रद्द केला, त्यामुळे तेही विनंती करू शकतील. जर मराठी साहित्य संमेलनाने आंतरराष्ट्रीय धुरळा उडविला नसता, तर हे संमेलन महाबळेश्वरऐवजी सॅन होजे येथे अमेरिकेतच भरविले गेले असते. परंतु आता विश्व साहित्य संमेलनाचा एक नवा उत्सव त्यानिमित्ताने सुरू झाला आहे. अधिकाधिक उत्सव होण्यात गैर काही नाही. त्यामुळे आम्ही अमेरिकेतील संमलेनाला, रत्नागिरीच्या पर्यायी संमेलनाला किंवा महाबळेश्वरच्या ‘अधिकृत’ संमेलनालाही विरोध केला नव्हता. महाराष्ट्रात याव्यतिरिक्त दलित साहित्य संमेलन, भटक्या विमुक्तांचे, नवबौद्ध साहित्यिकांचे, ख्रिस्ती साहित्यिकांचे, मुस्लिम साहित्यिकांचे, मातंगांचे, नवलेखकांचे, अनुवादकांचे, विज्ञान लेखकांचे, विनोदी लेखकांचे, महिला साहित्यिकांचे, बालसाहित्याचे असे सुमारे ५० च्या आसपास महोत्सव साजरे होतात. म्हणजे सरासरी दर आठवडय़ाला एक साहित्य संमेलन! शिवाय नाटय़संमेलन, एकांकिका-लेखकांचे, लोकसाहित्याचे, पुरोगाम्यांचे, विद्रोह्य़ांचे, समांतर विद्रोह्य़ांचे महा‘मेळावे’ भरविले जात असतात. साहित्यनिर्मितीच्या सुमारे १०० पट चर्चा, परिसंवाद, वाद, महाराष्ट्रात झडत असतात. प्रत्येक उत्सवात कविसंमेलन असतेच आणि त्यालाही हजारो रसिक मध्यरात्र ओलांडली तरी हजर असतात. इतक्या अचाट प्रमाणावर ‘संस्कृतीकरण’ (!) होत असले तरी महाराष्ट्रात इतके सांस्कृतिक अराजक कसे? इतकी सर्वव्यापी निर्बुद्धता कशी? इतकी असहिष्णुता आणि अरसिकता कशी? या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत. त्यामुळे आम्ही कुणी काय करावे वा करू नये हे सांगून गोंगाटात भर घालू इच्छित नाही. आमचा उत्सवांना वा उत्सवी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला इथे (वा जगात कुठेही) विरोध नाही. परंतु या उत्सवांच्या परिघाबाहेरही एक साहित्यरसिकांचा, साहित्यिकांचा, समीक्षकांचा वर्ग आहे ज्याला या सांस्कृतिक प्रदूषणाने आपली सुसंस्कृतता जपणे दिवसेंदिवस अशक्य होत आहे. अशा उत्सवांमध्ये करमणूक, आनंद, संवाद, प्रबोधन, सर्जनशीलता या व अशा सर्व गोष्टी अभिप्रेत असतात. त्या होत असतील तर असे कितीही उत्सव झाले तरी त्याबद्दल टीका वा टवाळी होणार नाही. आता जरी वृत्तपत्रांमध्ये व टीव्हीवरील वाहिन्यांमध्ये ठळकपणे बातम्या व संबंधितांच्या प्रतिमा झळकल्या तरी कुणाबद्दलच आदर, कुतूहल वा आस्था वाटेनाशी झाली आहे. याला जबाबदार जशी साहित्यसंस्थांची नोकरशाही आहे, तशीच साहित्यिकांची सांस्कृतिक बेफिकिरीही आहे. राजकारणाबद्दल तुच्छतेने बोलणाऱ्या साहित्यिकांनी ज्या प्रकारचे ‘राजकारण’ गेली बरीच वर्षे चालविले आहे, त्याचा जाब विचारला जात नाही. मीडियासुद्धा त्यांच्या सर्व शहाजोगपणाकडे, सवंगपणाकडे आणि सांस्कृतिक भ्रष्टाचाराकडे रस्त्यावरील भांडण-मारामारीकडे पाहावे तसे, बरेचसे गंमत म्हणूनच पाहात असतो. दुर्दैवाने या गंमतीतही आपले नाव झळकावे म्हणून जिवाचा आटापिटा करणारे लेखक-कवी-नाटककार-समीक्षक (पत्रकारही!)आदी सांस्कृतिक अध्वर्यू आता ‘कल्चरल स्लमडॉग्ज्’ झाले आहेत. निवडणुकीच्या राजकारणात जशी आचारसंहिता असते तशी साहित्यव्यवहाराला असत नाही. तशी आचारसंहिता असणे म्हणजेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी असेही काही गळेकाढू पुरोगामी म्हणू शकतील. अनुशासनाच्या संकल्पनेची इतकी असभ्य टवाळी महाराष्ट्रात १९७७ नंतर बडय़ा बडय़ा साहित्यिकांनी केली आहे की आता साधे सभ्यतेचे निकषही त्यांना सांगणे अशक्य झाले आहे. पूर्वीही थोडेफार साहित्य संमेलनांचे वाद होत- काही उचित असत, काही