Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

काँग्रेसच्या पहिल्या यादीत आठ विद्यमान खासदार
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेस पक्षाने १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय मंत्री अ. र. अंतुले, विलास मुत्तेमवार, सुरेश कलमाडी, मििलद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, माणिकराव गावित, हरीभाऊ राठोड या आठ विद्यमान खासदारांसह अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी खासदार दत्ता मेघे आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सायंकाळी १०, जनपथ येथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या २६ पैकी १७ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.

डावखरे, उदयनराजे, संभाजीराजे, समीर भुजबळ यांना राष्ट्रवादीची उमेदवारी
मुंबई, २३ मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेसबरोबर जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तसेच साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाची प्रतीक्षा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने १७ उमेदवारांच्या नावांची यादी आज जाहीर केली. अनेक दिवस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हुलकावणी देणारे उदयनराजे यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांना लागोलाग साताऱ्यात उमेदवारी बहाल करण्यात आली. चार विद्यमान खासदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. उस्मानाबादच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादीत अजूनही वाटाघाटी सुरू असल्याने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

लालूप्रसाद जॉर्ज यांच्या संपर्कात
समर खडस

मुंबई, २३ मार्च
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना एकेकाळी टोकाचा विरोध करून त्यांना अगदी तुरुंगाची हवा खायला लावण्यापर्यंत राजकारण करणाऱ्या जॉर्ज फर्नाडिस यांना आता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्याच लालूप्रसाद यांच्या गोटातून फर्नाडिस यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राजदचा कॉँग्रेसला आणखी एक दणका बिहारमध्ये २८ उमेदवारांची घोषणा
पाटणा, २३ मार्च/पीटीआय

रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाशी युती करून कॉँग्रेसला पहिला धक्का देणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज बिहारमधील लोकसभेच्या २८ जागा लढविण्याची घोषणा करून कॉँग्रेस पक्षाशी अधिकृतपणे फारकत घेतली. कॉँग्रेसचे विद्यमान खासदार असलेल्या तीन जागांवर राजदने आपले उमेदवार उभे केले आहेत.

‘सायलन्स झोन’च्या विरोधात राज यांनी थोपटले दंड
मुंबई, २३ मार्च/ खास प्रतिनिधी

आपल्या पक्षाचे विचार आणि उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा तसेच मेळावे घेण्यात ‘सायलन्स झोन’मुळे सर्वच राजकीय पक्षांची पुरती गोची झाली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विरोधात दंड ठोपटले असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांची भेट घेऊन लोकशाही सक्षम करण्यासाठी बंदी असलेल्या ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेसमोर धर्मसंकट!
जयप्रकाश पवार
नाशिक, २३ मार्च

शिवसेनेने नाशिकच्या जागेवर लोकसभेचा उमेदवार जाहीर करताच पक्षार्तगत बंडाळीचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकाच्या तोंडाशी सेनेतीलच एक स्थानिक ‘धर्मवीर’ उभा ठाकल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील या एकमेव प्रतिष्ठेच्या जागेभोवती ‘धर्मसंकट’ घोंघावू लागल्याने पक्षातील खालपासून वपर्यंतची नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली. परिणामी बंडाळीला भीक न घालण्याच्या पक्षाच्या पारंपरिक शिरस्त्याला मोडता घालत अन् बंडोबांना थंडोबा करण्याच्या उद्देशाने मुदतीअगोदरच विधानसभेची उमेदवारीही घोषित करण्याची नामुष्की पक्ष नेतृत्वावर ओढवली आहे.

उत्तर-मध्य मतदारसंघात १५ छोटेलाल दुबे; तर ४७ किशोर त्रिपाठी !
मुंबई, २३ मार्च/ खास प्रतिनिधी

बिहार व उत्तर प्रदेशमधून मुंबईत दररोज येणाऱ्या लोंढय़ांच्या माध्यमातून तेथील नेत्यांचा मुंबईवर कब्जा करण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने करत असून त्याबाबतचे पुरावेच आता मनसेला निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीतून दिसून आले आहेत.