ओढून-ताणून आणलेले, तर काही साहित्यिकांच्या ‘इगो’तून उद्भवलेले. परंतु गेल्या काही वर्षांत संमेलने उधळून देण्याची जी परंपरा सुरू झाली, तिचे मूळ आणीबाणीच्या संबंधात उद्भवलेल्या वादांमध्ये आहे. १९७५ च्या कऱ्हाड येथील साहित्य संमेलनात दुर्गा भागवत अध्यक्ष असताना, इंदुमती केळकर आणीबाणीविरोधी घोषणा देत संमेलनमंडपातून निषेध म्हणून बाहेर पडल्या. त्यांना अटकही झाली. मंडपात बसलेल्या हजार-दोन हजार साहित्यिकांनी व साहित्यरसिकांनी इंदुमती केळकरांना साथ दिली नाही. त्या सर्वाना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कंठ फुटला तो आणीबाणी रीतसर उठवली गेल्यानंतर. कऱ्हाडला व्यासपीठावर होते यशवंतराव चव्हाण आणि वि. स. खांडेकर. यशवंतरावांचा साहित्यविश्वातील गोतावळा मोठा होता. काहीजण हेवा वाटून वा हेटाळणीने त्या गोतावळ्याला ‘यशवंतरावांचा रमणा’ म्हणत. मुद्दा हा की त्या गोतावळ्यातील (वा रमण्यातील) कुणीही अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी तेव्हा उभे राहिलेले नाही. वि. स. खांडेकर यांचे साहित्य व चारित्र्य हे स्वातंत्र्यचळवळीच्या मुशीत तयार झाले होते. त्यांनी अनुशासनवादी भूमिका घेतली होती. खांडेकरांच्या विरोधात जाणे तेव्हा कुणाला प्रशस्त वाटले नाही आणि खांडेकरांवर ते ‘सत्तेला शरण’ गेल्याचा आरोपही कुणी केला नाही. दुर्गा भागवतांनी विचारस्वातंत्र्याची बाजू परखडपणे मांडली, पण तेव्हा साहित्यवर्तुळात बरेच गट-उपगट होते. त्यापैकी काही दुर्गाबाईंच्या विरोधात होते. त्यांनीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याऐवजी दुर्गाबाईंवरच टीका करणे सोयीचे मानले. पुढे जनता पक्षाचे सरकार आले आणि अनेक साहित्यिकांना (संघ व समाजवादी परिवारातल्या) एकदम अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला. परंतु त्यांच्या दुर्दैवाने (!) जनता पक्ष नावाचे नाटक तीन अंक व्हायच्या आतच बंद पडले आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या. हे राजकीय संदर्भ ध्यानात घेतल्याशिवाय गेल्या ३० वर्षांत चाललेले धिंगाणे उलगडणार नाहीत. ऐन जनता राजवटीत पुण्याला पु. भा. भावे यांचे संमेलन ‘परिवारातल्या’च मंडळींनी कसे उधळले याचे बहुतेक साक्षीदार आजही हयात आहेत. इंदिरा गांधींच्या दुसऱ्या राजवटीत त्यांना विरोध म्हणून (प्रत्यक्षात मुख्यमंत्री अंतुले असताना आणि काही पुस्तकांना पुरस्कार नाकारल्याचे निमित्त करून) ‘समांतर’ साहित्य भरविण्यात आले. आता आणीबाणी नव्हती. त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा शहाजोगपणे पुरस्कार करणे सोपे होते. तेव्हा प्रथमच दोन संमेलने भरली. अधिकृत संमेलन रायपूरला आणि समांतर संमेलन मुंबईला! आता संमेलन उधळण्याला, समांतर व विद्रोही मेळाव्यांना, जाती-धर्मविषयक आविष्कारांना, साहित्यिकांच्या गटबाजीला व अरेरावीला आणि त्याचबरोबर सत्तेची लाचारी करण्यालाही नव्याने प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. आनंद यादव यांचा बोटचेपेपणा, वारकऱ्यांची अरेरावी, ठाले-पाटील प्रभृतींचा नाठाळपणा, साहित्यसंस्थांची असंस्कृत नोकरशाही आणि एकूण ‘सारस्वता’ची बेपर्वाई हे अराजक अशा सांस्कृतिक बेफिकिरीतून आणि सुशिक्षित वर्गाच्या निर्बुद्धतेतून तयार झाले आहे. ऑस्कर वाइल्डने एके ठिकाणी म्हटले होते -`You can get rid of poverty, by socialism, but how will you get rid of mediocrity?’ह्ण म्हणजे दारिद्रय़ एक वेळ दूर करता येईल. पण सुशिक्षितांच्या निर्बुद्धतेवर उतारा काय आहे?