‘बद’ अच्छा; ‘बदनाम’ बुरा!
आठवणीतल्या निवडणुका

माणूस प्रत्यक्ष वाईट असणे एक वेळ ठीक; परंतु एखादा माणूस वाईट असल्याचा सततचा प्रचार, त्याची बदनामी ही गोष्ट अधिक हानिकारक असते. प्रत्यक्षात वाईट असलेली अनेक माणसे केवळ त्यांच्या वाईट गोष्टींचा डांगोरा पिटला न गेल्याने राजकारणात ‘तरून’ गेली; परंतु दोन-चार साध्या चुका किंवा नको त्यांच्या संगतीत सतत राहिल्याने ‘बदनाम’ होऊन त्याचे चटके बसलेली माणसे ‘संपल्याची’ उदाहरणेही भारतीय राजकारणात आहेत.

शिवसेनेतर्फे ठाण्यातून विजय चौगुले तर कल्याणमधून आनंद परांजपे
मुंबई, २३ मार्च/प्रतिनिधी

शिवसेनेतर्फे ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय चौगुले यांना तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केला. ठाणे लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी प्रकाश परांजपे निवडणूक लढवत होते. परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले. मात्र आता ठाणे आणि परांजपे हे समीकरण न राहता मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या कल्याण मतदारसंघातून परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश नाईक यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या विजय चौगुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना नाईक यांचे पुत्र संजीव यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. विजय चौगुले म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्याला पात्र ठरण्याचा माझ्या प्रयत्न राहिला आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीतही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन. आनंद परांजपे म्हणाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने व उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मला उमेदवारी दिली आहे. तरुण मतदारसंघाला तरुण उमेदवार देण्याचा हा निर्णय सार्थ ठरवेन.

उद्धव ठाकरे, लालकृष्ण अडवाणींच्या सभेने युतीच्या प्रचाराचा प्रारंभ
मुंबई, २३ मार्च/प्रतिनिधी

शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा आरंभ रविवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दादर येथील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे सभेत मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते मनोहर जोशी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सेना नेते सुभाष देसाई, भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचीही यावेळी भाषणे होणार आहेत, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

बसपाने तिकीट नाकारल्यामुळे रमेश दुबे काँग्रेसमध्ये परतले
नवी दिल्ली, २३ मार्च/ खास प्रतिनिधी

बसपाच्या हत्तीवर स्वार होऊन उत्तर प्रदेशातून दोन वर्षांंपूर्वी लोकसभेवर निवडून आलेले खासदार रमेश दुबे पंधराव्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले आहेत. महाराष्ट्रात राज्यमंत्री राहिलेले दुबे यांना मायावतींनी यंदा तिकीट नाकारले. त्यामुळे निराश आणि संतप्त होऊन दुबे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मुंबईतून करणारे दुबे मुंबई महापालिकेचे १७ वर्षे नगरसेवक होते. त्यानंतर दहा वर्षे आमदार असताना ते राज्यमंत्रीही झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा असा प्रवास करताना दुबे यांनी उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढली होती आणि ते निवडूनही आले होते. पण बसपामध्ये अजिबात पक्षांतर्गत लोकशाही नाही आणि मायावती पक्षाच्या लोकसभा सदस्यांच्या भावनांची दखलही घेत नाहीत, असा आरोप दुबे यांनी केला. दुबे यांच्या स्वगृही परतण्याने काँग्रेसला उत्तर प्रदेशात एक रेडिमेड उमेदवार लाभला आहे.

संगमा करणार भाजपचा प्रचार
शिलाँग, २३ मार्च / पीटीआय

मेघालय सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केल्याने काँग्रेसवर नाराज असलेल्या पी.ए. संगमा यांनी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अरुणाचल पश्चिम आणि सिक्कीम या दोन मतदारसंघात आपण भाजपचा प्रचार करू, असे संगमा यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले. युपीए सरकारने मेघालयातील सरकार बरखास्त केल्यानंतर संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात युती करू नये, असा सल्ला संगमांनी पवारांना दिला होता. परंतु, पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संगमा नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली होती. त्यांनी नुकतीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन मेघालयातील राष्ट्रपती राजवटीविरोधात राजकीय आंदोलन उभारण्यासाठी समर्थन मागितले होते.